आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांची समिती, श्रमदानातून जमवते पैसे; उपलब्ध निधीचा वापर ग्राम विकासासाठी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


धारूर : तरूणांनी पुढे आले तर ग्रामविकासाला गती येते. याचा प्रत्यय हिंगणी खुर्द येथे येत आहे. येथील तरुणांनी एकत्र येत 'गाव विकास समिती' स्थापन केली आहे. या समितीने ग्रामविकासासाठी निधी संकलन करण्यासाठी बँकेत खातेही उघडले आहे. विशेष म्हणजे हा निधी हे युवक श्रमदानातून गोळा करत आहेत. गावात कुणाचेही काही काम असले की हे युवक श्रमदान करतात, त्यातून आलेली रक्कम ही गाव विकास समिती'च्या खात्यावर जमा होते. शिवाय गावात सद्या आठवड्यातून एकदा स्वच्छता अभियानही राबविले जात आहे. 


हिंगणी खुर्द (ता.धारूर) हे बालाघाटाच्या डोंगर पायथ्याशी सरस्वती नदी लगत वसलेल गाव. अडीच हजाराच्या जवळपास गावची लोकसंख्या. शेती हा प्रमुख व्यवसाय. या गावातील ५० ते ६० तरूण दरवर्षी दिवाळीत एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करतात. या महोत्सवात विविध घेतलेल्या उपक्रमांतून युवकांकडे ३० ते ४० हजार रुपये जमा होत. गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत जलसंधारणाची कामे केल्यानंतर यावर्षी तरुणांनी आपला मोर्चा ग्रामस्वच्छतेकडे वळवला आहे. गत तीन महिन्यापासून दर आठवड्यात एकदा स्वच्छता अभियान राबवले जाते. यामध्ये नाली, रस्ते सफाई, कचरा विल्हेवाट आदी कामे श्रमदानातून केली जातात. अभियान राबविण्यासाठी दर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता 'दिलासा संस्थे'ने उपलब्ध करून दिलेल्या मिटींग हॉलमध्ये बैठक होते. या बैठकीत दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या कोणत्या भागात स्वच्छता अभियान राबवायचे ते ठरवले जाते. शनिवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवले जाते. 


यामुळे समितीची स्थापना 
स्वच्छता अभियान राबवताना कचराकुंड्या घेण्यासाठी तसेच इतर कामांसाठी पैसे नव्हते. त्यावर पर्याय म्हणून तरूणांनी १५ दिवसांपूर्वी गाव विकास समिती स्थापली. या समितीत १३ सदस्य असून महाराष्ट्र ग्रामीण बँकेत समितीचे खाते उघडले. अध्यक्ष बालासाहेब सोळंके, सचिव विद्या सोळंके आहेत. या समितीच्या खात्यात बचत करण्यासाठी तरुण देणगी मागत नाहीत तर दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर रात्रीच्या वेळी एकत्र येतात. गावात गुत्ते पध्दतीने कापूस भरणे, माती ट्रॅक्टरमध्ये भरणे, शेतकऱ्यांचे खत भरणे आदी कामे केली जातात. यातून जी रक्कम मोबदला म्हणून मिळते ती बँकेत भरण्यात येते. १५ दिवसांत गाव विकास समितीच्या खात्यावर ३ हजार रुपये बचत झाली आहे. ही बचत वाढवून गावात टप्प्याटप्प्याने विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. 


वॉटरकप स्पर्धेनंतर आता स्वच्छतेच्या कामांवर दिला भर 
हिंगणी खुर्द (ता.धारूर ) येथील युवक आपापले कामे आटोपल्यानंतर एकत्र येत गाव विकास समितीसाठी श्रमदान करून निधी जमवतात. 


गाव कात टाकणार 
जेव्हा तरूणचं स्वत:च्या गावाच्या विकासासाठी झपाटून पुढे येतात, तेव्हा गावाचा कायापालट हाेतो. गावात विकास कामांची गरज आहे. सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत नाहीत. यासाठी गाव विकास समिती स्थापून निधी संकलन सुरू केले आहे. हा निधी गावात परिवर्तन घडवेल.' - योगेश सोळंके, उपसरपंच, हिंगणी 
 

बातम्या आणखी आहेत...