आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींना श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या AIMIM नगरसेवकाला अटक, BJP नगरसेवकांविरोधात गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर श्रद्धांजलीला विरोध करणारे MIM चे नगरसेवर सय्यद मतीन यांना रात्रीच अटक करण्यात आली आहे. मतीन यांनी श्रद्धांजलीला विरोध केला तेव्हा त्यांच्यावर भाजपच्या महिला नगरसेवकासह इतर सदस्यांनी अचानक हल्ला केला. तसेच भर सभागृहात बेदम मारहाण केली. त्यातील आरोपी भाजप नगरसेवक राज वानखेडे, प्रमोद राठोड आणि विजय आवताडे या तिघांच्या विरोधात सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण?
> वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावास एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी कुरापत काढून विरोध केला. एमआयएमच्या इतरांचा प्रस्तावाला पाठिंबा होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत भाजपचे नगरसेवक त्यांच्यावर चालून गेले. बाकांवर चढून लाथाबुक्क्यांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यात भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजगौरव वानखेडे आघाडीवर होते. ही घटना कळताच दोन्ही बाजूंचे समर्थक मनपा मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 
> टाऊन हॉल येथे भाजपचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्यासह तीन गाड्यांवर दगडफेक, देशमुख यांच्या वाहनचालकाला मारहाण केली. सुमारे तीन तास सिटी चौक, टाऊन हॉलसह अनेक भागांत तणावाचे वातावरण होते. दरम्यान, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मतीन यांचा विरोध पक्षाची भूमिका नाही, असे सांगत त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली, तर युतीच्या शिष्टमंडळाने मतीनविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सभागृहात त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. मात्र, औरंगाबादकरांसाठी महत्त्वाच्या समांतर जलवाहिनी योजना प्रस्तावावर मिनिटभरही चर्चा झाली नाही.
> समांतर योजना कशी व कुणामार्फत करावी यासाठी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे या सभेत केवळ श्रद्धांजली घेण्याचे ठरले. त्यानुसार वाजपेयींच्या जीवनचरित्रावर आधारित २५ मिनिटांची चित्रफीत दाखवण्यात आली. मग राजू वैद्य, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, प्रमोद राठोड, राज वानखेडे, कीर्ती शिंदे, सीमा खरात, शिल्पाराणी वाडकर, राजेंद्र जंजाळ, विकास जैन यांनी मनोगत मांडले.


मतीनविरुद्ध धर्म, वंशावरून शत्रुत्व वाढवल्याचा गुन्हा...
मतीन यांच्या विरोधात सायंकाळी सिटी चौक पोलिसांत उपमहापौर विजय औताडे यांनी फिर्याद दिली. मतीन यांनी वाजपेयींविषयी अनुद््गार काढून दोन धर्मांत द्वेष निर्माण होईल, असे वक्तव्य केले. मनपा कार्यालयाबाहेर जमावाला चिथावणी देऊन धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटलेे. त्यावरून मतीन विरोधात भादंवि कलम १५३, १५३ (अ) (धर्म,वंश,जन्म,निवास भाषा इ. कारणावरून निरनिराळ्या गटांत शत्रुत्व वाढवणे ) व २९४ (सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याला चीड आणणारे अश्लील वक्तव्य, शब्द प्रयोग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक डी. एस. शिंगारे तपास करत आहेत.


यापूर्वीही मतीन यांच्याकडून स्टंट...
यापूर्वी मतीन यांनी कोणतीही मान्यता न घेता मनपाच्या प्रवेशद्वाराला उर्दूचे बोर्ड लावले होते. पाणीप्रश्नावरून सुरक्षा रक्षकांना मारहाण केली होती. ६ जुलै २०१७ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध केला होता. १८ ऑगस्ट २०१७ रोजी 'वंदे मातरम' या गीताला सर्वसाधारण सभा व 'स्थायीत विरोध केला.

 

बातम्या आणखी आहेत...