आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादकरांच्या पायाखालची ‘जमीन’ सरकणार..! शहरातील अनेक एकर जमिनींवर निझामाच्या वंशजांनी केला दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादकरांच्या पायाखालची ‘जमीन’ लवकरच सरकणार आहे. शहरातील नौखंडा महाल, अहमदी बाग, हिमायत बाग आणि चंदन चबुतरा या मालमत्तांवर निझामाच्या आठव्या वंशजांनी दावा केला असून या जमिनी आठवे निझामशहा मीर मुकर्रम शाह बहादूर यांच्या तुर्कस्तानातील नात प्रिन्सेस आसरा यांनी परत मागितल्या आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना भेटून तक्रारही केली. यानंतर विभागीय आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी सहासदस्यीय समिती स्थापन करून त्यावर कामही सुरू केले आहे. दरम्यान, या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

 

कुठून कुठपर्यंत आहे प्रॉपर्टीज
शहरात ‘ब्ल्यू बुक’ प्रॉपर्टीजपैकी नौखंडा महालाची मालमत्ता ज्युबिली पार्क ते महमूद दरवाजापर्यंत असून येथे नौखंडा महाल व गद्दी मुबारक, मशीद आणि आशूरखाना वास्तू आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आशूरखाना भुईसपाट झाला, तर नौखंडा महाल व मशीद आपले अस्तित्व वाचवण्याची धडपड करत आहेत.

 

अशी आहे चतु:सीमा
‘ब्ल्यू बुक’ मालमत्तांची चतु:सीमा पश्चिमेस खाम नदी, पूर्वेस हर्सूल रोड, उत्तरेस खाम नदी आणि दक्षिणेस फसील अर्थात सुरक्षा भिंतीपर्यंत विस्तारलेली आहे. यात गद्दी मुबारक नौखंडा महालाची एकूण मालमत्ता शासकीय नोंदीनुसार २३ एकर ३८ गुंठे, अहमदी बागेची ९४ एकर, हिमायत बागेची १६९ एकर व याव्यतिरिक्त चांदनी चबुतरासोबत इतर शेकडो एकर जमीन असल्याचा आसरा यांचा दावा आहे. 

 

२०२४ मध्ये संपुष्टात येणार भाडेकरार
सातवे निझाम दिवंगत मीर उस्मान अली यांचे सुपुत्र मीर बरकत अली खान बहादूर हे या ‘ब्ल्यू बुक’ प्रॉपर्टीचे आर्टिकल ३६६ (२२) नुसार कायदेशीर वारसदार आहेत. नौखंडा महालाच्या मालमत्तेची तीन एकर जागा मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेला शैक्षणिक कार्यासाठी पन्नास वर्षांसाठी शंभर रुपये प्रतिवर्ष भाडेत्त्वावर देण्यात आली होती. तो भाडेकरार २०२४ ला संपणार आहे. त्यामुळे कायद्यानुसार या डायनेस्टिक प्रॉपर्टीवर निझामशाह मुकर्रम जाह बहादूर यांच्या वारसाचा अधिकार असेल.


काय आहे ‘ब्ल्यू बुक’ प्रॉपर्टीचा नेमका अर्थ?
२५ जानेवारी १९५० रोजी भारत सरकार आणि सातवे निझाम मीर उस्मान अली खान यांच्यात एक ऐतिहासिक करार झाला होता. या करारानुसार भारतातील समस्त निझामी संपत्तीला ‘ब्ल्यू बुक’ संपत्ती असण्याचा घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. या मालमत्ता निझामशाहीच्या खासगी व वैयक्तिक वक्फ मालमत्ता असल्याने त्यांचे कायमस्वरूपी मुतव्वलीदेखील (मालक) निझामशाह असतील, असा करार होता. यात या ऐतिहासिक मालमत्ता सुरक्षित व अबाधित ठेवण्याची घटनात्मक जबाबदारी प्रशासनाची असेल, असे करारात नमूद असल्याचे आसरा सांगतात. 


अतिक्रमण लवकर काढा
निझामांच्या मालमत्तेवरील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे. यावर त्यांच्या वंशजांचा हक्क आहे. सरकारने या कामाकडे लक्ष देत यावर लवकरात लवकर कारवाई करावी.
- सय्यद खैरुद्दीन, पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर, हैदराबाद. 

बातम्या आणखी आहेत...