Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | aurangabad new, Abhay wagh mohitkar and jadhav to step down amid MAT decision

मॅटचा दणका: उच्च-तंत्रशिक्षण संचालकांसह तिघे होणार पायउतार, तावडेंच्या कार्यशैलीवर पुन्हा प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 10:50 AM IST

13 जानेवारी 2017 रोजी केला होता नवा सेवानियम

 • aurangabad new, Abhay wagh mohitkar and jadhav to step down amid MAT decision

  औरंगाबाद - राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी केवळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाशी संबंधित जागांचाच विचार करून १३ जानेवारी २०१७ नवा सेवानियम केला. मात्र, यात इतर विभागांचाही समावेश करून नियुक्तीसाठी नव्याने प्रक्रिया राबवावी, असे निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अौरंगाबाद पीठाचे व्हाइस चेअरमन न्या. एम. टी. जोशी आणि सदस्य अतुल चढ्ढा यांनी दिले असून शासनाने तयार केलेले सेवानियम रद्द केले आहेत. मॅटच्या या निर्णयामुळे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे आता संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक डॉ. विनोद मोहितकर आणि दत्तात्रय जाधव यांना पायउतार व्हावे लागणार आहे.


  दरम्यान, या नियुक्त्यांसाठी आठ महिन्यांत नवीन सेवाप्रवेश नियम तयार करून पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करावी व तंत्रशिक्षण संचालकांसह इतर पदे भरावीत, असे आदेश मॅटने दिले आहेत. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माण शास्त्रासह इतर विभागांचा समावेश करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) १९८७ मध्ये तयार केलेल्या कायद्याच्या कलम २ (जी) मध्ये हे स्पष्ट केले आहे. असे असतानाही केवळ काही व्यक्तींसाठी राज्य शासनाने १३ जानेवारी २०१७ रोजी सेवाप्रवेश नियम तयार करताना केवळ उर्वरित. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या उमेदवारांमधूनच उच्च व तंत्रशिक्षण संचालक, उपसंचालक, सहसंचालक तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाअंतर्गत असलेले सचिव, उपसचिव, सहसचिव आदी पदांची भरती करण्याचे निश्चित केले.


  चालाखी झाली उघड
  संबंधित पदाची जाहिरात राज्य लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केल्यानंतर संकेतस्थळावर अर्ज भरताना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विषयाची शैक्षणिक पात्रता असलेल्यांचे अर्ज स्वीकारले जाऊ लागले. वास्तुविशारदशास्त्र, आैषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अर्हतेच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जात नव्हते. यासंबंधी लोकसेवा आयोगाकडे विचारणा केली असता सेवाप्रवेश नियमात इतर शाखांचा अंतर्भाव करण्यात आला नसल्याची बाब समोर आली.


  साबीर हुसेन यांची मॅटमध्ये धाव
  असोशिएशन ऑफ फार्मसी टिचर्स ऑफ इंडिया (एपीटीआय) यांच्या वतीने साबीर हुसेन अख्तर यांनी या प्रकरणी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने १० नोव्हेंबर २०१७ रोजी अंतरिम आदेशाद्वारे भरती प्रक्रियेस स्थगिती दिली नव्हती, परंतु ही प्रक्रिया मॅटच्या अंतिम निकालाच्या अधिन राहील, असे आदेश दिले होते. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. विनोद काकडे, शासनातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ एल. एम. आचार्य तर लोकसेवा आयोगातर्फे एम. आर. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Trending