आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुर्वेद  : वर्षा ऋतूमध्ये आरोग्याची गुरुकिल्ली 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीष्म ऋतूत शरीरात संचित झालेल्या वाताचा वर्षा ऋतूत येणारे ढग, पाऊस, शीतवायू यामुळे प्रकोप होतो. परिणामी या ऋतूत संधिवात, आमवात, वातरक्त यांसारखे वाताचे आजार बळावतात. ते टाळण्यासाठी आयुर्वेदात काय सांगितले आहे...? 


आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद व हेमंत. ग्रीष्म ऋतूत आग ओकणाऱ्या सूर्याच्या किरणांनी तप्त झालेल्या सृष्टीला, आपल्या सरींनी शीतलता प्रदान करणाऱ्या वर्षा ऋतूचे आगमन होते. वर्षा ऋतू हा दक्षिणायनातील प्रथम ऋतू आहे. दक्षिणायनात वर्षा, शरद व हेमंत या तीन ऋतूंचा समावेश होतो. या ऋतूंत सूर्याचे बल कमी असते. तसेच दिवसही लहान असतो. त्यामुळे सूर्याचा आग्नेय प्रभावही कमी वेळ असतो. याउलट रात्र मात्र मोठी असते. त्यामुळे चंद्राचे बल वाढलेले असते. परिणामी मनुष्याचा बलाचा विसर्ग (वृद्धी ) होतो. म्हणूूनच दक्षिणायनालाच विसर्गकाल असेही म्हणतात. ग्रीष्म ऋतूत शरीरात संचित झालेल्या वाताचा वर्षा ऋतूत येणारे ढग, पाऊस, शीतवायू यामुळे प्रकोप होतो. परिणामी या ऋतूत संधिवात, आमवात, वातरक्त यांसारखे वाताचे आजार बळावतात. तसेच वर्षा ऋतूत जल हे स्वभावतःच अाम्लविपाकी होते, परिणामी अग्निबल कमी होते म्हणून अग्निमांद्य निर्माण होते. 


रोगाः सर्वेऽपि मंदाग्नौ (अ.दृ.नि १२/१) । 
वर्षा ऋतूत मंदाग्नी झाल्यामुळे आम्लपित्त, अजीर्ण, अतिसार, उदरशूल इत्यादींसारखे आजार वाढतात. तसेच अग्निमांद्यामुळे अन्नाचे पचनही नीट होत नाही. त्यामुळे आमांश तयार होतो, परिणामी धातूंना पोषक आहार रस न मिळाल्यामुळे धातूंचाही क्षय होतो. म्हणूनच या ऋतूत मनुष्यबल सर्वात कमी असते. त्यामुळे रोगांचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी होते. परिणामी आजारांचे प्रमाणही वर्षा ऋतूत वाढते. 


स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं ।। आतुरस्य विकार प्ररामनं च ।। ( च.सु. ३०/२८ ) 
याप्रमाणे निरोगी व्यक्तीच्या आरोग्य रक्षणार्थ आयुर्वेदात वर्षा ऋतूच्या दिनचर्येचे सुरेख वर्णन केलेले आहे. वर्षा ऋतूत प्रामुख्याने वात दोषाचा प्रकोप व पित्त दोषाचा संचय होतो. म्हणून या ऋतूत स्वास्थ्यरक्षणार्थ प्रामुख्याने मधुर, आम्ल, लवण,रसात्मक,तसेच स्निग्ध व उष्ण आहाराचे सेवन करावे. 


वर्षा ऋतू व पथ्य (काय करावे) पथ्यकर आहार - जुने धान्य - नवं धान्यमभिष्यन्दि, लघु सवंत्सरोषितम् ।(अ.हृ.सु.८/२३). | नवीन धान्य हे अभिष्यंदी असते. त्यामुळे ते पचनास जड असते. याउलट जुने धान्य हे पचनासाठी हलके असते. 


जुना मध :- वातलं वातकोपेऽपि वर्षासू मधु शस्यते ।। 
जुना मध हे वर्षा ऋतूत वाढलेल्या वातदोषाचे शमन करण्यास मदत करते. लवण रसात्मक भोजन - लवण ( खारट ) रस हा पचनशक्ती वाढवतो तसेच वातवृद्धीमुळे होणारे स्तंभ, संघात, बन्ध यांचा नाश करतो. । पंचकोल मिश्रित पेया - (पिप्पली, पिप्पलीमूळ, चत्य,चित्रक, शृंठी ) 
पंचकोलातील द्रव्ये ही अग्निदीपक, पाचक, स्तोतोरोध दूर करणारी, वात व कफाचे शमन करणारी आहेत. 


उष्णोदक (गरम पाणी) - अग्निसंस्कारामुळे पाणी हे पचनास हलके होते. अग्निदीपन करते, वात व कफ दोषांचे शमन करते. 


लघु भोजन - या ऋतूत अग्नी मंद असतो म्हणून पचनासाठी हलक्या पदार्थांचे सेवन करावे. 


मुदग युष - संैधव, धने, जिरे, पिप्पली यांचे चूर्ण टाकून बनवलेले मुदग युष हे वृद्धी झालेल्या पित्त व कफ दोषांना नष्ट करते. 
मांसरस (शृंठी व स्नेहयुक्त) : मांसरस हे बृहण (पुष्टीकारक ), प्रीणन (तृप्तिजनक) व वृष्य आहे. त्यात वापरण्यात येणारी शृंठी ही कफ व वात शामक आहे. 


लसूण - हे रसायन आहे, कफवात दोषांचे शमन करणारे, अग्निदीपक, रुचिकर व कास, श्वास नष्ट करणारे आहे. 


जांभूळ - जाम्बवं कफपित्तघ्नं ग्राही वातकरं परम् (च.सू. २७) 
जांभूळ हे गोड, तुरट रसाचे फळ असून कफ पित्त दोषांचे शमन करते. दीपक, पाचक असल्यामुळे अग्निमांद्य दूर करते. अजीर्ण, शूल प्रवाहिकेतही याचा उपयोग होतो. 


कूष्मांड - वल्लीफलानां प्रवंर कूष्माण्ड वातपित्तजित । (अ.ह.सू.६/४४) कूष्मांड हे वात पित्त दोषनाशक व वृष्य आहे. 


पथ्यकर विहार - वर्षा ऋतूत पाण्याचे बाष्प, थंड हवा येणार नाही अशा ठिकाणी झोपावे म्हणजे वातदोषाचा प्रकोप होणार नाही. वर्षा ऋतूत उन्हात वाळवलेले सुके कपडे घालावेत. ओले कपडे घातल्यास शीतगुणामुळे वात कफ दोषांचा प्रकोप होऊन प्रतिश्याय, कास, त्वचारोग यांसारखे आजार होतात. वर्षा ऋतू व अपथ्य (काय करू नये) अपश्यकर आहार - मटार (वाटाणा ) - कलायस्त्वतिवातलः । ( अ. सू ७/१४) 
मटारच्या अतिसेवनामुळे वातदोषाची वृद्धी होऊन आजारांची निर्मिती होते. 


उडीद - उडीद हे पचनास जड असून कफ पित्त दोषांची वृद्धी करतात. 


मोड आलेले धान्य - हे पचनास जड असून दोषांची वृद्धी करणारे असतात. 


पालक - गुर्वी सरा तु पालडकया । ( अ.हृ.सू.६/४३) 
पालक पचायला जड असते त्यामुळे वर्षा ऋतूत तिचे सेवन करू नये. 


अपथ्यकर विहार - दिवास्वाप - वर्षा ऋतूत दिवसा झोपल्यामुळे शरीरातील स्निग्धता वाढून कफज रोगांची निर्मिती होते. 


रात्री जागरण - रात्रौ जागरणं रुक्षं । (अ.हृ.सु. ७/५८) 
रात्री जागरण केल्यामुळे शरीरातील रुक्षता वाढते. त्यामुळे वाताचे आजार होतात. आयास (परिश्रम)। वर्षा ऋतूत अतिश्रमाची कामे केल्याने वात व पित्ताची वृद्धी होऊन आजार होतात. 


वर्षा ऋतू व पंचकर्म - अभ्यंग - अभ्यंडामाचरेन्नित्यं, स जराश्रमवातहा । (अ.सू. २/८)। 
त्वचा हे वात दोषाचे स्थान आहे. रोज तेलाने अभांग केल्याने वातदोषाचे शमन होते. मनाची चंचलता कमी होते. 


अस्थापन बस्ती - वयःस्थापनात् दोषस्थापना वा अस्थापनम् । 
पक्वाशयातील वातप्रधान दोष, मलपित्तकफ यांना बाहेर काढण्यासाठी, प्राधान्याने शोधनासाठी व बलप्राप्तीसाठी अस्थापन बस्तीचा उपयोग केला जातो. तसेच बस्ती प्रभावाने सर्व शरीरस्थ रोध, वातावरील आवरण कमी करते. त्यामुळे वर्षा ऋतूत सर्वांनीच वात दोषांवर मात करीन निरोगी राहण्यासाठी बस्ती करून घ्यावा. याप्रमाणे आयुर्वेदातील नियमांची कास धरून निरामय जीवन व्यतीत करावे. 


डॉ.सविता नरेंद्र कऱ्हाडे 
लेखकाचा संपर्क - 9561218541 
narendrakarhade@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...