अवनी वाघिणीचे दाेन्ही / अवनी वाघिणीचे दाेन्ही बछडे जिवंत; जंगलात कॅमेऱ्यात ट्रॅप: उपासमारीने मृत्यूची हाेती अफवा

प्रतिनिधी

Nov 17,2018 08:44:00 AM IST

यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील बोराटी जंगल परिसरात टी-१ ऊर्फ अवनी वाघिणीला गाेळी घालून मारल्यापासून तिच्या दाेन्ही बछड्यांचा शाेध लागत नव्हता. अाईच्या मृत्यूनंतर अन्नपाण्याविना त्यांचा मृत्यू झाला असल्याच्याही वावड्या उठल्या. मात्र अाता १३ दिवसानंतर हे दाेन्ही बछडे वन विभागाने जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाले असून विहिरगावजवळ गस्तीपथकाला ते दोन्ही बछडे रस्ता पार करतानाही दिसून अाले अाहेत. त्यामुळे वन विभागाचा जीव भांड्यात पडला आहे.


नरभक्षक असल्याचा अाराेप करत अवनीला राज्य सरकारच्या अादेशानुसार गाेळी घालून ठार मारण्यात अाले हाेते. तिच्या हत्येनंतर अवनीचे दोन बछडे जंगलात सैरभैर झाले होते. अवनीची हत्या व बछड्यांचे हाल या मुद्द्यावरून वन मंत्र्यांसह विभागातील अधिकाऱ्यांवर चाेहाेबाजूने टीकेची झाेड उठली हाेती. त्यामुळे हे दाेन्ही बछडे शाेधण्याचे काम वन विभागाच्या पथकाने युद्धपातळीवर हाती घेतले हाेते, मात्र त्यात यश येत नव्हते. केवळ १० महिन्यांचे असलेले हे दोन्ही बछडे उपासमारीने किंवा इतर वन्य प्राण्यांनी शिकार केल्यामुळे गतप्राण झाल्याची शक्यताही वर्तवली जात हाेती.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री दरम्यान वन विभागाचे पथक विहिरगाव परिसरात रात्री गस्तीवर असताना मध्यरात्रीनंतर सुमारे २.३० वाजताच्या सुमारास हे दोन्ही बछडे रस्ता पार करताना व कक्ष क्रमांक १५५ मधून कक्ष क्रमांक ६५२ कडे जाताना पथकाला आढळून आले. त्यांनी तातडीने याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अाता या बछड्यांच्या शाेधासाठी माेहीम अाणखी गतिमान करण्यात अाली अाहे. जंगलातील कॅमेऱ्यातही तीन ठिकाणी या बछड्यांचे फाेटाे शुक्रवारी सकाळी दिसून अाले अाहेत.

तसेच त्यांच्या पायांचे निशाणही आढळून आले आहे. ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान,अवनी वाघिणीला मारल्यानंतर या प्रकरणात राज्य सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका होत आहे.

अवनीचे मृत्यू प्रकरण : टीकेनंतर चाैकशी समितीची फेररचना होणार

अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. एस.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या समितीत नेमलेल्या सदस्यांवर टीकेची झाेड उठली हाेती.

त्यामुळे या समितीची फेररचना करण्याचे अादेश मुनगंटीवार यांनी दिले अाहेत. समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज, बंगळुरूचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनचे संशोधक डॉ. पराग निगम यांची सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.

यापूर्वी वाइल्ड लाइफ कन्झर्वेशनचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया, भारतीय वन्यजीव संस्थान देहरादूनचे डॉ. बिलाल हबीब हे सदस्य, तर अपर प्रधान मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश केलेला आहे.

X
COMMENT