Home | Divya Marathi Special | Autonomous instruments made by Dinesh to make ammunition laddus to relieve the suffering of parents;

आई-वडिलांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी दिनेशने बनवले राजगिरा लाडू बनवण्याचे स्वयंचलित यंत्र; वेळ व श्रमाची बचत होऊन उत्पादनही वाढणार

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 24, 2019, 10:03 AM IST

लाडू उद्योग अडचणीत, असे यंत्र अद्याप कुठेही नाही

 • Autonomous instruments made by Dinesh to make ammunition laddus to relieve the suffering of parents;

  चांदवड - राजगिऱ्याचे लाडू तयार करताना आई-वडिलांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील दिनेश कांकरिया या विद्यार्थ्याने स्वयंचलित लाडू बनवण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे लाडू तयार करताना मानवी शरीराला होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होण्याबरोबरच वेळेची व श्रमाची बचत होऊन रोजगारनिर्मिती व लाडू उत्पादनातही वाढ होणार आहे.


  चांदवड येथील स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात चतुर्थ वर्ष मेकॅनिकल (बीई) विभागात शिक्षण घेत असलेल्या दिनेशच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. राजगिरा फोडून गुळाचा पाक तयार करून त्याचे मिश्रण लाकडी साचात टाकून लाडू तयार करायचे व तयार झालेले लाडू सायकलवर जाऊन नाशिक शहरातील दुकानांमध्ये विकण्याचे काम वडील करतात, तर या उद्योगात हातभार लावण्याबरोबरच आई घरोघरी जाऊन पोळ्या लाटण्याचे काम करायची. मात्र, या कामात हातभार लावणाऱ्या दिनेशच्या आईला राजगिरा फोडताना व गुळाचा पाक तयार करताना तयार होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे त्रास जाणवू लागला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व आई-वडिलांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी दिनेशला यंत्र बनवण्याची कल्पना सुचली व त्यातून दिनेशने आपल्या अभियांत्रिकी ज्ञानातून स्वयंचलित लाडू बनवण्याचे यंत्र विकसित केले. एक कामगार १५ मिनिटांत २० लाडू तयार करतो, तर या यंत्राच्या साहाय्याने तेच काम एका मिनिटात होणार आहे. या यंत्रासाठी सध्या एकच डाय वापरण्यात आली असून एका तासात १२०० लाडू तयार होणार आहेत. यंत्रात जेवढ्या डाय वापरल्या तेवढे उत्पादन वाढणार असल्याचे दिनेश कांकरिया याने सांगितले. हे यंत्र तयार करण्यासाठी दिनेशला एका डायसाठी ५० हजार रुपये खर्च आला असून या प्रकल्पासाठी संकेत बाफणा, कुणाल संचेती, वैष्णवी आहेरराव या विद्यार्थ्यांनी त्यास सहकार्य केले, तर या प्रकल्पासाठी महाविद्यालयातील प्रा. एम. ए. आहिरे व विभागप्रमुख प्रा. एस. डी. संचेती यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रकल्पातील सहभागी तीन विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत प्लेसमेंट झाली आहे. प्रकल्प यशस्वितेसाठी नेमिनाथ संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, समन्वयक दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. महादेव कोकाटे यांनी दिनेशचे अभिनंदन केले.

  लाडू उद्योग अडचणीत, असे यंत्र अद्याप कुठेही नाही
  मजुरांअभावी राजगिरा लाडू उद्योगाला उद्योजक वैतागल्याने उद्योग अडचणीत येण्याची शक्यता असल्याने यंत्राची तीव्र गरज होती. राजगिरा लाडू तयार करण्याचे मशीन अद्याप कुठेही उपलब्ध नसून आई-वडिलांच्या प्रेरणेतून हे यंत्र बनवले आहे. या यंत्रामुळे लाडू तयार करताना होणाऱ्या आरोग्याच्या समस्येतून सुटका होण्याबरोबरच वेळ व श्रमाची बचत होऊन उत्पादनातही वाढ होणार आहे.
  - दिनेश कांकरिया, संशाेधक विद्यार्थी

Trending