आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात तणाव वाढवण्यात नशेखाेर अाघाडीवर; पाेलिसांनी अटकसत्राला केली सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नशेखोरांमुळे रविवारी रात्री आझाद चौकात तणाव वाढला होता. रहेमानिया कॉलनीसह नारेगाव परिसरातील तरुण या घटनेत प्रक्षोभक कृत्य करण्यास समोर असल्याचे समोर आले. पोलिसांचा तपास सुरू होताच यातील बहुतांश तरुण फरार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारपर्यंत यातील पाच तरुणांना अटक करण्यात अाली. इतरांचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


मागील सहा दिवसांमध्ये 'जय श्रीराम'चा नारा देण्याची बळजबरी करत मारहाण झाल्याची तक्रार काही तरुणांनी पोलिसांकडे केली. रविवारी रात्री बजरंग चौक ते माता मंदिर रस्त्यावरील एका बारजवळ अशीच घटना घडल्याचा आरोप तरुणांनी केला. परंतु घटनेने काही वेळेत वेगळे स्वरूप धारण केले. आझाद चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. ७०० ते ८०० तरुणांचा जमाव घोषणा देत जमा झाला होता. पोलिसांनी वेळीच जमावाला शांत करत वेगाने तपास करत घटनेत मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले.


घटनेनंतर पाहता पाहता तणावाचे व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. परंतु दुसऱ्याच दिवशी 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडून मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या फिर्यादीने तसे काहीच घडले नसल्याचे पोलिसांना सांगितले. तशा आशयाची फिर्याद देण्यास भाग पाडण्यात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे दोन्ही घटनांत त्या तरुणांची माथी भडकवून तक्रारीत तसा उल्लेख करायला भाग पाडलेले ते तीन ते चार समाजकंटक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले. 


नशेखोरांच्या विरोधात शोधमोहीम : तणावात नशेखोरांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याचे सिद्ध झाले. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी याला दुजोरा दिला. जिन्सी, कटकट गेट, रोशन गेट परिसरात नशाखोरांचे प्रमाण वाढल्याने अनेकदा येथे भर रस्त्यावर खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता नशेखोरांच्या विरोधात मोहीम राबवणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. पोलिसांकडून पदार्थ विकणाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे. 


राजकीय पुढाऱ्यावर होणार कारवाई; दीडशे लोकांच्या जमावावर गुन्हा दाखल 
तणावावेळी पोलिसांनी व्हिडिओ चित्रीकरण केले होते. जिन्सी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार अमिनोद्दीन कादरी यांनी सरकारी पक्षाकडून फिर्यादी होत अज्ञात दीडशे लोकांच्या जमावावर गुन्हा दाखल केला. जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकट केेंद्रे यांनी तत्काळ सूत्रे फिरवत व्हिडिओतील तरुणांना अटक करण्याची मोहीम हाती घेतली. उपनिरीक्षक दत्ता शेळके व पथकाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत शेख सलीम शेख अब्दुल करीम (३७, रा. रहीमनगर), सय्यद समीर सय्यद शौकत (२२, रा. इंदिरानगर), शेख रईस शेख रशीद (३९, रा. बायजीपुरा), शेख कलीम शेख सलीम (२३, रा. शरीफ कॉलनी), शेख सुफियान शेख इस्माईल (२०, रा. नारेगाव) यांना अटक केली. त्याशिवाय जमावातील तरुणांना भडकावण्याचे काम करणारा नगरसेवकदेखील पोलिसांच्या रडारवर आहे. 


आता फूड डिलिव्हरी कंपन्यांना वेळेचे नियम 
शहरात गस्त वाढवत वाहनचालकांची, वाहनांची तपासणी सुरू केली. त्याशिवाय शहरातील सर्व भागांतील हॉटेल, टपऱ्या रात्री अकरा वाजेनंतर बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले. रविवारी झालेल्या वादात एका फूड कंपनीचे डिलिव्हरी करणारे कर्मचारी होते. आता हॉटेल, टपऱ्यांसह त्यांच्यासाठीदेखील वेळेचे नियम लावण्यात येणार आहे. 


तणावाचे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई 
तणावाचे व्हिडिअाे साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. सायबर पाेलिस ठाण्याकडून हा व्हिडिअाे व्हायरल करणाऱ्यांचा शाेध सुरू करण्यात अाला. दरम्यान, फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी कुठलीही पाेस्ट, छायाचित्र, बॅनर, लेख पाठवू नये, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा देण्यात आला. 


दोन्ही घटनांमध्ये एकच व्यक्ती असल्याचा संशय 
'जय श्रीराम'ची घोषणा द्यायला भाग पाडण्याचा आरोप झालेल्या दोन्ही घटना केवळ रस्त्यावरील किरकोळ वाद असल्याचे स्पष्टीकरण पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले. परंतु काही हेतू असलेल्या लोकांनी दोन्ही घटनांना वेगळे वळण देऊन शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनांत एकच व्यक्ती असून त्याच्यावर लवकरच कडक कारवाई होईल, असेदेखील प्रसाद यांनी म्हटले. तर तणावातही शहरवासीयांनी संयम बाळगल्याने प्रसाद यांनी त्यांचे कौतुक केले. 

बातम्या आणखी आहेत...