दारूडे खुलेआम ढोसतात, / दारूडे खुलेआम ढोसतात, पेंगतात, भांडतात कारवाई शून्य; यंत्रणा झोपली आहे काय..?

Feb 07,2019 12:37:00 PM IST

डीबी स्टार छापा- चिकलठाण्यातील द्वारकेश व्यापारी संकुल तळीरामांचा अड्डा बनले आहे. येथील मद्यविक्रीच्या दुकानातून लोक दारू विकत घेतात आणि तिथेच खुलेआम दारू पितात. एवढेच नव्हे, तर भररस्त्यात पेंगतात. कुणी तिथेच लोळत पडतात. दारू चढल्यावर हे तळीराम आपसात जोरजोरात भांडतात. शिवाय परिसरात 8 ते 10 लोक अवैधरित्याही मद्यविक्री करतात. त्यांनी या तळीरामांसाठी खास पाणी पाऊच, बसण्यासाठी जागा आणि अन्य सोय केल्यानेच हे प्रकार होत असल्याचा अनेक महिलांचा आरोप आहे. आतापर्यंत पोलिसांकडे तब्बल ३५ तक्रारी केल्या, उत्पादन शुल्ककडेही तक्रारी दिल्या. पण कारवाईच होत नसल्याने या संकुलातील लोक त्रस्त झाले आहेत.


चिकलठाण्यासह मनपा हद्दीतील शेकडो वसाहती आणि आसपासच्या पंचक्रोशीतील पाच- पन्नास गावांना दैनंदिन उपयोगासाठी लागणारी साधने उपलब्ध करून देण्यासाठीच १९८५ मध्ये हा द्वारकेश मार्केट परिसर उभा करण्यात आला. या संकुलात ६४ गाळे आहेत. जालना रोडच्या दिशेने शॉप नंबर ६३ हा माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ यांच्या मालकीचा एक गाळा याच संकुलात आहे. हा गाळा त्यांनी दहा वर्षांपूर्वी परवानाधारक विजया महेंद्र जैस्वाल यांना भाडेतत्त्वावर दिलेला आहे. तेथे जैस्वाल यांनी जिनियस नावाचे वाइन शॉप सुरू केले आहे. त्यामुळे व्यापारी संकुल परिसरात चिकलठाण्यासह आसपासच्या वसाहती आणि गावातील तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप गावकरी, महिला, मुली आणि गाळेधारक तसेच येथे येणाऱ्या ग्राहकांनी केला आहे. शिवाय याच परिसरात इतर काही लोकही अवैधरीत्या दारू विकतात.


तळमजल्यात केली सोय
याच संकुलाच्या तळमजल्यात बंद पडलेल्या आठ गाळ्यांच्या बोळीत तसेच पार्किंगच्या पश्चिमेला खुल्या जागेवर तट्टर थाटून इतर काहींनी अवैध मद्यविक्री सुरू केली आहे. सोबतच प्लास्टिक ग्लास आणि पाणी पाऊचसह तळीरामांना बसण्याची सोय करण्यात आल्याचा आरोप या संकुलातील अनेक गाळेधारकांनी तसेच चिकलठाण्यातील असंख्य महिलांनी केला आहे.


तक्रारींकडे कानाडोळा
तळीरामांच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या नगरसेविका, गाळेधारक आणि चिकलठाण्यातील महिलांनी एकत्र येऊन पोलिस आयुक्त, एमआयडीसी पोलिस स्टेशन, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक आणि मनपा आयुक्तांना ९ नोव्हेंबर २०१५ रोजी लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर महिलांनी सातत्याने एमआयडीसी पोलिस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन तेथील अधिकाऱ्यांसमोर व्यथा मांडल्या. वारंवार पाठपुरावा केला. आजवर पोलिसांना तब्बल ३५ वेळा तक्रारी दिल्याचे नगरसेविकेनेही सांगितले. त्यानंतरही ना पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला ना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून. त्यामुळे मद्यपींचा 'तमाशा' सुरूच आहे.


काय म्हणतो कायदा
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ८५ नुसार जी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जागी लोकांना प्रवेश मिळू शकतो अथवा परवानगी मिळू शकते अशा जागी दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागेल तिला सिद्धापराध ठरवण्यात आले आहे. पहिल्या अपराधाबद्दल सहा महिन्यांपर्यंत वाढवता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या सश्रम कारावासाची व दहा हजार रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकेल इतक्या द्रव्य दंडाची शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्या अपराधात एक वर्षाचा सश्रम कारावास तसेच दहा हजारांचा द्रव्यदंड अशा शिक्षेची तरतूद आहे.


काय म्हणतात गाळेधारक अन् चिकलठाण्यातील महिला

 • विशेष म्हणजे द्वारकेश मार्केटच्या पीरआर कार्डवर गाळा क्रमांक ६३ चा उल्लेखच नाही. शिवाय द्वारकेश मार्केटला अद्याप मनपाचे भाेगवटा प्रमाणपत्रही मिळालेले नाही. तरीही मग या वाइन शॉपला परवाना मिळालाच कसा, असा सवालही येथील नागरिक करत आहेत.
 • व्यापारी संकुलात आणि जालना रोडलगत पानटपऱ्यांवर प्लास्टिक ग्लास, पाणी पाऊच सहज उपलब्ध होते. यामुळे या भागातील बाहेरगावचे मद्यपी वाइन शॉपसमोरच उभे राहून ढोसतात.
 • अनेक मद्यपी नशेच्या झोकात येथेच पेंगतात, रस्त्यावर भांडणेही करतात. रात्रभर हा तमाशा सुरू असतो.
 • व्यापारी संकुलासमोर दारूच्या बाटल्या आणि पाण्याच्या पाऊचचा खच पडलेला असतो.
 • तळीरामांचे टोळकेच्या टोळके एखाद्या जत्रेप्रमाणे येथे जमते. संकुलात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांना, मुलींना यामुळे त्रास होतो.
 • बस थांबे, रिक्षा थांब्यांवर उभ्या असणाऱ्या महिला तसेच शाळेत मुलांची ने -आण करणाऱ्या महिलांची कुचंबणा होते.
 • व्यापारी संकुलाच्या समोरील पार्किंगमध्ये दिवसरात्र अॅपेरिक्षा, दुचाकी आणि टॅक्सी उभ्या करून या ठिकाणीच दारू पिली जाते.

मीच कार्यालय सोडले
माझ्या आधीचे नगरसेवक रवी कावडे आणि त्यानंतर मी गेल्या चार वर्षांपासून येथील मद्य विक्रीचा हा प्रकार बंद करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. दारूड्यांच्या त्रासापासून जनतेस मुक्त करण्याची जबाबदारी असताना याच व्यापारी संकुलात दारू दुकानाशेजारी असलेले माझे कार्यालय मला बंद करावे लागले. वेळोवेळी संबंधित विभागांना तक्रारी करूनदेखील काहीच परिणाम झाला नाही. उलट दारू विक्रेत्याकडून महिलांना त्रास होऊ लागला आहे.

-वैशाली जाधव, नगरसेविका


माझे काम कायदेशीरच आहे
मी भाडेतत्त्वावर दुकान घेताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच रीतसर परवाना घेतला आहे. आमच्या वाइन शॉपमध्ये अजिबात पाण्याचे पाऊच आणि प्लास्टिक ग्लास विकले जात नाहीत. शेजारी आजूबाजूला असा प्रकार सुरू असल्याचे माझ्या कानावर आले आहे, पण मी त्यांना थांबवू शकत नाही. नियमाप्रमाणे काउंटरवरून सीलबंद बाटली विकणे हेच आमचे काम आहे. बाहेर जाऊन मद्यपीने बाटली फोडली अथवा कुठे ढोसली याच्याशी आमचा काडीमात्र संबंध नसतो.

-महेंद्र जैस्वाल, संचालक, वाइन शॉप


कार्यवाही करतो....
अद्याप याप्रकरणी आमच्याकडे एकही तक्रार नाही, आजच संबंधित स्पॉटवर स्क्वाड पाठवून कार्यवाही करतो. -प्रदीप वाळूंजकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क


...ते शॉप तर बंद करू
खरं तर आधी ही जागा गट क्रमांक ७३७ चाच एक भाग होती. सामान्य रुग्णालयाला जागा भूसंपादन करताना ही जागाही सरकारजमा होणार होती. तत्कालीन एसडीएम यांच्याकडे जागेचे सर्व पुरावे देत ही जागा सरकारच्या तावडीतून सोडवली. तेव्हा कुठे येथे व्यापारी संकुल उभे राहिले. याबाबत लोकांनी माझ्याकडे तक्रार केली असती तर मीच दारू दुकान रिकामे करून दिले असते. खरोखर महिलांना त्रास होतो काय, याची मी माहिती घेतो, तथ्य आढळले तर लगेच हे दुकान बंद करतो. -भाऊसाहेब वाघ, माजी उपमहापौर


तीन वेळा छापे मारून कारवाई केली
मुळात उत्पादन शुल्कची ही जबाबदारी आहे. त्यांनी आमच्याकडे पोलिस बंदोबस्ताची मागणी केली तर ती आम्ही वेळोवेळी देतो. असे असतानाही सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर तेथे तीन वेळा छापा मोहीम राबवली आहे. संबंधित मद्यपींवर एफआयआरही नोंदवले आहेत. लोकांच्या जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा तेव्हा तेथे सातत्याने कारवाई करतो. तेथील वाइन शॉपवर दारू घेतात आणि तिथेच पितात ही गोष्ट मला मान्य आहे. आता तेथे कारवाईत सातत्य ठेवू. -सुरेंद्र माळाळे, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे


पुढच्या स्लाइडवर पाहा, डीबी स्टारच्या छाप्यातील काही छायाचित्रे...

X