आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-शहादा बस अपघात: दारूच्या नशेत होता ट्रकचालक; मृतांत आठ जण शहाद्याचे रहिवासी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार, शहादा - औरंगाबादहून शहाद्याला जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या कंटेनरने रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास धडक दिली होती. या भीषण अपघातात १३ प्रवासी ठार झाले, तर ३५ जण जखमी झाले. ट्रकचालक मद्याच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवल्यानेच हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. अपघातानंतर बसमध्ये रक्ताचा सडा पडला होता.  

शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावाजवळ औरंगाबाद-शहादा बस (एचएम २० बीएल ३७५६) ला समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (एपी २९ व्ही ७५७६) एसटीला धडक दिली. ही धडक इतकी जाेरदार होती की, एसटीचा एक भाग संपूर्ण कापला गेला. अपघातानंतर जखमींना धुळे, नंदुरबार जिल्हा रुग्णालय, शहादा, दोंडाईचा येथील खासगी रुग्णालयात  दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यावर रविवारी रात्री अनेकांनी शहादा बसस्थानकात धाव घेतली. ज्यांचे नातेवाईक या बसने प्रवास करत होते त्यांनी बसस्थानकात येऊन चौकशी केली. मात्र, नेमकी माहिती मिळत नसल्याने नातेवाइकांसह नागरिकांनी  रात्रीच निमगूळ येथे धाव घेतली. एक हजारापेक्षा अधिक नागरिक निमगूळ येथे जमले होते. या अपघातात आप्तेष्ट मृत झाल्याचे कळताच नातेवाइकांनी आक्रोश केला होता. ज्यांचे नातेवाईक जखमी होते त्यांनी शासकीय व खासगी रुग्णालयात विचारपूस केली. संपूर्ण रात्रभर मृत व जखमी प्रवाशांच्या नातेवाइकांनी केलेला आक्रोश पाहून सर्वसामान्यही गहिवरले होते. अपघातातील मृतांचे पार्थिव टप्प्याटप्प्याने सोमवारी शहादा शहरात आणण्यात आले. नऊपैकी आठ जणांवर शहादा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

मृतांची नावे अशी
या अपघातात बसचालक मुकेश नगीन पाटील, कंटेनरचालक संतोष काशीनाथ ठोंबरे (रा. टुणकी, वैजापूर, औरंगाबाद), शकील मोहंंमद बागवान, प्रेरणा श्रीराम वंजारी, वृषाली दीपक भावसार, संजय ताराचंद अलकारी (शिरूड, ता. शहादा), सौरभ श्रीराम वंजारी, तेजस जगदीश भावसार (१४, सुयोग बन्सीला नाहटा, सर्व रा. शहादा) तसेच इद्रिस नासिर मन्यार तळोदा, हस्तिक आनंद वाघचौरे (रा. ठाणे), सोमनाथ पांडू पाटील (रा. चाळीसगाव), मनीषा महेश बागल (रा. निमगूळ ता. शिंदखेडा) यांचा मृत्यू झाला. यात ९ पुरुष, ३ महिला व एका मुलाचा समावेश आहे.

एसटीकडून मृतांच्या वारसांना १० लाख रुपये
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार १० लाख रुपयांची मदत करण्यात येईल, मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. दरम्यान,  मृताच्या वारसांना तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये, तर जखमींना एक हजार रुपयांची मदत दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...