आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या वाद : वादग्रस्त स्थळी पूजा करण्याचा आमचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्या वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात १० व्या दिवसाची सुनावणी झाली. यादरम्यान याचिकाकर्ता गोपालसिंह विशारद, हिंदू महासभा आणि निर्मोही आखाड्याच्या वकिलांनी बाजू मांंडली. विशारद यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ रंजितकुमार म्हणाले की, वादग्रस्त स्थळी पूजा करण्याचा आमचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. त्यांनी ८० वर्षीय अब्दुल गनी यांच्या साक्षीचा हवाला देताना म्हटले की, बाबरी मशीद राम जन्मभूमीवर तयार झालेली आहे. ब्रिटिश राजवटीत मशिदीत फक्त शुक्रवारचा नमाज होत होता आणि हिंदूही तेथे पूजा करण्यास येत होते. गनी यांनी शपथपत्रात म्हटले होते की, मशिदीचे बांधकाम राम मंदिर पाडून करण्यात आले होते. त्यांनी रामलल्ला आणि हिंदू पक्षकारांच्या युक्तिवादाचे समर्थन केले. पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ शुक्रवारीही या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवेल. 
 

सुप्रीम कोर्ट लाइव्ह :
घटनापीठासम‌ोर याचिकाकर्ता विशारद यांच्यातर्फे रंजीतकुमार यांनी बाजू मांडली. हिंदू महासभेतर्फे व्ही. एन. सिन्हा आणि निर्मोही आखाड्यातर्फे सुनीलकुमार जैन यांनी बाजू मांडली. वाचा सुप्रीम कोर्टाची लाइव्ह कार्यवाही....
 
}    रंजीतकुमार : काही मुस्लिमांनी १९५० मध्ये फैजाबाद जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शपथपत्रात म्हटले होते की, वादग्रस्त जमिनीवर मंदिर होते. मशीद बनवण्यासाठी ते पाडण्यात आले.
}    न्यायमूर्ती ए. एस. बोबडे : त्यांची उलट तपासणी झाली होती का?
}    रंजीतकुमार : त्यांनी स्वत: समोर येऊन जबाब दिला होता, तो तीन वृत्तपत्रांत छापला होता. कोणीही जबाबाला विरोध केला नाही. 
}    न्यायमूर्ती बोबडे : हे शपथपत्र हायकोर्टाच्या रेकाॅर्डमध्ये कसे ठेवण्यात आले?
}    रंजीतकुमार : ते खटल्यात दाखल झाले होते. खटला हायकोर्टात ट्रान्सफर झाला होता. न्यायालयाने ते मान्य केले नाही, कारण पक्षकार हजर झाले नव्हते. 
}    न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड : शपथपत्रातील जबाब सिद्ध करण्यासाठी संबंधित व्यक्ती युक्तिवादासाठी येणे आवश्यक आहे.
}    रंजीतकुमार : या प्रकरणी सुनावणी नंतर झाली.
}    सरन्यायाधीश : तुम्ही या स्टेजवर त्याला आव्हान द्याल का?
}    रंजीतकुमार : ही २० शपथपत्रं हायकोर्टाच्या निकालाचा भाग आहेत. हिंदू आणि हिंदुत्वाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या एका जुन्या निकालानुसार मला पूजा करण्याचा हक्क आहे, त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. हायकोर्टाच्या निकालात सर्व शपथपत्रांचा उल्लेख आहे, त्यात म्हटले आहे की, १९३४ नंतर वादग्रस्त जागी नमाज अदा झाली नाही. तेथे हिंदूंनी पूजा सुरू ठेवली. माझा अधिकार आताही कायम आहे. 
त्यानंतर हिंदू महासभेचे वकील व्ही. एन. सिन्हा यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली.
}    सिन्हा : आम्ही रामलल्ला विराजमान यांच्या वकिलांच्या या म्हणण्याशी सहमत आहोत की वादग्रस्त जमिनीवर आधी राम मंदिर होते. या प्रकरणात माझी मदत करत असलेले अॅडव्होकेट आॅन रेकाॅर्ड यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मला थोडा अवधी देण्यात यावा.
}    सरन्यायाधीश : ठीक आहे, तुम्ही शेवटी बाजू मांडा. आता निर्मोही आखाड्याचे सुशीलकुमार जैन यांनी आपली बाजू मांडावी.
}    जैन : पूजास्थळाची देखभाल आणि व्यवस्थापनाचे अधिकार तसेच केस दाखल करण्याची कालमर्यादा यावर बाजू मांडेन.
}    सरन्यायाधीश : त्यावर तुम्ही याआधीही बाजू मांडली आहे.
}    न्यायमूर्ती चंद्रचूड : आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, तुम्ही म्हणता की आम्ही देखभाल आणि व्यवस्थापन करणारे आहोत. त्यामुळे तुमचा एक तृतीयांश हिस्सा जात आहे. या गोष्टी विरोधाभासी आहेत.
}    जैन : मला फक्त तेथे पूजेचा हक्क हवा आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उदाहरण देऊ शकतो, त्यात म्हटले आहे की, फक्त देखभाल आणि व्यवस्थापन करणाराच खटला दाखल करू शकतो.
}    सरन्यायाधीश : मिस्टर जैन, तुम्ही योग्य पद्धतीने तयारी केलेली नाही. उद्या चांगली तयारी करून या.
- त्यानंतर सुनावणी शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आली.
 

बातम्या आणखी आहेत...