आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवाळीची खरेदी पडली महागात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बबन मोरे

दिवाळीत प्रत्येक दुकानात ऑफर्सचा अक्षरश: पाऊस पडतो. वर्षभर मॉलला खरेदी करूनही दिवाळीत खरेदी करण्याची लोकांची हौस फिटत नाही. मात्र या ऑफर्सच्या लोभापायी अनेकदा फजितीही होते. अशाच एका फजितीचा हा अनुभव...
 

माझी मुंबईला बदली झाली होती. तिथंच माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी. नुकताच पगार आणि बोनसमुळे खिसा एकदम गरम होता. घरी सगळ्यांसाठी खरेदी करून त्यांना गिफ्ट द्यायचं ठरवलं. रूम पार्टनर मित्रासोबत खरेदीला निघालो. दिवाळीची गर्दीत एका दुकानातील बोर्ड बघून आम्ही आत शिरलो. ४०० रुपयांत आम्हाला ड्रेस मिळाला. शिलाईच्या किमतीतच ड्रेस मिळाल्यानं आम्ही खुश होतो. जवळच आकर्षक साड्या दीडशे रुपयात होत्या. मी तीन साड्या माझ्या वहिनी, बहीण आणि बायकोसाठी घेतल्या.  इतके स्वस्त कपडे आणि साड्या मिळाल्याने आम्ही खुशीत होतो. पुढं गेल्यावर पुन्हा इलेक्ट्रॉनिकचे दुकान होते. त्या दुकानात स्वस्तात कॅल्क्युलेटर आणि घड्याळ विकायला होते. आम्ही किंमत ठरवणार तितक्यात पोलिसांची गाडी आली. त्यामुळे आम्हाला पटकन खरेदी करावी लागली. तशाच पद्धतीने आम्ही लहान मुलांचे कपडे, फराळासाठीच्या सामानाची खसखस, बेदाण,े काजू पॅकेट घेतले. दिवसभर खरेदी करून रूमवर आलो. लगेचच आमची गाडी होती. रात्रभर प्रवास करून सकाळी गावी पोहोचलो. घरच्यांना आनंद झाला. बच्चे कंपनीलाही खूप उत्सुकता होतीच. चहापाणी होताच बॅग उघडली. प्रत्येकाला पॅकेट दिले. आईने तर माझे खुप कौतुक केले. त्या कौतुकानेच मी आनंदलो. दहा-पंधरा मिनिटं झाल्यावर लगेचच सगळेच सुरू झाले.

“मामा, हे खेळातले कॅल्क्युलेटर आहेत”,“अहो, या काय साड्या आहेत?” दोन धुण्यात पोताऱ्याचा बोळा होतील”, “हे ड्रेस जरी चांगले वाटत असले तरी एक धुण्यात सुटपँट बर्म्युडा आणि बंडीसारखे होतील. लहान मुलांचे ड्रेस तर झबल्य सारखे आहेत.” “भाऊजी, घड्याळ्यात चुन्याची डबी आहे. काका, बदाम, काजू कडू आहेत. आणि खसखस म्हणून राजगिरा दिला आहे. त्या मेल्यांनी चांगलंच फसवलं तुम्हाला.”

“पोरा, दोन पैसे जास्तीचे लागले तरी गावात, ओळखीच्या दुकानातूनच खरेदी करावी म्हणजे आपली फसगत होत नाही. वस्तू आवडली नाही तर बदलून घेता येते. मुंबईच्या भामट्यांनी ‘मामा बनवले तुला,’ साऱ्यांनी एकासुरात शेरा दिला. त्यानंतर माझी काय अवस्था झाली असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. माझा चेहरा अगदी बघण्यालायक झाला होता. 

लेखकाचा संपर्क- ९४०३४१८९८१

बातम्या आणखी आहेत...