'संभाजीनगर' / लवकरच औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर होणार, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची माहिती

  • औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? राज ठाकरेंचा सवाल

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 04:46:00 PM IST

औरंगाबाद- औरंगाबादची शहराचं नाव संभाजीनगर करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माहिती दिली. ''औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व कागदपत्रे मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का मिळणार," असे खैरे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.


याबाबत बोलताना खैरै म्हणाले की, "लोकसभा आणि विधानसभेत आम्ही संभाजीनगर म्हणूनच उल्लेख करतो. अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यत सगळ्यांकडे ही मागणी मी लावून धरली होती. विधानसभेतही प्रश्न मांडले होते. चार वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले," असे खैरे म्हणाले. याशिवाय, "संभाजीनगरच्या मुद्द्यावर महापालिका निवडणूक जिंकू शकतो, असे वाटल्यामुळे मनसेने ही भूमिका उचलून धरली. परंतु सर्वांना माहित आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘संभाजीनगर’ नाव ठेवलं होतं. त्यामुळे त्याचं क्रेडीट कोणीही घेऊ नये", असंही खैरे यावेळी म्हणाले.


औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? राज ठाकरेंचा सवाल

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे अशी मनसेने उचलून धरली आहे.यापूर्वी ही मागणी शिवसेनेची होती. औरंगाबादचे नाव बदलले तर काय हरकत आहे? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. चांगले बदल झालेच पाहिजेत. असे म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भूमिका बदलून अनेक जण सत्तेत आले

तसेच आता मनसेने आपल्या पक्षाची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी भूमिका बदलली नाही. घुसखोरांना आणि पाकिस्तानी कलाकारांना माझा पूर्वीपासून विरोध होता. उलट भूमिका बदलून अनेकांनी सत्ता स्थापन केली आहे.

X
COMMENT