आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- औरंगाबादेतील तरुणांना बल्गेरिया आणि टांझानिया येथे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. युरोपियन कमिशनच्या इरॉसमस प्लस कार्यक्रमाअंतर्गत ५ देशांतील तरुणांना कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल. पुढे हेच तरुण आपापल्या देशात तरुणांची नवीन फळी घडवतील. या उपक्रमासाठी तरुणांची निवड करण्याकरिता औरंगाबादच्या दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेची निवड झाली असून संस्थेच्या वेबसाइटवर नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांचा विमान प्रवास, निवास आणि प्रशिक्षणाचा खर्च युरोपियन कमिशन इराॅसमस प्लसद्वारे केला जाणार आहे. युरोपियन कमिशनच्या इरॉसमस प्लस कार्यक्रमाअंतर्गत तरुणांमधील कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास करणाऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. या प्रशिक्षणासाठी फ्रॉम आयडिया टू रिअॅलिटी अँड एक्झिक्युशन हा विषय ठेवण्यात आला असून यात ३ खंडांतील बल्गेरिया, टांझानिया, युगांडा, भारत, दक्षिण आफ्रिका या ५ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक किरॉण वैष्णव यांनी दिली.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. येथे ऑपरेशनल मॅनेजमेंट कॅपसिटी बिल्डिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. यात सहभागी झालेले तरुण आपापल्या देशातील तरुणांना प्रशिक्षित करतील. यातून ५ तरुणांना २२ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान टांझानिया येथे, तर २२ ते ३० मार्चदरम्यान बल्गेरियातील सोफीया येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. शैक्षणिक, संशोधन, युवक विकास, स्वयंसेवी संस्था आदी ठिकाणी कामाचा अनुभव असणाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी प्राधान्य दिले जाईल. हे प्रशिक्षक परत आपापल्या देशात ठिकठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांत कार्यशाळा आयोजित करतील. यात सेल्फ गव्हर्नन्स, मॅनेजरियल अँड ऑपरेशनल कॅपसिटीज या विषयात तरुणांची नवीन फळी तयारी करतील. यातून निवडलेल्या तरुणांना सहा महिन्यांसाठी बल्गेरिया येथे पाठवले जाईल, असे किरॉण वैष्णव म्हणाले.
१८ ते ४० वर्षांच्या नागरिक घेऊ शकतील सहभाग
दोन वर्षांच्या या प्रकल्पाच्या प्रशिक्षणासाठी मोबाइल अॅप आणि वेबसाइट तयार करण्याचे काम सुरू आहे. तर इंग्रजी, हिंदी, बल्गेरियन आणि स्वाहिली भाषेत प्रशिक्षणाचे साहित्य तयार होत आहे. १८ ते ४० वयोगटातील नागरिक यात सहभागी होऊ शकतील. निवड झालेल्या उमेदवारांचा विमान प्रवास, निवास आणि प्रशिक्षणाचा खर्च युरोपियन कमिशन इरॉसमस प्लसद्वारे केला जाणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. दिशाच्या वेबसाइटवर अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
१०० विद्यार्थ्यांनी युरोपात घेतले प्रशिक्षण
युरोपियन कमिशनच्या इरॉसमस प्लस कार्यक्रमांतर्गत जगभरातील तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी स्वयंपूर्ण करणारे प्रशिक्षण दिले जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्रे आदी विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. गत वर्षभरात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी युरोपातील विविध देशांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टला युरोपियन कमिशनचा युरोपियन पास मिळाला असून अशा प्रकारची ही देशातील एकमेव संस्था आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.