सुप्रिया सुळेंची संपत्ती ५१ वरून ११३ कोटींवर; शत्रुघ्न सिन्हा पहिल्या क्रमांकावर ; एडीआरची आकडेवारी

प्रतिनिधी

Mar 20,2019 09:29:00 AM IST

नागपूर । राजकीय क्षेत्रातील लोकांची संपत्ती वाढत जाते, असे संकेत असतात. प्रत्यक्षात अनेकदा तसे घडतेही. या पार्श्वभूमीवर २००९ नंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही निवडून आलेल्या १५३ खासदारांच्या मालमत्तेची आकडेवारी एका संस्थेने नुकतीच जाहीर केली आहे. २०१४ च्या तुलनेत या खासदारांच्या संपत्तीत सरासरी १४२ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या १५३ खासदारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करून ही माहिती सादर केली आहे.


या १५३ खासदारांमध्ये महाराष्ट्रातील १५ खासदारांचा समावेश आहे. यादीतील टॉप १० खासदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या तिसऱ्या तर साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे पाचव्या क्रमांकावर आहेत. सुप्रिया सुळे यांची संपत्ती ५१ कोटींवरून (२००९) २०१४ मध्ये ११३ कोटींवर पोहोचली आहे. संपत्तीतील ही वाढ १२१ टक्के आहे. उदयनराजेंच्या संपत्तीत ११ कोटींवरून (२००९) ६० कोटींची (२०१४) म्हणजेच ४१७ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

१५३ खासदारांची सरासरी संपत्ती ७.८१ कोटींनी वाढली
२००९ ते २०१४ दरम्यानच्या पाच वर्षात देशातील १५३ खासदारांच्या संपत्तीत सरासरी ७ कोटी ८१ लाखांची वाढ झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे (जालना) हे या यादीत २० व्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती २ कोटीवरून (२००९) १८ कोटींवर (२०१४) गेली. म्हणजेच ती ६६० टक्क्यांनी वाढली आहे.

X
COMMENT