आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादला येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या निम्म्या बुकिंग रद्द! वेरुळ-अजिंठ्यावर पर्यटक घटले

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असताना भारताच्या प्रमुख पर्यटन नगरींपैकी एक औरंगाबादला याचा मोठा फटका बसला आहे. आशिया, युरोप आणि इतर असंख्य देशातून येणारे परदेशी पर्यटक औरंगाबादच्या बुकिंग रद्द करत आहेत. विविध देशांतून लोक जागतिक वारसा असलेल्या अजिंठा आणि वेरुळच्या लेणी पाहण्यासाठी औरंगाबादला येतात. परंतु, कोरोनाच्या भीतीने त्यापैकी जवळपास निम्म्या परदेशी पर्यटकांनी आपली पावले मागे घेतल्याची आकडेवारी शनिवारी समोर आली.

1500 पैकी 700 परदेशी पर्यटकांच्या बुकिंग रद्द

मराठवाड्याची राजधानी मानल्या जाणाऱ्या औरंगाबादला मार्च हा महिना पर्यटन पर्व मानला जातो. याच महिन्यात देश-विदेशातून औरंगाबादच्या ऐतिहासिक वास्तूंवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. परंतु, 52 दरवाज्यांच्या या शहराला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण नसला तरीही भीतीपोटी पर्यटक औरंगाबादच्या बुकिंग रद्द करत आहेत. औरंगाबाद पर्यटन विकास संघटनेचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी पीटीआयशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, "चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि थायलंडच्या बहुतांश पर्यटकांनी औरंगाबादचे मार्च महिन्यातील नियोजित दौरे रद्द केले आहेत. युरोपियन देशांतून येणाऱ्या पर्यटकांची सुद्धा अशीच गत आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने त्यांनी औरंगाबादला पाठ दाखवली." आकडेवारीबद्दल बोलावयाचे झाल्यास 1500 पैकी जवळपास 700 परदेशी पर्यटकांनी औरंगाबाद दौरा रद्द केला. ही आकडेवारी आता वाढतच आहे.

पुढच्या सीझनला सुद्धा फटका बसणार

जसवंत सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, यातील काही पर्यटक असेही आहेत की ज्यांनी आपल्या व्हिसाची मुदत संपत असल्याने औरंगाबाद दौरा रद्द केला. परंतु, सर्वात मोठा फटका कोरोना व्हायरसचाच बसला आहे. यंदाच्या पर्यटन सीजनमध्ये शेकडो पर्यटक आपले औरंगाबाद दौरे रद्द करत आहेत. परंतु, येत्या काळात त्याचा आणखी मोठा फटका आगामी सीझनला बसणार असल्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते अशी भीती पर्यटन संघटनेने व्यक्त केली आहे.

गाईड देखील म्हणतात, फटका बसला

औरंगाबादला येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी गाईडचे काम करणारे संदीप गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे, "औरंगाबादसाठी मार्च हा पर्यटनाचा सीजन असतो. या महिन्यात रोज आमच्याकडे रोज सरासरी 7 ते 8 क्लाइंट येतात. पण, सद्यस्थितीला वेरुळ आणि अजिंठ्याच्या जवळपास फिरणारे गाईड सध्या घरी बसून आहेत. नोव्हेंबर ते मार्च पर्यंत चालणारा पर्यटनाचा मोसम आता संपुष्टात येत आहे. तरीही पर्यटकांची गर्दी काही पाहायला मिळत नाही. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 31 रुग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रात असा एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही.

बातम्या आणखी आहेत...