आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उणे चार तापमान, 10 इंच बर्फाच्या थरातून प्रौढांचे 12 हजार फूट उंचीवर ट्रेकिंग 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - साठी उलटलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह चाळिशीतील प्रौढांच्या चार जणांच्या तुकडीने जानेवारी महिन्यात उणे चार तापमान, दहा इंच बर्फाचा थर आणि शरीर गोठवणाऱ्या थंडीत १६ किमीची वाट पायी तुडवत ३६८८ मीटर अर्थात १२ हजार फूट उंचीचे नेपाळमधील संदक फु शिखर सर करण्याचा पराक्रम केला आहे. 


गड किल्ले, डोंगरमाथ्यावर ट्रेकिंग करण्याचा ट्रेंड हल्ली तरुणांमध्ये वाढतो आहे. तरुणांच्या बरोबरीने शहरातील ज्येष्ठ नागरिक डॉ. चंद्रशेखर चापोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. ऋषिकेश ठाकरे, उद्योजक सुशील पिपाडा व बांधकाम व्यावसायिक मेहराज शेख यांच्यासह इतर काही सदस्यांनी तीन वर्षांपूर्वी ट्रेकिंगला जाण्याचे ठरवले. ६३ वर्षे वय असलेल्या चापोरकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन राज्यातील विविध छोटे-मोठे ट्रेक त्यांनी केले. यंदा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी नेपाळमधील संदक फु या १२ हजार फूट उंचीच्या शिखरावर ट्रेकिंग करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी औरंगाबादचे एव्हरेस्टवीर शेख रफिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर परिसरात असलेल्या टेकड्या, किल्ले, डोंगरमाथ्यावर सराव केला. २१ जानेवारी रोजी त्यांच्या संदक फु ट्रेकची सुरुवात झाली. दार्जिलिंगमार्गे मानेभजंगला पोहोचले. समुद्रसपाटीपासून ८ हजार ५०० फूट उंचीवरून त्यांनी संदक फुकडे कूच केली.
 
२२ जानेवारी रोजी हा चमू सहा किलोमीटर चालून समुद्रसपाटीपासून १० हजार १३० फूट उंचीवर असलेल्या टोंगलू येथे पोहोचला. घनदाट अरण्य, चढ-उतारात हिडोडेंड्रॉनचे जंगल जगप्रसिद्ध आहे. ही वाट पुढे नेपाळमध्ये जाते. मध्ये लागलेल्या स्थानिकांच्या वाडीवर मुक्काम करत २३ जानेवारी रोजी सकाळीच टुंबलिंगमार्गे गरिबियाससाठी निघाले. दुपारी १२ वाजेनंतरच ढगांची चादर अंथरण्यास सुरुवात होते. हातात, पायात एकावर एक दोन मोजे, तीन ते चार जॅकेट परिधान केेलेेे. रात्री मुक्काम करून २३ जानेवारी रोजी खरा प्रवास सुरू झाला तो संदक फु चा. गरिबियासनंतर कालापोखरीवरून चढाई सुरू झाली. वरून हलका बर्फ पडण्यास सुरुवात झाली होती. पाहता पाहता काही तासांत सर्व वाटेवर सुमारे १० इंच बर्फाचा चिखल झाला. प्रत्येक जण एकमेकांचा विश्वास वाढवत हाेता. धीर देत होता. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. गाइडने केलेले मार्गदर्शन तंतोतंत पाळले जात होते. निसरडी वाट, वरून पडणारा बर्फ, उणे चार तापमान व सोळा किलोमीटरचा निर्मनुष्य परिसर त्यांनी आठ तासांत सर केला व सर्वांनीच एकमेकांचे अभिनंदन करत सुटकेचा नि:श्वास सोडला. सायंकाळी तेथेच शेकोटी पेटवून मुक्काम करत जितके अंतर चढले तितकेच उतरण्यास सुरुवात झाली. कधी गुडघे तर कधी केवळ पायांच्या बोटांच्या आधारे उतरावे लागत होते. परंतु वयाचे बंधन केव्हाच झुगारलेल्या या चारही जणांनी सहज उतरण्याचे मार्गक्रमणही पूर्ण केले. 

 

प्रत्येक मॅरेथॉनमध्ये सहभाग 
तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास केवळ ट्रेकिंगपुरताच न ठेवता या ग्रुपने प्रत्येक मॅरेथॉनमध्ये हिरीरीने सहभागी होण्याचे ठरवले. शहरासह जवळपास होणाऱ्या प्रत्येक मॅरेथॉनमध्ये या ग्रुपमधील सदस्य सहभागी होतात. यासाठी आवश्यक ती तयारीदेखील करतात. 

उणे चार तापमान, दहा इंच बर्फाच्या थरातून औरंगाबादेतील ज्येष्ठ... 


ट्रेकिंगदरम्यान निसर्गाचेही भान 
स्वत:मुळे कचरा होणार नाही याचे भान ठेवतानाच ट्रेकिंगदरम्यान कचरा आढळल्यास तोदेखील ते उचलून घेतात. सुंदर व आकर्षक अशा निसर्गात कोणी कचरा करताना आढळल्यास चीड निर्माण होते, असे ते सांगतात. मार्गावर आढळून आलेले चॉकलेटचे रॅपरदेखील ते बॅगमध्ये ठेवतात. 


सकारात्मक दृष्टिकोन निर्माण 
ट्रेकिंगसारख्या एका माध्यमातून अनेक गोष्टी साध्य करतात येतात. ट्रेकिंगमुळे व्यायामाची सवय राहते. निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे अशा मोठ्या व आव्हानात्मक ट्रेकिंग केल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. प्रत्येकाने भीती काढून वयाची बंधने झुगारून आवश्यक मार्गदर्शन, सल्ला घेऊन ट्रेकिंग सुरू करावी. -डॉ. चंद्रशेखर चापोरकर, ट्रेकर्स. 

 

एक किलोमीटर चालण्यासाठी एक तास 
साधारण व्यक्तीचा पायी चालण्याचे प्रमाण सरासरी १ किलोमीटरला ७ मिनिटे लागतात, परंतु संदक फुला एक ते दीड किलोमीटर पायी चालण्यासाठी दीड तास लागतो. 


 ३६८८ मीटर उंच. समुद्रसपाटीपासून 
 प. बंगाल व नेपाळ सीमेवरील सर्वाधिक उंच 
 

बातम्या आणखी आहेत...