आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सॉकर'नगरीचा रुपेरी रोमांच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


२०१७ मध्ये भारताला प्रथमच "फिफा'ने आयोजित केलेल्या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली. १७ वर्षांखालील वयोगटाच्या ह्या जागतिक स्पर्धेत अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड झाली आणि कोल्हापूरचे फुटबॉलप्रेम चर्चेत आले. मात्र, कित्येक दशकांपूर्वी खेळ आणि कोल्हापूर हे नाते घट्ट करण्यात पुढाकार घेतला होता, तो "जाणता राजा'ही उपाधी सर्वार्थाने शोभणाऱ्या शाहू महाराजांनी. शाहूंनी प्रोत्साहन दिलेली कुस्ती आणि त्यांच्या तालमी जगभरात प्रसिद्ध आहेतच, पण कोल्हापूरमध्ये फुटबॉल प्रेमही रुजवले ते त्यांनीच. याचाच रोमहर्षक इतिहास उलगडणाऱ्या सचिन सूर्यवंशी दिग्दर्शित "दी सॉकर सिटी' नावाच्या डॉक्युमेंट्रीला नुकताच फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कार लाभणे हा सुखद योग आहे...

 

निर्मितीची खूणगाठ
सचिन सूर्यवंशी सांगतो, गेल्या दहा-बारा वर्षांपासून "फुटबॉल महासंग्राम'च्या प्रसिद्धीचे काम करत होतो. त्यामुळे फुटबॉलची नस माहीत होती. जेव्हा कामानिमित्त बाहेर जायचो, तेव्हा कोल्हापुरातील स्थानिक संघाचे फुटबॉल सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एकाच वेळी २५ हजारांहून अधिक प्रेक्षक असतात, असे सांगितले तर अनेक जण मला वेड्यात काढत.  तेव्हाच गाठ बांधली की, यावर काही तरी दणकेबाज करायचं. 


रवीर नगरी ही कोल्हापूर दुसरी ओळख. हे कलांचं माहेरघर. एकेकाळी जगभरातल्या कलावंतांना खुणावणारं. या कलासमृद्ध कोल्हापूरची पार्श्वभूमी असलेल्या आणि सचिन बाळासाहेब सूर्यवंशी या अस्सल कोल्हापूरकर तरुणाने दिग्दर्शित केलेल्या "दी सॉकर सिटी'या शॉर्ट फिल्मची सुरुवातच होते, ती "महासंग्राम' ह्या कोल्हापुरातल्या नावाजलेल्या फुटबॉल स्पर्धेतील पेनल्टी शूटआउटने आणि त्यानंतरचे हर्षोल्लासित क्षण तसंच निराशा या दोन्हींच्या संगमाने. कोल्हापूरच्या फुटबॉलची गोष्ट सांगायला हा प्रसंग खूप बोलका आहे. स्लो मोशनमध्ये केलेले चित्रिकरण तसेच ब्लॅक अँड व्हाइट दृश्यांनी डॉक्युमेंट्रीचा विषय पहिलेछूट प्रेक्षकांपर्यंत थेटपणे पोहोचवला जातो.

 

पोलंड निर्वासितांचा खेळ बघून सुरू झालेला कोल्हापूरचा फुटबॉलचा प्रवास, त्याकाळात चिंध्यापासून बनवलेला फुटबॉल, अनवाणी फुटबॉल खेळण्याचे सामर्थ्य, त्यातही पोलंडच्या त्या संघाचा केलेला पराभव यासारख्या गोष्टी ह्या डॉक्युमेंट्रीत रंजकपणे मांडल्या जातात. या घटना पाहताना-ऐकताना आपल्याला "लगान' चित्रपटातील क्रिकेटचा सामना आठवल्याशिवाय राहत नाही. महासंग्रामचा विजेता आणि आयपीएलच्या विजेत्या संघाचे फोटो कोल्हापूरातल्या वर्तमानपत्रात शेजारी शेजारी असण्यातूनच त्यांचे फुटबॉलप्रेम कोणत्या तोडीचे आहे हे स्पष्ट होत जाते. 

 

शाहू महाराज स्टेडियमवर "महासंग्राम' ह्या फुटबॉल स्पर्धेला वीस हजाराहून अधिक प्रेक्षक गर्दी करतात, हे पचवणे कोल्हापूरबाहेरच्यांना अवघड वाटते. पण ह्या डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने ह्या गर्दीमागचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पैलू उजळत जातात.  मानवी अस्मिता आणि भावना यांची उकल होत जाते आहे. कोल्हापुरातल्या पेठांची एकता आणि सर्वधर्म सलोख्याच्या वातावरणाचे चित्रण येत जाते.  कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम आणि त्याच्या रंजक इतिहासावर सांगोपांग चर्चा केली आहे. त्यानिमित्ताने अगदी सुरुवातीला ज्यांनी फुटबॉल कोल्हापूरात रुजवण्यास हातभार लावला असे लक्ष्मण पिसे, गजानन इंगवले, अब्बास मुकादम यांच्या सोबत अरुण नरके, सतीश सूर्यवंशी आदींच्या मुलाखती आपलं लक्ष वेधून घेतात.

 

भारतात फुटबॉल हा गोवा, केरळ, बंगाल ह्या पोर्तुगीज वसाहतींच्या जवळपासच्या प्रदेशात तसेत ईशान्येतील राज्यांत लोकप्रिय आहे. पण राजाराम महाराजांच्या आश्रयाने कोल्हापुरात फुटबॉलची होत गेलेली वाढही कोल्हापूरबाहेरील जनतेला माहीत नाही. या डॉक्युमेंट्रीच्या निमित्ताने कोल्हापूरमधील फुटबॉलच्या दोन्ही बाजू समर्थपणे पुढे येतात. तिथला फुटबॉल हा वाढलाच मुळी कुस्तीच्या तालमीत आणि पेठांत, पण जी आज कुस्तीची अवस्था आहे तशीच फुटबॉलची असेल का? भारतीय संघात एकही खेळाडू ह्या शहरातला का नसतो? अशा प्रश्नांचीही उत्तरेही ही डॉक्युमेंट्री आपल्याला देते.

 

कुस्ती आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ रांगडे मानले जातात. दोन्ही खेळांसाठी मानवी शरीराची ताकद महत्त्वाची असतेच. दोन्ही खेळांच्या वर्गजाणीवांचा स्वीकार करतानाही त्यातले बहुजनत्व आणि त्याचे समाजातील इतर वापर स्पष्ट होतात. भारताच्या अस्सल मातीतील कुस्ती, युरोपातून आलेला फुटबॉल आणि क्रिकेट यांची तुलनात्मक चर्चा 'द सॉकर सिटी' ला मिळालेल्या   पुरस्कारामुळे का होईना,  केली गेली तरीही, हे ह्या डॉक्युमेंट्रीचे यश असेल...