infotainment / ‘अॅव्हेंजर्स..’ची ३ दिवसांत छप्पर फाडके कमाई; अॅव्हेंजर इन्फिनिटी वॉरला टाकले मागे; इतका जमवला गल्ला

बॉक्स ऑफिस : भारतामध्ये या चित्रपटाने तीन दिवसांत १२४ कोटी रुपये मिळवले

वृत्तसंस्था

Apr 30,2019 11:02:00 AM IST

न्यूयॉर्क - मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (एमसीयू) चा चित्रपट अॅव्हेंजर एंड गेम बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. सर्वाधिक तेजीने १०० काेटी डॉलर (सुमारे सात हजार कोटी रुपये) कलेक्शन करणारा हा चित्रपट ठरला आहे. अॅव्हेंजर एंड गेमने केवळ पाच दिवसांतच १२० कोटी डॉलर (८.३७ हजार कोटी रुपये) जमवले आहेत. एंड गेमने एमसीयूच्याच अॅव्हेंजर इन्फिनिटी वॉर या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने ११ दिवसांतच १०० कोटी डॉलरचा आकडा पार केला होता. एंड गेम मार्व्हल स्टुडिओचा २२ वा सुपरहीरो चित्रपट आहे. अॅव्हेंजर सिरीजची सुरुवात २००८ मध्ये आयर्न मॅनच्या रिलीजसह झाली होती. मार्व्हल स्टुडिओ २००९ पासून डिस्नेची सहायक कंपनी आहे. जगभरात २४ एप्रिल रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने केवळ अमेरिकेतच ३५ कोटी डॉलर (सुमारे २.४ हजार कोटी) रुपयांची कमाई केली आहे. चीनमध्ये या चित्रपटाने २.३ हजार कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. भारतात हा चित्रपट २६ एप्रिल रोजी रिलीज झाला आणि तीन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर याने १२४ कोटी रुपयांचा आकडा पार केला होता.

आशिया पॅसिफिकमधून सर्वाधिक उत्पन्न
जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रांच्या हिशेबाने पाहिल्यास आशिया पॅसिफिकमध्ये चित्रपटाचे सर्वाधिक ५४.५ कोटी डॉलरचे उत्पन्न झाले आहे. अमेरिकेमधून ३५ कोटी डॉलर, युरोप आणि मध्य-पूर्वमधून २१.४ कोटी डॉलर, लॅटिन अमेरिकेमध्ये १०० कोटी डॉलर आणि जपानमध्ये १३ कोटी डॉलरचे उत्पन्न मिळाले.

बिझनेस मासिक फोर्ब्जनुसार अॅव्हेंजर एंड गेमचे उत्पन्न

बिझनेस मासिक फोर्ब्जनुसार अॅव्हेंजर एंड गेमने ४६.१२ टक्के कलेक्शन सामान्य टू-डी स्क्रीनमधून केले आहे, तर ४५ टक्के उत्पन्न थ्री-डी स्क्रीनमधून झाले आहे. ७.६२ टक्के उत्पन्न आयमॅक्स स्क्रीनमधून, तर १.२५ टक्के कलेक्शन फोर-डीएक्स स्क्रीनमधून झाले आहे.

भव्यता अन् आधीच लोकप्रिय पात्रे असल्याने यश
आंतरराष्ट्रीय चित्रपट विश्लेषक हेलेन ओ हारा यांच्या मते, मार्व्हलने या आधी २१ सुपर चित्रपट बनवलेले आहेत. एंड गेमच्या प्रत्येक पात्राला लोक आधीपासूनच ओळखतात आणि प्रत्येक वयोगटामध्ये ही पात्रे लोकप्रिय आहेत. चित्रपट यशस्वी होण्यामागे या कारणाचाही समावेश आहे. त्याचबरोबर एंड गेम हा एक भव्य चित्रपट असून प्रेक्षकांना कोणत्याही बाबतीत निराश करत नाही. चित्रपट रेटिंग वेबसाइटवर अॅव्हेंजर एंड गेमला ९६ टक्के अॅप्रूव्हल मिळाले आहे.

X
COMMENT