Maharashtra Special / धनंजय मुंडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अंबाजोगाई तालुक्यातील इनामी जमिनीचे प्रकरण

या जमिनीसंदर्भात महंत हे ट्रस्टी हाेते. यावरून ट्रस्टी व देशमुख यांच्यात वाद होता.

दिव्य मराठी वेब

Jun 12,2019 09:08:54 AM IST

अाैरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी मंगळवारी दिले. या प्रकरणात जगमित्र साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ फड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


शासनाची फसवणूक
ही जमीन परस्पर लाटली तर गेलीच, शिवाय नंतर शासनाला अंधारात ठेवून ही सर्व जमीन धनंजय मुंडे यांनी मुखत्यारनाम्यांआधारे खरेदी केली. वर त्यांचे अकृषक (एनए) केले. ही जमीन शासनाची असूनही या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. तशा पूरक नोंदी करवून घेतल्या. ही शासनाची फसवणूक असल्याने कलम ४२० अन्वये तसेच या शासनाच्या परवानगीविना बनावट कागदपत्रांआधारे जमीन हस्तांतरित करण्यात आल्याने कलम ४६७, ४६८ आणि ४७१ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार फड यांनी अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक राजकीय दबावामुळे या तक्रारीची पोलिसांनी कोणतीच दखल घेतली नव्हती, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.


... अखेर ठोठावले खंडपीठाचे दार : पोलिस कोणतीच दखल घेत नसल्याचे पाहून तक्रारदार राजाभाऊ फड यांनी उच्च न्यायालय खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. यात धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे, प्रेमा पुरुषोत्तम केंद्रे अशा १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती.


महंतांच्या वारसाने जमिनीची परस्पर स्वत:च्या नावे करून घेतली होती नोंद...
पूस (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील जुना सर्व्हे नंबर २४, २५ आणि इतर अशी शासकीय जमीन आहे. ही जमीन बेळखंडी मठाला इनाम म्हणून देण्यात आलेली होती. मठाचे महंत रणजित व्यंका गिरी होते. ही जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरित होऊ शकत नाही. मात्र, मठाधिपतींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसाने ही जमीन संगनमत करून परस्पर स्वतःच्या नावे नोंदवून घेतली. तसेच ही जमीन आपली असल्याचे दावे दाखल करून स्वतःच्या नावे हुकूम काढून घेतले.


मुंडे म्हणतात, जमिनीची खरेदी रीतसरच...
या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली. या जमिनीसंदर्भात महंत हे ट्रस्टी हाेते. यावरून ट्रस्टी व देशमुख यांच्यात वाद होता. हा दावा न्यायालयात गेला. न्यायालयीन डिक्रीच्या आधारे २०११ मध्ये देशमुख हे या जमिनीचे मालक ठरले. २०१२ मध्ये देशमुख यांच्याकडून मुंडे यांनी रीतसर ही जमीन खरेदी केली. रेकॉर्डवर शासकीय जमीन म्हणून कोणतीही नोंद नव्हती.


राजकीय सूडबुद्धीतून सातत्याने तक्रारी
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी माझ्याविरुद्ध असे कारस्थान रचण्यात येते. यामुळे सरकारविरुद्ध आवाज उठवणे थांबवणार नाही. माझा लढा सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयात मला नक्की दिलासा मिळेल. -धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद


प्रथमदर्शनी हा गुन्हाच, हायकोर्टाचे निर्देश...
उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून प्रथमदर्शनी हा गुन्हा दिसत असल्याने बर्दापूर पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. व्ही. डी. सपकाळ, तर शासनातर्फे अॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.


... म्हणून वारंवार तक्रारी : या प्रकरणातील तक्रारदार राजाभाऊ फड हे शेतकरी व बँकांची ५४०० कोटींची फसवणूक करणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. या घोटाळ्याविरुद्ध मी आवाज उठवल्यामुळेच सूडबुद्धीतून त्यांचे जावई माझ्याविरुद्ध वारंवार तक्रारी करत असतात, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे .

X
COMMENT