आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा इतिहास ‘एनसीपीए’ विना अधुरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलाप्रिय जमशेद भाभांना एनसीपीएच्या उभारणीत टाटा उद्योगसमूहाची मदत हवी होती. त्या हेतूने ते टाटा उद्योगसमूहाचे तेव्हाचे प्रमुख जे. आर.डी. टाटांना भेटायला गेले. जेआरडींसारख्या अतिशय व्यग्र माणसाचा आपण वेळ खात आहोत या भावनेने जमशेद भाभा संकोचून गेले होते. तेव्हा जेआरडी एका सिमेंट कंपनीच्या कामात व्यग्र होते. जमशेद भाभा जेआरडींना म्हणाले, ‘तुमच्यासारख्या व्यग्र माणसाचा मी वेळ खाल्ला याबद्दल मला माफ करा.’ यावर जेआरडींनी जे उत्तर दिले त्यात टाटा उद्योगसमूहाचे तत्त्वज्ञान व्यक्त होते. जेआरडी म्हणाले, ‘नाही. जमशेद नाही. तुम्ही जे कला/ संस्कृती जपण्याचे काम करत आहात ते अतिशय महत्त्वाचे आहे. आणखी शंभर वर्षांनी कदाचित ही सिमेंट कंपनी विस्मरणात जाईल, पण लोक एनसीपीए लक्षात ठेवतील.’ त्यानंतर एनसीपीएच्यामागे टाटा उद्योगसमूह भक्कमपणे उभा राहिला तो कायमचा.  जमशेद भाभा हे नामवंत अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचे बंधू. दोघेही ख्यातकीर्त. देशाच्या कला-सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काही व्हावं याचा ध्यास जमशेद भाभा यांचा होता व त्या स्वप्नाने त्यांनी आयुष्यभर झपाटून काम केले. भारतातील एक अग्रगण्य संस्था ‘एनसीपीए’च्या स्थापनेमागे व या संस्थेच्या विकासामागे त्यांचे अविरत प्रयत्न आहेत.   

 
मुंबई महानगर जसं देशाची आर्थिक राजधानी आहे तशीच ती एक प्रकारे देशाची सांस्कृतिक राजधानीसुद्धा आहे. मुंबईच्या या योगदानाची सहसा दखल घेतली जात नाही. मुंबई म्हणजे हिंदी सिनेसृष्टीची मक्का. आजचे जाऊ द्या, पण एकेकाळी मुंबई म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरी समजली जायची. अजित वाडेकरच्या क्रिकेट टीममध्ये तर ११ पैकी जवळजवळ निम्मा संघ मुंबईचा होता. ‘देशाची आर्थिक राजधानी’ ते ‘सांस्कृतिक राजधानी’ या प्रवासात एका संस्थेचे फार मोठे योगदान आहे. ती म्हणजे नरिमन पॉइंटचे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट‌्स (स्थापना ः १९६९). नुकतेच एनसीपीएचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे.  


सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एनसीपीएच्या ५० व्या बोधचिन्हाचे अलीकडेच अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक कला इतिहासाचा ५० वर्षांचा प्रवास दर्शवण्यासाठी या बोधचिन्हात विविध रंगांची उधळण करण्यात आली आहे. भडक लाल रंग रंगमंचीय आविष्कार, पिवळा रंग विविध नृत्य प्रकार, हिरवा रंग आंतरराष्ट्रीय संगीत, निळा रंग पाश्चिमात्य संगीत आणि जांभळा रंग भारतीय सांगितिक वारसा यांचे प्रतीक आहे.       


या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. एनसीपीएच्या कामामागे ‘दैनंदिन जीवनात कलेचा सहभाग’ हे तत्त्व असून या अर्धशतकी प्रवासानिमित्त होणाऱ्या उत्सवात नाट्य, संगीत, नृत्य, चित्रपट, दृश्यकला, साहित्य, पाककला, छायाचित्रण वगैरे क्षेत्रांतील नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. भव्य नाट्याविष्कार ते जाझ फेस्टिव्हल, भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत–नृत्य- चित्रपट आदी कला प्रकार सादर करण्यात येणार आहेत. यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत व यात देशविदेशांतील मातब्बर संस्था आणि कलाकार सहभागी होणार आहेत.    


तसे पाहिले तर एक संस्था म्हणून एनसीपीएची नोंदणी जून १९६६ मध्ये झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात या संस्थेचे कार्य २९ डिसेंबर १९६९ पासून सुरू झाले. तेव्हा या संस्थेचे काम पेडर रोडवरच्या एका भाड्याच्या जागेतून चालायचे. या भाड्याच्या जागेतल्या संस्थेचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते. नंतरच्या काळात चर्चगेटच्या पलीकडे ‘नरिमन पॉइंट’ आकाराला येत होते. १९७४ मध्ये एनसीपीएने नरिमन पॉइंटच्या एका टोकाला आठ एकरचा एक मोठा प्लॉट ४० लाख रु.ला मुंबई महापालिकेकडून विकत घेतला. ही रक्कम सर दोराबजी ट्रस्टने उपलब्ध करून दिली होती. वास्तूच्या कामाला प्रारंभ झाला. या वास्तूचे डिझाइन केले होते जागतिक दर्जाचे वास्तुरचनाकार फिलिप जॉन्सन यांनी. या वास्तूचे काम झपाट्याने सुरू झाले व ५ मे १९७५ रोजी प्रायोगिक रंगमंचावर पहिला प्रयोग सादर झाला.  


यानंतर एनसीपीएची उत्तरोत्तर भरभराटच होत गेली. यथावकाश टाटा थिएटर, लिटल थिएटर यांची भर पडत गेली. आज एनसीपीएच्या वास्तूत अशा पाच जागा आहेत जेथे कलाविष्कार होत असतो. एनसीपीएचे माझ्यासारख्या अनेकांवर अगणित उपकार आहेत. या वास्तूमुळे व ती चालवणाऱ्या विश्वस्तांमुळे जागतिक दर्जाची कला बघता आली. १९८२ मध्ये एनसीपीएमध्ये अगस्टे रोदां (१८४०-१९१७) या जागतिक दर्जाच्या फ्रेंच शिल्पकाराच्या अप्रतिम शिल्पांचे प्रदर्शन भरले होते. यात रसिकांना रोदांचा सुप्रसिद्ध ‘िथंकर’ बघायला मिळाला, त्याचे ‘िकस’ वगैरे शिल्प बघायला मिळाले.   


१९३०च्या दशकात भारतात मूक चित्रपटांचे युग होते. तेव्हा फँझ ऑस्टेन हा जर्मन दिग्दर्शक भारतात काम करत होता. त्याने हिमांशू रॉय यांच्या ‘बॉम्बे टॉकीज’ या स्टुडिओसाठी काही मूक चित्रपट दिग्दर्शित केले होते. यातील एक गाजलेला चित्रपट म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित ‘लाइट ऑफ एशिया’. ऑस्टेनने दिग्दर्शित केलेले काही चित्रपट एनसीपीएत दाखवण्यात आले होते. त्या काळी चित्रपट सुरू असताना पडद्याच्या खाली गायक/ वादक बसलेले असत व गात/ वाजवत असत; एनसीपीएने तशीच सोय हे चित्रपट दाखवले तेव्हा केली होती.  


एनसीपीएमध्ये १९८८ मध्ये ‘िपरामल आर्ट गॅलरी’ सुरू झाली. याची जबाबदारी जेष्ठ वृत्तछायाचित्रकार मुकेश परपियानी यांच्याकडे आहे. या गॅलरीत स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकारांचे काम बघायला मिळते. ही फक्त गॅलरीच नाही तर छायाचित्रण या कलेकडे गांभीर्याने पाहणारे एक केंद्र आहे. म्हणूनच येथे दर महिन्याला एखाद्या नामवंत छायाचित्रकाराचे व्याख्यान आयोजित केले जाते. सुरुवातीची १० वर्षे हे कला दालन छायाचित्रकारांना प्रदर्शनासाठी मोफत उपलब्ध होते. आता नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध केले जाते.  

एनसीपीए काळानुसार बदलत गेले व आजही काळाच्या गरजांनुसार बदलत आहे. एनसीपीएने पुढाकार घेऊन ‘आनंद’ हा हिंदी नाटकांचा महोत्सव भरवायला सुरुवात केली. दोन-तीन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय नाट्यमहोत्सवात देशाच्या इतर राज्यांतील हिंदी नाटकं बघायला मिळतात. तसेच एनसीपीएतर्फे दरवर्षी ‘सेंटरस्टेज’ हा बहुभाषिक नाट्यमहोत्सवही भरवला जातो. अशा महोत्सवातून दर्जेदार नाटकं बघायला मिळतात.   


एनसीपीएचा आणखी एक उल्लेखनीय उपक्रम म्हणजे ‘फ्लॅशबॅक’. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक जुना अभिजात भारतीय चित्रपट दाखवला जातो. काही महिन्यांपूर्वी ‘फ्लॅशबॅक’ अंतर्गत गुरुदत्तचा ‘प्यासा’ दाखवला होता. हा आगळावेगळा उपक्रम २०१३ मध्ये सुरू झाला. हे वर्ष म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मवर्ष. या वर्षी भारतात चित्रपट बनायला सुरुवात झाली व पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ दादासाहेब फाळके यांनी ९ मे १९१३ रोजी प्रदर्शित केला होता. २०१३ मध्ये या घटनेची शताब्दी देशभर साजरी झाली होती. या वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन एनसीपीए व पुण्याच्या ‘नॅशनल फिल्म आर्काईव्हज ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन ‘एनसीपीए फ्लॅशबॅक’ सुरू केले.  
ऑगस्ट २००६ मध्ये एनसीपीएने पुढाकार घेऊन ‘िसंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’ सुरू केला, जो भारतातला पहिला व्यावसायिक सिंफनी ऑर्केस्ट्रा आहे. एनसीपीएतील अनेक कार्यक्रम मोफत असतात तर काहींसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. यातील काही उपक्रम यथावकाश बंद पडले तर काही नवे सुरू झाले. एनसीपीएचा कारवाँ सुरूच आहे. आधुनिक मुंबईचा सांस्कृतिक इतिहास लिहिला तर तो एनसीपीएशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही. 


प्रा. अविनाश कोल्हे  
nashkohl@gmail.com

बातम्या आणखी आहेत...