आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुमित डोळे
औरंगाबाद - एका मैत्रिणीने दुसरीवर रागाच्या भरात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्तमश कॉलनी परिसरात रविवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या तांबे-तळेकर (29) असे मृत महिलेचे नाव आहे. ती आपली मैत्रीण निलोफर शेख (32) हिची भेट घेण्यासाठी अल्तमश कॉलनीत आली होती. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या वाद सुरू होता. सुरुवातीला स्थानिकांनी दुर्लक्ष केले. यानंतर आरडा-ओरड ऐकून लोकांनी गर्दी केली आणि निलोफरने विद्यावर जीवघेणे वार केल्याचे दिसून आले.
जीव जात असल्याचे पाहून स्वतःच घेऊन गेली रुग्णालयात
रागाच्या भरात निलोफरने विद्यावर वार केले तर केले. पण, आपली मैत्रीण रक्ताच्या थारोळ्यात पाहून निलोफरला शुद्ध आली. दुसऱ्याच क्षणी तिने विद्याला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. आपल्या 17 वर्षीय मुलासोबत ती विद्याला गंभीर जखमी अवस्थेत घेऊन एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत विद्याचा मृत्यू झाला होता.
रुग्णालयात कुटुंबियांमध्ये वाद
घटनेची माहिती कळताच दोघींचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले. त्यातून मोठा तणाव निर्माण झाला होता. सहायक आयुक्त गुणाजी सावंत, डॉ. दिनेश कोल्हे, सिडको पोलिस निरीक्षक अशोक गिरी, पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्र, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय पवार, दत्ता शेळके हे मोठ्या फौजफाट्या सह रुग्णालयात दाखल होऊन जमावाला पांगवले. तेवढ्यात निलोफर पळून जाण्याचा तयारीत असताना निरीक्षक गिरी व त्यांच्या पथकाने तिला पकडून जिन्सी पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिवलग मैत्रिणी होत्या निलोफर आणि विद्या...
जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये विद्याच्या कुटुंबाच्या तक्रारी वरून निलोफरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तिला अटक देखील करण्यात आली आहे. पैशांच्या वादातून खून करण्यात आल्याचा आरोप विद्याच्या नातेवाईकांनी केला आहे. परंतु, खरे कारण काय याचा सध्या शोध घेतला जात आहे. या दोघी जिवलग मैत्रिणी होत्या. विद्या अनेकवेळा तिच्याकडे जात होती. तर या दोघी कित्येकदा एकाच बाइकवर फिरायलाही जायच्या. स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निलोफर विवाहित असतानाही पतीपासून विभक्त एका भाड्याच्या घरात राहत होती. तर विद्या आपल्या पतीसोबत एसटी कॉलनीत राहत होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.