आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी बेदम मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले.
सोशल मीडियासह वृत्तवाहिन्यांनी ते प्रसारित केले. तरीसुद्धा 'असा प्रकार घडलाच नाही' असा पवित्रा महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी (१८ ऑगस्ट) घेतला. माझे वक्तव्य स्पष्ट करणारे फुटेज प्रस्तावासह शासनाकडे पाठवणार असल्याचे ते म्हणाले. तर या प्रकरणात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. दरम्यान, सिटी चौक पोलिसांनी शुक्रवारी रात्री मतीनला अटक केली. तसेच मनपासमोर वाहनांची तोडफोड करणारा पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी, आवेज मोहंमद सिद्दिकी यांनादेखील अटक करण्यात आली.
शासकीय पुरावाच ठरणार महत्त्वाचा
सभेत प्रशासनाच्या वतीने अधिकृतरीत्या चित्रीकरण करण्यात येते. यात कोणता सदस्य काय बोलला याची नाेंद होते. अनेक ठिकाणी हा पुरावा ग्राह्य ठरतो. मतीन प्रकरणातील अहवाल शासनास पाठवताना हेच चित्रीकरण शासकीय पुरावा ग्राह्य धरण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयुक्त डॉ. निपुण होते प्रत्यक्षदर्शी
जो प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा आहे, त्यावर अंतिम शिक्कामोर्तब आयुक्तांकडून करण्यात येणार आहे. मारहाण होताना आयुक्तच प्रत्यक्षदर्शी असल्याने शासनाला नेमका कसा प्रस्ताव पाठवला जाईल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
मतीनसह कुरेशी, सिद्दिकीला रात्रीतून अटक
सय्यद मतीन याला सिटी चौक पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच अटक केली. तसेच मनपासमोर वाहनांची तोडफोड करून घोषणा देत पोलिसांना दमदाटी करणारा एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी व आवेज मोहंमद सिद्दिकी (३०, रा. रोहिला गल्ली) या दोघांना पहाटे तीन वाजता अटक करण्यात आली. मारहाण झाल्यानंतर मतीन घाटीत दाखल झाला होता. डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्यास परवानगी दिल्यानंतरही त्याने डिस्चार्ज घेण्यास नकार दिला होता. परंतु रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली.
दुसऱ्या दिवशीही प्रस्ताव तयार नव्हता
सभेतील ठराव आणि कारणापुरता उतारा अहवाल शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत देण्यात आला नव्हता. साडेपाचनंतर ठराव मनपा आयुक्तांकडे पाठवण्यात आला. तेव्हा आयुक्त सातारा प्रभागात पाहणी करत होते. त्यामुळे हा प्रस्ताव सोमवारी पाठवण्याची शक्यता आहे.
'त्यांना'ही अटक करू
मतीनच्या तक्रारीनुसार भाजप नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनाही लवकरच अटक करू, असे सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.