आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या बालकाला सरकारी मदतीमुळे जीवदान; त्याच्या आत्याने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी कृतज्ञतेतून पाठवली १०१ रुपयांची मनिऑर्डर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘माझ्या वाढदिवसानिमित्त खर्चाची उधळपट्टी करण्यापेक्षा मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करा,’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध व्यक्ती, संस्थांनी तब्बल पावणेदाेन काेटींच्या देणग्या साेमवारी एका दिवसात या निधीत दिल्या. मात्र या सर्व देणग्यांत अमूल्य ठरली ती नगर जिल्ह्यातील मजुरी करणाऱ्या महिलेने पाठवलेली १०१ रुपयांची मनिआॅर्डर.  

 

आपल्या कॅन्सरग्रस्त भाच्याला मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या मदतीमुळे जीवदान मिळाल्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेतून या महिलेने ही मदत पाठवली. औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता. गंगापूर) येथील वेदांत भागवत पवार हा पाचवर्षीय बालक पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित होता. वेदांतचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात, तर आई शेतात मजुरी करते. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मुलाच्या उपचाराचा खर्च  पेलवणे शक्य नव्हते. नातेवाइकांनी आपापल्या परीने मदत केली, मात्र पैसे अपुरे पडत हाेते. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त हाेते. या बालकाची आत्या रेणुका सुनील गोंधळी नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. नेवासा) येथे राहतात. त्यांनी वेदांतच्या उपचारासाठी मदतीचा संदेश मोबाइल फाेनवरून मुख्यमंत्र्यांना पाठवला. या संदेशाची दखल घेऊन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून या बालकावरील उपचारापोटी तत्काळ एक लाख ९० हजारांची मदत करण्यात आली. त्याआधारे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदांतवर उपचार झाले व त्याला जीवदान मिळाले हाेते.

 

महिलेचे पत्र वाचून मुख्यमंत्रीही गहिवरले
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी साेमवारी पाठवले. ‘आपण माझ्या एका मेसेजवरून माझ्या भाच्याला जीवदान दिलेत. अशीच सेवा आपल्या हातून घडत राहाे. यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प रक्कम मी पाठवत आहे,’ असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिले. हे पत्र वाचून मुख्यमंत्र्यांच्याही डाेळ्यातून अश्रू तरळले.