आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 दिवसांत कधीही निकाल; मंदिरे, मशिदींतून शांततेचे आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्या - अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही दिवशी येऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्याआधी त्यांच्या कार्यकाळातील ७ कामाचे दिवस शिल्लक आहेत. म्हणजे या ७ दिवसांत निकाल कोणत्याही दिवशी शक्य आहे. त्याआधी यूपी सरकार राज्यात सुरक्षा व्यवस्था चोख करण्यावर लक्ष देत आहे. संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत मंदिरे आणि मशिदींमधून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. रविवारी मेरठ शहरातील ६ मशिदींमधून शांततेचे आवाहन करण्यात आले. दारुल उलूम देवबंद उलेमाच्या आइमा संस्थेनेही लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. तर सोमवारी यूपीतील सर्व जिल्ह्यांतील गुप्तचर आणि एलआययू अधिकाऱ्यांची लखनऊत बैठक झाली. दरम्यान, अयोध्या वादावर निकाल येण्याआधी शिया वक्फ बोर्डाने सर्व वक्फ संपत्तीवर होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घातली आहे. यूपी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी वक्फ बोर्डाच्या नियंत्रणातील ठिकाणे ज्यात इमामबाडा, मशिदी,दर्गे, कार्यालय, स्मशानभूमी, मजार आदींवर अयोध्या मुद्द्यावर कोणतेही भाषण किंवा धरणे आंदोलन करण्यास मनाई केली आहे. जर या आदेशाचे एखाद्याने उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाच्या प्रती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. याआधी मुस्लिम संघटनांचे अनेक पदाधिकारी, मौलवी आणि बुद्धिजीवींनी अयोध्या मुद्द्यावर शनिवारी बैठक घेतली. संघटनांनी म्हटले आहे की, सर्वांनी अयोध्येवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करायला हवा.

तत्कालीन गृह सचिव गोडबोले म्हणाले, ...तर मार्ग निघाला असता
१९९२ मध्ये बाबरी विध्वंसावेळी केंंद्रीय गृह सचिव असलेल्या माधव गोडबोले यांनी सांगितले की, राजीव गांधींनी सक्रियता दाखवली असती तर मार्ग निघाला असता. राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे कुलूप उघडले. ते पंतप्रधान असताना मंदिराचा पाया रचला गेला. यामुळे मी त्यांना या आंदोलनाचा दुसरा कारसेवक म्हटले होते. पहिला कारसेवक त्या वेळी अयोध्येचे जिल्हाधिकारी होते. आम्ही कलम ३५५ लागू करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लावण्याचा संवैधानिक अधिकार आहे की नाही, याबाबत शंका होती.

अलिगड विद्यापीठाचे कुलगुरू, आखाडा परिषदेचे शांततेचे आवाहन
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मंसूर यांनी सोमवारी शांततेचे आवाहन केले. त्यांनी विद्यापीठाच्या संबंधित सर्वांना अयोध्येबाबत कोणतेही वक्तव्य न करण्याचे सांगितले आहे. विद्यापीठ प्रशासन सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अफवा पसरवण्यात येवू नये यासाठी लक्ष ठेवून आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी साधू, संत आणि सर्व सामान्य लोकांना अयोध्येत रामजन्मभूमी- बाबरी मशिद वादावर न्यायालयाचा निकाल आल्यावर शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले आहे. गिरी यांनी सोमवारी सांगितले की,भाजपचे प्रदेश संघटन मंत्री सुनील बंसल यांची त्यांनी रविवारी लखनऊत भेट घेतली होती.

चौदा कोसी परिक्रमा आज, १६ हजार डिजिटल व्हॉलंटियर्स नेमले
मंगळवारपासून अयोध्येत चौदा कोसी परिक्रमा सुरू होईल. नंतर पाच कोसी परिक्रमा व पौर्णिमा स्नानावेळी लाखो लोक जमतील. व्यवस्थेसाठी अर्धसैनिक दल, पीएसी आणि पोलिस तैनात करण्यात आले आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक, सीओ, निरीक्षक, उप निरीक्षक नेमण्यात आले आहे.

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे. माहिती तंत्राला प्रभावी करण्यासाठी १६ हजार डिजिटल व्हॉलंटिअर्स तयार केले आहेत, ते डिजिटल तंत्राने संशयित हालचालींची माहिती देण्यात मदत करताहेत.

अयोध्या व आसपाच्या जिल्ह्यांना रेड, येलो, ग्रीन, ब्ल्यू झोनमध्ये विभागण्यात आले आहे. अयोध्या रेड झोनमध्ये आहे. ब्ल्यू झोनमध्ये बाराबंकी, बस्ती, गोंडा, अमेठी, सुलतानपूर, आंबेडकरनगरपासूनच तपासणी केली जात आहे.

अयोध्येत आज चौदा कोसी परिक्रमा, मिरवणुकांवर बंदी
यूपीचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, अयोध्या प्रकरणावर सोशल मीडियात भडकवणारी पोस्ट टाकणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. आमची गुप्तचर यंत्रणा तयार आहे. एक पथक लक्ष ठेवून आहे. तिकडे अयोध्या प्रशासनाने जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मिरवणुका, निदर्शने, आयोजनांवर बंदी घातल्याचे जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...