मुंबई / अडचणीत आणणारी वादग्रस्त विधाने टाळा; महाविकास आघाडी समन्वय समितीच्या बैठकीत उद्धव यांचा नेत्यांना सल्ला

  • मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आदित्य ठाकरेंची अळीमिळी गुपचिळी
  • अशी आहेत महाविकास आघाडीतील नेत्यांची वक्तव्ये

Feb 14,2020 08:11:00 AM IST

मुंबई - सार्वजनिक ठिकाणी बोलताना यापुढे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सरकारला अडचणीत आणणारी वादग्रस्त विधाने करू नयेत, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री झालेल्या महाविकास आघाडी समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीत दिल्याचे समजते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानुसार गुरुवारी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही अळीमिळी गुपचिळी करणेच पसंत केले.


भाजपसोबत निवडणूक लढवून सत्ता स्थापनेएवढे यश मिळाल्यानंतरही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. परंतु सत्ता स्थापनेनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने करून विरोधकांना आयते कोलीत दिले होते. एखाद्या नेत्याने एखादे वादग्रस्त विधान केले की लगेचच त्यावर दुसऱ्या दोन पक्षांच्या नेत्यांनी उत्तर देऊन वाद वाढवल्याचे समोर आले होते. हा वाद आणखी वाढू नये यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवावे लागले होते. विविध नेत्यांच्या विधानांमुळे तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. बुधवारी रात्री समन्वय समितीच्या बैठकीत अशा विधानांवर गंभीरतेने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली, परंतु काही नेते सतत वादग्रस्त विधाने करीत असल्याने तिन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडू लागली होती. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही असे चित्र उभे राहणे चांगले नाही, असा सर्वांचा सूर होता.

यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना सल्ला देताना म्हटले, नेत्यांनी यापुढे काळजीपूर्वक बोलावे. आपला पक्ष वा महाविकास आघाडी सरकारला नुकसान होईल, तिन्ही पक्षांमध्ये ठिणगी पडेल किंवा वाद होईल अशी वादग्रस्त विधाने टाळावीत. आणि या सूचना अन्य नेत्यांनाही देण्यात याव्यात, असेही ठाकरे म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेते आणि त्यांची वक्तव्ये

जितेंद्र आव्हाड - स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता.


पृथ्वीराज चव्हाण - २०१४ मध्येच शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी काँग्रेससोबत चर्चा केली होती.


संजय निरुपम - इंदिरा गांधी यांच्या विरोधात दुष्प्रचार केला तर पश्चात्तापाची वेळ येईल.


नवाब मलिक - भविष्यात अजून अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहेत. संजय राऊत
यांना टोला.


एकनाथ शिंदे - आम्ही घटनेप्रमाणेच काम करतो त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्न नाही.

संजय राऊत - इंदिरा गांधी मुंबईत आल्यावर करीम लालाची भेट घेत असत. मात्र काँग्रेसने विरोध केल्यानंतर संजय राऊत यांनी माफी मागितली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा.


अशोक चव्हाण - संजय राऊत यांचे सावरकरां- बाबतचे विधान पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? तसेच सरकार स्थापन करण्यापूर्वी शिवसेनेकडून घटनेप्रमाणे काम करण्याचे लिहून घेतले आहे. घटनाबाह्य काम केले तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू. मुसलमानांसाठी शिवसेनेसोबत सत्तेत गेलो आहोत, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.

X