आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचे पैसे उधळण्याचा यांना कोणी दिला अधिकार? मुख्यमंत्र्यांच्या आडून ‘भावी आमदारां’चा प्रसिद्धीचा डाव; आभाराच्या होर्डिंगचा भार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली असताना रस्ते कामांसह पाणीपुरवठा योजना, सातारा-देवळाई ड्रेनेजलाइन आदी कामांसाठी तीन हजार कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यासाठी त्यांचेे अभिनंदन करणारे २०० फलक शहरभर तीन महिने लावण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या फलकांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोटो असेल. विशेष म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्तही कोणी होर्डिंग लावू नयेत, असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र्यांनीच बुधवारी केले आहे. त्यांचेही न ऐकता महापालिकेचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:चा प्रचार जनतेच्या पैशातून करवून घेेत आहेत. 


विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने या निर्णयाला विरोध करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली आहे. शहरात सिमंेटचे रस्ते करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चोवीस कोटी रुपयांचा निधी दिला. नंतर अवघ्या काही महिन्यांत रस्त्यांसाठी आणखी शंभर कोटी रुपयांचा निधी दिला. यातून ३१ रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यापैकी १६ रस्त्यांचीच कामे सुरू आहेत. त्यानंतर पुन्हा रस्त्यांच्या कामांसाठीच सव्वाशे कोटी रुपयांचा निधी देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. नव्याने प्रस्तावित केलेल्या जलयोजनेचा प्रश्न पूर्णपणे निकाली काढण्यासाठी १६ कोटी ९४ लाख रुपये देण्यास सहमती दिली. सातारा -देवळाईतील ड्रेनेजलाइनसाठी १५७ कोटी रुपयांच्या डीपीआरला तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुळे मनपा सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणला. भाजप नगरसेवक आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करू इच्छीणाऱ्या राजू शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला गोकूळ मलके यांनी अनुमोदन दिले. एमआयएमचे गटनेते नासेर सिददीकी यांनी यासाठी कोणता निधी वापरणार, असा प्रश्न करुन त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होईलअसे मत मांडले. त्यावर शहराचे विद्रूपीकरण न करता अधिकृत होर्डिंगवरच बॅनर लावण्यात येणार असून त्यासाठी मनपाचा निधी खर्च व्हायचा तो होऊ द्या, असे म्हणत महापौरांनी प्रस्ताव मंजूर केला. 


भाड्यापोटी लाखो रुपये देणार आणि येणारे भाडेही बुडवणार : शहरात मनपाच्या मालकीचे शंभर तर खासगी साडेतीनशे होर्डिंग आहेत. मनपाच्या होर्डिंगला पैसे लागणार नसले तरी, तीन महिन्याचा महसूल यामुळे बुडणार आहे. खासगी होर्डिंगवर बॅनर लावण्यासाठी १० बाय २० ते २० बाय ६० या साईजसाठी १५ ते २२ हजार रुपये दरमहा खर्च लागतो. म्हणजे लाखो रुपये खर्च होतील.


ज्या ठिकाणी व्यावसायिक जाहिराती आहेत त्यांचे काय : शहरातील ज्या होर्डींग्जवर व्यावसायिक जाहिराती झळकत आहेत, त्यासाठी करार झाले आहेत त्या ठिकाणी महापालिकेला आपल्या जाहिराती लावता येणार नाहीत. अशावेळी २०० होर्डींग्ज महापालिका कुठून आणेल, असाही प्रश्न आहे. त्या परिस्थिती नियमभंग होण्याचीच शक्यात अधिक आहे.

 

तीन महिन्यांपर्यंत चालेल जनतेच्या पैशाने जाहिरातबाजी 
तीन महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जाहिरातबाजीसाठी मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज शहरात झळकवण्याचा हा खटाटोप आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत हे होर्डिंग्ज शहरात राहतील.

 

बॅनरसाठी आकारानुसार लागतो दोन ते दहा हजार रुपये खर्च
बॅनर तयार करण्यासाठी आकारानुसार दर आहेत. दहा बाय २० ते २० बाय ६० असे आकार आहेत. दहा बाय २० चे एक बॅनर तयार करण्यासाठी किमान दोन हजार रुपये तर २० बाय ६० चे बॅनर तयार करण्यासाठी किमान दहा हजार पाचशे रुपये खर्च लागतो. तो मनपा तिजोरीतून जाईल. 

 

बातम्या आणखी आहेत...