आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यामध्ये औरंगाबाद सर्वात थंड; महाबळेश्वरलाही टाकले मागे !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डिसेंबर महिन्याची सुरुवात राज्यात थंडीच्या कडाक्याने झाली आहे. गत २४ तासांत राज्यात सर्वात कमी १०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद औरंगाबादेत झाली. शनिवारी (१ डिसेंबर) नगरमध्ये पारा १० अंश सेल्सियसपर्यंत घसरला होता. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी पडू लागली असताना थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमधली रविवारची सकाळ तुलनेने अधिक उबदार होती. महाबळेश्वरातले किमान तापमान १३.९ अंश सेल्सियस होते. रविवारी हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांच्या तापमानाचा अहवाल सादर केला. त्यामध्ये औरंगाबादचे किमान तापमान सर्वात कमी म्हणजे १०.८ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले, गोव्यासह संपूर्ण राज्याच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असल्याने येत्या आठवड्यात थंडीचा जोर कायम राहील. राज्यातल्या बहुतांश भागात रात्रीचे तापमान १५ अंशांपेक्षा खाली आले आहे. देशाच्या उत्तरेकडेही थंडीची जोरदार चाहूल लागली आहे. हरियाणातल्या हिस्सार येथे देशातील सर्वात नीचांकी ६.७ अंश सेल्सियस तापमानाची रविवारी नोंद झाली. तरी नेहमीच्या तुलनेत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील उत्तरेकडील तापमान अजूनही १.६ ते ३ अंशांनी जास्त आहे. तुलनेने दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगण येथील तापमानात सरासरीपेक्षा घट आढळून आली आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 

 

स्थलनिहाय थंडीच्या प्रमाणात कमालीचा फरक :

स्थलनिहाय थंडीच्या प्रमाणात कमालीचा फरक आढळून येत आहे. सध्याची आकडेवारी पाहता औरंगाबाद सर्वाधिक थंड तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नगर ही शहरे सर्वाधिक उष्ण ठरली आहेत. बदलत्या हवामानाचा नागरिकांना सामना करावा लागत असून आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे शाळू ज्वारी, हरभरा, गहू पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. जेथे थंडी कमी झाली तेथील गहू पिकावर विपरीत परिणाम होत असून तापमानामुळे पाण्याची मागणी वाढत आहे, तर जेथे जास्त थंडी तेथील पीक थंडीमुळे होरपळत आहेत. यावर मात करून संतुलित व अनुकूलित वातावरण निर्माण करत पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

 

पुढील आठवड्यात कडाका वाढणार 
उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे, पृथ्वीवरील आकाशाकडे परावर्तित होणारे उष्ण वारे यांचा संगम होऊन ढगांची गर्दी होत आहे. ढगांच्या आच्छादनात उष्णता अडकून उकाड्यात वाढ होते. त्यामुळेच महाबळेश्वर वगळता सर्वच शहरांचे कमाल तापमान अधिक असून ठाणे उच्चांक पातळीवर होते, तर किमान तापमानात औरंगाबाद शहर सर्वात कमी १०.८ अंश सेल्सियसवर होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिमी विक्षोप म्हणजेच अतिशीत वारे दाखल झाल्यानंतर किमान व कमाल तापमान आणखी नीच्चांक पातळी गाठून गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या दैनंदिन अहवालात वर्तवली आहे.

 

१९ जिल्ह्यांतील तापमानाचा आलेख 

शहर किमान कमाल 
औरंगाबाद २८.२ १०.८ 
परभणी ३०.० १२.६ 
नांदेड ३१.० १६.० 
नाशिक २६.१ ११.४ 
नागपूर २९.६ १२.७ 
अकोला ३०.२ १५.० 
अमरावती २९.२ १४.८ 
चंद्रपूर ३०.४ १६.० 
जळगाव २९.२ १३.६ 
सोलापूर ३१.७ १६.६ 
सांगली ३०.२ १३.९ 
सातारा २९.५ १२.१ 
महाबळेश्वर २४.६ १३.९ 
मुंबई ३४.१ १९.० 
ठाणे ३६.२ २२.० 
कोल्हापूर २९.७ १७.० 
नगर ३३.० ११.० 
रत्नागिरी ३५.० २०.८ 
पुणे २७.७ १२.१ 

बातम्या आणखी आहेत...