आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांचा चुकीच्या पद्धतीने राजीनामा; मंजूर न झाल्यास चूक सुधारण्याची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - 'राजीनामा देऊन विरोधी पक्षात बसायचे आहे का?' हा महापौरांनी विचारलेला प्रश्न जिव्हारी लागल्याने भाजपचे विजय औताडे यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा थेट आयुक्तांना सादर केला. पण, तो स्वीकारण्याचा अधिकार कायद्याने आयुक्तांना नाही. त्यामुळे तो मंजूर होण्याची शक्यता नाही. तसे झाले तर आपण पुन्हा महापौरांकडे राजीनामा देऊ, असे त्यांनी नंतर 'दिव्य मराठी'ला सांगितले. दरम्यान, उपमहापौरांचा राजीनामा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्षाची ती भूमिका नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी जाहीर केले. २०१९-२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. त्याआधी भाजप नगरसेवकांची बैठक झाली. त्यात शिवसेना आणि महापौर यांची कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उचलायचा, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसार सभागृहात हा मुद्दा मांडण्यासाठी आणि उद्धव ठाकरे सरकारने याेजनेला स्थगिती दिली, असे सांगत स्थगितीचा निषेध करण्यासाठी उपमहापौर औताडे पीठासनावरून उतरून खाली येऊन बसले. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांना कारण विचारले. शिवसेनेचे केंद्रातील मंत्री राजीनामा देऊन जसे विरोधी पक्षात बसले तसा तुमचा विचार आहे का, असा प्रश्न महापौरांनी विचारताच उपमहापौरांना तो जिव्हारी लागला. त्यांनी 'तुम्हाला राजीनामाच हवा असेल तर १० मिनिटांत देतो' असे सांगत सभागृहातच राजीनाम्यावर सही केली आणि तो आयुक्तांकडे सोपवला. आयुक्तांच्याच नावे तो लिहिला होता. त्यामुळे आयुक्तांनी तो नगरसचिवांकडे पाठवला. नगरसचिवांनी त्यावर निर्णय घेण्याचा प्रशासनाला अधिकार नसल्याचे मत दिले. दरम्यान, शहराच्या नव्या पाणी योजनेला उद्धव ठाकरे सरकारने कोणतीही स्थगिती दिलेली नाही, असे महापौर म्हणाले.

हा वैयक्तिक निर्णय
भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली. महापौर बोलल्यामुळे औताडे यांनी तातडीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असून पक्षाने त्यांना तसे काही निर्देश दिलेले नव्हते, असे ते म्हणाले. उपमहापौरांचा राजीनामा महापौर मागत असतील तर तेही युतीचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला तर आमचे सर्व नगरसेवकही राजीनामा देतील, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात शहराध्यक्षांनी स्पष्ट केले. या संदर्भात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता महापौरांना सोपवेन : औताडे
दरम्यान, राजीनामाच द्यायचा होता तर तो रीतसर महापौरांच्या नावे लिहून त्यांनाच का नाही सोपवला, असा थेट प्रश्न 'दिव्य मराठी' ने विजय औताडे यांना विचारला. त्यावर घाईघाईत आयुक्तांच्या नावे दिले गेला. पण, तो स्वीकारला गेला नाही तर पुन्हा महापौरांच्या नावे राजीनामा लिहून आपण तो त्यांना सोपवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

सभापतीही राजीनामा देतील का?
उपमहापौर औताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभागृहात शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांत चांगलीच जुंपली. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू झाली. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी स्थायी समिती सभापतीदेखील युतीचेच आहेत. मग, तेही राजीनामा देतील का, असा थेट प्रश्न उपस्थित केला.