आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे संगणक शास्त्रज्ञ अतुल खेरडे यांच्या सीटवाॅकर यंत्राला मिळाले पेेटंट

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
अतुल खेरडे, डाॅ. शिल्पा गोसावी - Divya Marathi
अतुल खेरडे, डाॅ. शिल्पा गोसावी

औरंगाबाद : बैठे काम, मोठा प्रवास आणि आजारपणात बेडवर पडून राहिल्याने पायांतील रक्ताभिसरण कमी होते. पायांची हालचाल न झाल्याने रक्त हृदयाकडे परत पाठवले जात नाही आणि व्हॅरिकोस व्हेन्ससारखे विकार बळावतात. प्रसंगी साठलेल्या रक्ताची गाठ झाली तर ती फुप्फुसे, हृदय वा मेंदूत अडकून मृत्यूही ओढवू शकतो. अनेक जण वेळेअभावी तर काही जण आळसामुळे चालणे टाळतात. मात्र, आता बसल्या ठिकाणी, न चालताही रक्ताभिसरणाचे फायदे मिळवणे शक्य झाले आहे. जागच्या जागी काम करतानाही पायाला चालण्याची नैसर्गिक हालचाल करवणारे सीटवॉकर' हे यंत्र औरंगाबादचे संगणक शास्त्रज्ञ अतुल खेरडे यांनी तयार केले आहे. यासाठी त्यांना डॉ. शिल्पा गोसावी यांची मदत मिळाली. रुग्णांसाठी तयार केलेल्या या कल्पनेला पेटंटही मिळाले आहे.

वेळेचा अभाव आणि आळसामुळे लोक व्यायाम करत नाहीत. यामुळे कामाच्या ठिकाणीच, बसल्या-बसल्या चालता आले तर? असा विचार अतुल खेरडे यांनी केला व त्यातूनच सीटवॉकर तयार झाले. हे छोटेसे यंत्र कर्मचारी बसतात त्या टेबलाच्या पाय ठेवण्याच्या जागेसारखे आहे. त्यावर पाय ठेवताच ते घोट्याने चालल्यागत हालचाल करते. यामुळे पायाची हालचाल सुरू राहते. रक्ताभिसरण क्रिया सुरळीत पार पडते. याच तत्त्वावरील एक वेगळे यंत्र रुग्णालयात बेडवर पडून असलेल्या रुग्णासाठीही डिझाइन करण्यात आले आहे. सीटवॉकरसाठी त्यांना एक्स-रे मशीन बनवणाऱ्या लाटकर यांची लेझर कटसाठी, तर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील भाऊ इन्स्टिट्यूटची मदत मिळाली. सीटवॉकर बाजारात आणण्यापूर्वी याच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. डॉ. वैशाली आणि डॉ. डुंबरे-पाटील यांच्या कलर डॉपलर मशीनद्वारे घेतलेली चाचणी महत्त्वाची ठरली. व्यक्ती झोपलेली असताना पाय ते हृदयापर्यंत प्रतिमिनिट ४ ते ५ एमएल रक्त जात असल्याचे दिसून आले. हेच रक्त सीटवॉकरमुळे ४० ते ४२ एमएल प्रतिमिनिट वाहायला लागते. खुर्चीत पाय न हलवता बसलेल्या व्यक्तीच्या पायातून एक थेंबही रक्त हृदयाकडे जात नाही. या यंत्रामुळे ४०-४२ एमएल रक्त परत पाठवले जाते.

कल्पना सुचताच पेटंटसाठी केला अर्ज

सीट वॉकरची कल्पना सुचताच अतुल खेरडे यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये डॉ. शिल्पा गोसावींना सोबत घेऊन पेटंट मिळण्यासाठी अर्ज केला. त्यांनी मांडलेले सर्व २८ मुद्दे नवीन असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्च रिपोर्टमध्ये व भारत सरकारच्या इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी विभागाने मान्य केले. ६ डिसेंबर २०१९ राेजी त्यांना २० वर्षांसाठी या संशोधनाचे पेटंट देण्यात आले. खेरडे यांनी २०१८ मध्येच हे संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी सुश्रुत डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने स्टार्टअपची नोंदणी केली आहे. भारत सरकारच्या DIPP विभागातही ह्या कंपनीला नोंदणी मिळाली आहे. सुश्रुत डिझाइन्सचे बंगळुरू येथील नारायणा हेल्थ आणि भाऊ इन्स्टिट्यूटच्या इनक्युबेशन सेंटरमधेही निवड झाली आहे. सध्या बीज भांडवलासाठी शोध सुरू आहे.
 

ट्रेकिंग ग्रुपमधील चर्चेतून समोर आली कल्पना

अतुल खेरडे मूळ औरंगाबादचे. त्यांनी श्री सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातून बी. एस्सी., तर विद्यापीठातून संगणकशास्त्रात एम.एस्सी. केले. यानंतर त्यांची पुण्यातील सीडॅकमध्ये निवड झाली. सीटवाॅकरची कल्पना सुचताच त्यांनी पेटंट नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. यासाठी मदत झाली ती तब्बल ३६ वर्षांनंतर फेसबुकवर अचानक भेटलेल्या शाळकरी मैत्रीण डॉ. शिल्पा गोसावी यांची. त्या पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. दोघे एका ट्रेकिंग ग्रुपमध्ये हिमालयात गेले असता गप्पातून या विकाराविषयी माहिती मिळाली. परत आल्यावर शोधून पाहिले तेव्हा ह्या क्षेत्रात या प्रकारचे काम कोणीही केले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच सीटवॉकरची कल्पना मांडली आणि साकारलीही. हे पेटंट खेरडे आणि डॉ. गोसावी असे दोघांच्या नावावर आहे.

बातम्या आणखी आहेत...