आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-येडशी राष्ट्रीय मार्गाचे गेवराईत लोकार्पण, नितीन गडकरी यांचे आता मराठवाड्यासाठी ‘मिशन पाणी’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - आैरंगाबाद-येडशी या १९० किमी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. या वेळी गडकरींनी मराठवाड्यासाठी त्यांच्या आगामी नव्या मिशनची घाेषणा केली. मराठवाड्याच्या रस्ते विकासासाठी ६१ हजार काेटींच्या कामांना मंजुरी दिल्याचे सांगून आता रस्ते विकासासाेबत मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्नही साेडवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुमारे दाेन हजार काेटींचा हा प्रकल्प आहे. 


या समारंभाला पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, राजेंद्र मस्के, रमेश आडसकर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमास गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. परंतु मुख्यमंत्री  येऊ शकले नाहीत, तर गडकरी आचारसंहितेपूर्वी नागपुरातील विकास कामांच्या उद्घाटनांत व्यग्र होते.


जायकवाडी ८० टक्के भरणार
मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण ४० टक्क्यांच्या वर कधी जात नाही. नदीजाेड प्रकल्पाच्या माध्यमातून हे धरण ८० टक्के भरेल व मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटेल. याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझी असेल, असे गडकरी म्हणाले.  इथेनॉलपासून बायोप्लास्टिक निर्मिती करून गाव व शेतकरी रोजगारामुळे समृद्ध  होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


येडशी-औरंगाबाद मार्गावर ३ टोल
येडशी-औरंगाबाद या अंतरात एकूण तीन टोलनाके आहेत. पहिला टोलनाका उस्मानाबाद जिल्ह्यातील पारगाव, दुसरा गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी तर तिसरा टोल अंबड तालुक्यातील भोकरवाडी येथे आहे. हे तिन्ही टोलनाके अजून सुरू नाहीत. दोन दिवसांत दरनिश्चिती झाल्यानंतर ते सुरू होणार आहेत. सध्या १९० पैकी १६२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गावरील अपूर्ण टप्पे वगळून टोल आकारला जाईल, अशी माहिती गेवराई येथील आयआरबीचे मॅनेजर महेश पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...