आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे येते तेव्हाच नसते सिटी बस, दररोज शेकडो औरंगाबादकरांना करावा लागतो रिक्षाने प्रवास 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या शहर बस सेवेमुळे 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी स्थिती झाली आहे. दिवसभर शहरात येणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळा आणि शहर बस यांच्या वेळापत्रकामध्ये ताळमेळ नसल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नाइलाजास्तव रिक्षा अथवा खासगी टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. विशेषत: रात्री दहा वाजेनंतर सिटी बस उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना अव्वाच्या सव्वा पैसे मोजून प्रवास करावा लागतो. त्यामुळे नाशिकच्या धर्तीवर रेल्वेस्थानक परिसरात स्वतंत्र सिटी बसस्थानक आणि रिक्षा स्थानक करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

 

पंधरा दिवसांपूर्वी शहरात मनपा आणि एसटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी बससेवा सुरू झाली.पहिल्या टप्प्यात २४ बस शहरात धावत आहेत. यासंबंधी बुधवारी 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने दिवसभर रेल्वेस्थानकावर पाहणी केली. त्या वेळी रेल्वे व सिटी बसच्या वेळापत्रकात ताळमेळ नसल्याचे दिसून आले. परगावाहून आलेले ९० टक्के प्रवासी ऑटोरिक्षा, कारने गेले. सिटी बस नसल्याचा फायदा घेत ऑटोरिक्षा चालकांनी कमी भाड्याचे आमिष देऊन प्रवासी पळवले. प्रवाशांनीही बसला वेळ लागणार असल्याने ऑटोरिक्षाला प्राधान्य दिले. 

 

सर्वांची एक तातडीची बैठक घ्यावी : मोबाइल अॅपद्वारे सिटी बस व रेल्वेचे लोकेशन घेऊन नियोजन करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. यासाठी खासदार , मनपा, रेल्वे, एसटी, आरटीओ, जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रवासी संघटना, प्रवासी सेना, लोकप्रतिनिधी, प्रवासी यांची तातडीने बैठक बोलावून मार्ग काढावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोमाणी, बस अधिकारी, रेल्वे अधिकाऱ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना केले. 


इन-आऊटची शिस्त कधी लागणार ? : इन व आऊट गेट आहेत. पण इनमधून वाहने बाहेर काढली जातात व आऊटमधून वाहने आत येतात. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने दोन्ही गेटवर वाहतूक ठप्प होते. विशेषत: आऊट गेटवरच पैठण रोड, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप व मध्यवर्ती बसस्थानक आदी प्रमुख मार्ग आहेत. समोर पेट्रोल पंप असल्याने वारंवार वाहतूक ठप्प होते. 

 

बससेवा अशी: हर्सूल सावंगी ते रेल्वेस्टेशन 
७.४०, ८.२५, ९.१० ,९.५५, १०.४० , ११.२५, २.०५, २.५०, ३.३५, ४.२०, ५.०५, ५.५०, ६.३५, ७.२०, ८.२० 

 

हर्सूल सावंगी ते रेल्वेस्टेशन-पुंडलिकनगर : ७.२०, ८.२०, ९.२०, १०.२०,२.४०, ३.४०, ७.४० 
सिडको ते रेल्वेस्टेशन : ६.४०, ७.२०, ८.००, ९.२०, १०.००, १०.४०, ११.२०, १२.४०, १.२०, २.२५, ३.०५, ३.४५, ४.२५, ५.०५, ७.४५, ८.२५, ८.३५, ९.०५, ९.४५ असे वेळापत्रक आहे.

 

नियंत्रण कक्षाची दुर्दशा 
दुर्लक्षित ठिकाणी व आऊट गेटला लागून बस वाहतूक नियंत्रण कक्ष आहे. त्याच्या अवतीभोवती प्रवासी, वाहनधारक लघुशंका करतात. रात्री कक्ष बंद असतो. त्यामुळे कचरादेखील आणून टाकला जातो. बुधवारी वाहतूक निरीक्षक हिरन्ना दारेलू नाकाला मास्क लावून कर्तव्य बजावत होते. प्रवासी नाकाला हात लावून चौकशी करत होते. कक्ष व परिसरात ना लाइट ना फोन, केवळ बसेसची नोंद घेतली जाते. 

 

नाशिकच्या धर्तीवर हवे स्वतंत्र सिटी बस व ऑटोरिक्षा स्टँड 
नाशिक रेल्वेस्टेशनवर शेजारीच बस व ऑटोरिक्षाचालकांसाठी स्वतंत्र स्टँड आहे. प्रवाशांना बस व ऑटोरिक्षा निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पंचवटी व इतर काही प्रमुख मार्गांवर २४ तास वेळापत्रकानुसार सिटी बस धावतात. औरंगाबादेत याउलट परिस्थिती आहे. मुख्य प्रवेशद्वार ते सर्वत्र खासगी टॅक्सी कार, ऑटोरिक्षांचाच कब्जा आहे. बेशिस्त रिक्षावाले स्थानकाच्या प्रवेशद्वार तसेच बाहेर जाणाऱ्या मार्गावर गराडा घालून उभे राहत असल्याने वाहतूक कोंडी होते. 

 

रात्री व पहाटे येणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे 
नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री ९.३५ ते ९.४०, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रात्री ११ ते ११.२०, नांदेड-मनमाड पॅसेंजर रात्री १२.३०. ही उशिरा धावते. मनमाड-काचीगुडा पॅसेंजर ८.४० वाजता येते. दिवसभरात ३५ हजार प्रवासी करतात. 

 

अशी हवी बससेवा 
रेल्वे किती वाजता येणार आहे त्यानुसार रेल्वेस्थानक ते बजाज हॉस्पिटल, देवळाई चौक, सातारा, २) बाबा, वाळूज, पंढरपूर, बजाजनगर, रांजणगाव ३) बाबा, मध्यवर्ती बसस्टँड, हर्सूल, ४) पैठण गेट, औरंगपुरा, शहागंज, टीव्ही सेंटर ५) शहानूरमियाँ दर्गा, गजानन महाराज मंदिर, हनुमाननगर, जयभवानीनगर, सिडको बसस्टँड, टीव्ही सेंटर, सेव्हन हिल्समार्गे बसस्टँड, चिकलठाणा, क्रांती चौक मार्गे सिडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, इंदिरा आवास या मार्गावरही रेल्वे वेळापत्रकानुसार नियमित सिटी बस सोडणे अनिवार्य आहे. 

 

काय आहेत अडचणी 
 बस स्टॉपविषयी माहिती देणारे फलक नाहीत. 
 बसची वेळ तसेच बसेसच्या मार्गांचे वेळापत्रक लावण्यात आलेले नाही. 
 प्रवेशद्वार, बस स्टॉपवर प्रवाशांना बसण्यासाठी शेड व खुर्च्यांची सोय नाही. 
 मार्गनिहाय बस सोडण्याचे नियोजन नाही. 
 लाऊडस्पीकरद्वारे बससेवेविषयी वेळोवेळी माहिती दिली जात नाही. 
 रिक्षा व खासगी टॅक्सी, कार गर्दी करून एकाच ठिकाणी उभे 
 
उपाययोजना अशा 
 येथे हायमास्ट लाइट लावणे आवश्यक आहे. 
 वेळापत्रक बोर्ड लावण्याची गरज. 
 रेल्वेस्टेशन- सिडको-मध्यवर्ती बसस्थानक- रेल्वेस्टेशन अशी तिहेरी मार्गाने बससेवा हवी. 
 बससेवेसाठी ऑटोरिक्षाचालकांना आळा घालावा. 
 २४ तास बससेवा सुरू ठेवावी. 
 

बातम्या आणखी आहेत...