आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 लाख ओला-उबर कॅब, कार विक्रीत सुमारे 3 लाखांची घट, सणांच्या हंगामात विक्री वाढण्याची अपेक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली देशातील आॅटोमोबाइल सेक्टर सध्या दरमहा घसरत असलेल्या विक्रीचे आकडे, बंद होत असलेले शोरूम आणि या क्षेत्रातील वाढती बेरोजगारी या कारणांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आॅटो सेक्टरमध्ये घसरत्या विक्रीसाठी ओला आणि उबर यांच्यासारख्या कंपन्या कारणीभूत आहेत, असे म्हटले. त्यानंतर देशभरात चर्चा सुरू झाली की, ऑटो क्षेत्रातील मंदीसाठी खरेच कंपन्या जबाबदार आहेत का? ‘दिव्य मराठी’ने पडताळणी केली असता असे समोर आले की, देशात फक्त ओला आणि उबर या दोन अॅप बेस्ड टॅक्सी कंपन्यांच्याच सुमारे २६ लाख कॅब रस्त्यांवर धावत आहेत. दुसरीकडे सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सनुसार (सियाम)  एप्रिल-ऑगस्ट २०१९ मध्ये एकूण ६.८६ लाख प्रवासी कारची विक्री झाली. मागील वर्षी  याच काळात एकूण ९.३२ लाख प्रवासी कारची विक्री झाली होती. म्हणजे २९.४% किंवा ५ महिन्यांत २.८६ लाखांची विक्री कमी झाली आहे. सियामचे महासंचालक विष्णू माथुर यांच्या मते, आॅटो इंडस्ट्रीत घसरणीची सुरुवात गेल्या वर्षी केरळमध्ये आलेल्या पुरापासून सुरू झाली. त्यानंतर सतत वाहनांच्या प्रत्येक श्रेणीच्या विक्रीत घसरण झाली आहे. देशात ८.३ लाख कोटी रुपयांच्या या सेक्टरमध्ये सुमारे ३.२ कोटी लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळत आहे. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले की, ग्राहक आणि विशेषत: युवक ओला आणि उबरसारख्या सेवांद्वारे प्रवास करत असून, कार खरेदीची योजना पुढे ढकलत आहेत. युवक ओला आणि उबरला प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळे आॅटोमोबाइल सेक्टरमध्ये मंदी आली आहे हे अर्थमंत्र्यांचे म्हणणे खरे आहे. भार्गव यांच्या मताला एचडीएफसी बँकेचे मुख्य अर्थतज्ञ अभीक बरुआ यांनीही सहमती दर्शवली. मात्र, बरुआ म्हणाले की, फायनान्सिंग सर्वात मोठी समस्या ठरलेली आहे, पण त्यात सध्या सुधारणा करण्याचेे प्रयत्न सरकारने केले आहेत. त्यामुळे या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारी २०२० पासून आॅटो सेक्टरमध्ये मागणीत सुधारणा होईल, असे वाटते. मात्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाहनांची विक्री होईल असे नाही, पण घसरण थांबेल. मारुतीचे माजी अध्यक्ष जगदीश खट्टर म्हणाले की, ओला-उबरसारख्या कंपन्याही एक कारण आहे, पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचीही वाढ झालेली नाही. मात्र, शहरात ओला-उबरसारख्या कंपन्यांची मागणी वाढत आहे. आॅटो क्षेत्रातील घसरणीची 5 तज्ज्ञांच्या मते ही आहेत कारणे विक्रीतील सध्याच्या घसरणीची अनेक कारणे आहेत. ही घसरण २००८, २०१३ आणि २०१८ सारखीच आहे. ही घसरण सध्याच्या वित्तीय संकटामुळेही आहे. देशातील काही मोठ्या कंपन्यांच्या विरोधात सीबीआय केस आणि एनबीएफसी संकट व आयएलअँडएफएस समस्येनंतर बँका कर्ज देण्यात जास्त सतर्कता बाळगत आहेत. व्याजदरही जास्त. - आर. सी. भार्गव,चेअरमन, मारुती सुझुकी आॅटोत घसरणीचे कारण प्रामुख्याने आर्थिक मंदी आणि त्यामुळे ग्राहकांच्या भावनांतील उदासीनता हे आहे. वाहनमालकांची ओनरशिप गुंतवणूकही सतत वाढत आहे. सरकारने  मोठे सुरक्षा उपाय लागू केल्याने आणि ते अनिवार्य केल्याची किंमतही आॅटो सेक्टरला चुकवावी लागत आहे. विम्याची गुंतवणूकही तीन ते पाचपट वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आणखी झळ बसली. - विष्णू माथूर, डीजी-सियाम ऑटो क्षेत्रात घसरणीची अनेक कारणे आहेत. डीलर्सच्या कर्जपुरवठ्यातही अडचण आली. विशेषत: इन्व्हेंट्री होल्डिंगमध्ये बँक आणि एनबीएफसीकडून अडचणी आल्या. डीलर्सना इन्व्हेंट्री होल्डिंगसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज लागते आणि त्यांनी वेळेवर सहजासहजी कर्ज मिळाले नाही. ऑटो क्षेत्रातील घसरणीचे विश्लेषण केल्यास एंट्री लेव्हल कारच्या विक्रीत सर्वाधिक घसरण आढळून येते. लोक एंट्री लेव्हल गाडी खरेदी न करता जुनी मोठी कार घेत आहेत. अर्थव्यवस्थेच्या मंद गतीच्या वाढीमुळे विशेषकरून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची पगारवाढ चांगली झाली नाही. शहरांत गाड्यांची मागणी ठप्प झाली आहे. -अभीक बरुआ, चीफ इकॉनॉमिस्ट, एचडीएफसी बँक ऑटो इंडस्ट्रीजमध्ये सध्या आलेली परिस्थिती म्हणजे अनेक कारणांचा परिणाम आहे. यात ग्राहकांची उदासीनता, रोखीचे संकट आणि ओनरशिपचे खर्च ही प्रमुख कारणे आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच केलेल्या घोषणांमुळे ऑटो क्षेत्रातील परिस्थिती सुधारेल आणि आगामी सण-उत्सवांच्या काळात नवीन वाहनांना चांगली मागणी राहील, असा मला विश्वास वाटतो. - विजय राम नाकरा, चीफ सेल्स अँड मार्केटिंग ऑटोमोटिव्ह डिव्हिजन, महिंद्रा अँड महिंद्रा

ऑटो क्षेत्रात तीन प्रकारचे ग्राहक असतात - पहिली कार खरेदी करणारा, जुनी कार देऊन नवी कार घेणारा आणि एक कार असताना दुसरी कार घेणारा. सध्या ग्राहक खरेदी करण्यास पुढे येत नाहीत, यामुळे ऑटो क्षेत्रात मंदी येत आहे. सरकारने कितीही प्रोत्साहन दिले तरी ग्राहक नवीन वाहन खरेदी करण्यास तयार होत नाही तोपर्यंत या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नाही. - जगदीश खट्टर, माजी चेअरमन, मारुती-सुझुकी इंडिया

ओलाची स्थिती
- सुरुवात : २०१० च्या अखेरीस
- पोहोच : २५० वर शहरांत
- ड्रायव्हर पार्टनर : २० लाख कॅब
- रोजचे बुकिंग : २५ लाख
- अॅप डाऊनलोड : जून २०१८ मध्ये भागीदारी ५८.९% होती. जून २०१९ मध्ये ५७.४% राहिली.
- अॅप अनइन्स्टाॅल : एप्रिल-जून २०१९ मध्ये १२.१८%

उबरची स्थिती
- आॅगस्ट २०१३ मध्ये सुरू
- ४० ते ५० शहरांत आहे.
- ५ ते ६ लाख कॅब
- ११ ते १३ लाख होत आहे.
- जून २०१८ मध्ये हिस्सा ३८.२% होता. जून २०१९ मध्ये ३६.३%
- एप्रिल-जून २०१९ मध्ये १८.१४%

बातम्या आणखी आहेत...