आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्यप्रेमी पोलिसांकडून पथनाट्याद्वारे जनजागृती, सोशल मीडियावरही लघुपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
जालना बसस्थानकात पथनाट्यद्वारे जनजागृती करताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
जालना बसस्थानकात पथनाट्यद्वारे जनजागृती करताना पोलिस कर्मचारी.

जालना : सुरक्षितता, अपघातावेळी मदत, वाहतूक नियम, गुन्ह्यांचा तपास यासारख्या बहुतांश बाबी पोलिस प्रशासनाला पाहाव्या लागतात. ही कामे करताना पोलिस प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बराच वेळ द्यावा लागतो. परंतु, यातूनही वेळ काढून जालन्यातील नाट्यक्षेत्रात आवड असलेल्या काही पोलिस अधिकारी, महिला पोलिसांनी 'वुई आर जालना सुपर कॉप्स' हा ग्रुप स्थापन केला. ग्रुपच्या माध्यमातून पथनाट्य सादर करीत त्याची 'शॉर्टफिल्म' करून वाहतूक शाखा, पोलिस-नागरिकांचा संवाद, दामिनी पथक, महिलांना सेल्फ डिफेन्सचे धडे, अपघात झाल्यानंतर पोलिसांनी कसा संपर्क साधावा, यासह विविध विषयांवर केलेले पथनाट्याचे व्हिडिओ व्हिडीओ सोशल मीडिया, यू-ट्युबवर अपलोड केल्यामुळे यातून जनजागृती होत आहे.


अपघात झाला की पोलिस, गुन्हा घडला की पोलिस, कुठे वाहतूक खोळंबली की पोलिस, कुणावर अत्याचार झाला की पोलिस उभा राहतो. परंतु, नागरिक म्हणून प्रत्येकाने काय काळजी घेतल्यास त्या समस्येवर तोडगा काढता येतो. अपघातानंतर पोलिस चौकशीला सामोरे जावे लागू नये म्हणून अनेकदा नागरिक मदत करण्याचे टाळतात. परंतु, आता न्यायालयाच्या निर्देशानुसार नागरिक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. दरम्यान, जालना शहरात वाहतूक समस्या कायम आहे. यासाठी नागरिक, वाहन चालकांनी काय काळजी घेतली पाहिजे, महिलांनी स्वसंरक्षण म्हणून काय काळजी घ्यावी, पोलिसांशी कसा संवाद साधावा, एखादा अपघात झाल्यास पोलिस, अॅम्ब्युलन्सशी कसा संवाद साधावा, याबाबत जनजागृती केली आहे. जालना शहरातील विविध भागांंमध्ये झालेले हे कार्यक्रम जालनेकरांना प्रेरणा देणारे ठरले आहेत. जालना शहरातील बसस्थानक, शिवाजी पुतळा, सदर बाजार चौक, गुरुनानक चौक, पोलिस मुख्यालयाच्या परिसरात हे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावर असल्यामुळे त्यातून नागरिकांना जनजागृतीचे धडे मिळत आहेत.


या नाटकाची स्क्रिप्ट लेखन लेखक संंजय सोनवणे यांनी केले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमासाठी सोनवणे यांच्यासह सुरेखा देशमुख, दिनकर चंदनशिवे, पूनम भट्ट, समशाद पठाण, धनाजी गवळी, दादाराव काळे, सपना वाघ, ज्योती खरात, ओम नागरे आदींनी परिश्रम घेतले.


या उपक्रमाचे पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुधीर खिरडकर, एलसीबीचे पीआय राजेंद्रसिंह गौर, एडीएसचे पीआय यशवंत जाधव, सदर बाजारचे संजय देशमुख, वाहतूक शाखेचे पीआय चत्रभूज काकडे आदींनी कौतूक केले आहे.

सप्ताहात जनजागृती करू


पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेला हा उपक्रम प्रेरणा देणारा आहे. नोकरी करीत असताना छंदातून सामाजिक क्षेत्रात घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. येणाऱ्या महिन्यात जनजागृती सप्ताह असतो. या सप्ताहात जनजागृतीसाठी त्यांना कला दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देऊ. -एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.