आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबर ना कधी अयोध्येला गेला, ना मशीद उभी केली; राम जन्मभूमी जीर्णोद्धार समितीचा दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अयोध्या विवाद सुनावणीच्या १३ व्या दिवशी मंगळवारी राम जन्मभूमी जीर्णोद्धार समितीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. बाबर ना कधी अयोध्येला गेला होता. अयोध्येत कसलेही युद्ध झाले नाही आणि ना तेथे कोणती मशीद उभी केली, असा दावा जीर्णोद्धार समितीने केला आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने विचारले की, बाबराने मंदिर उद्ध्वस्त करून त्या जागी मशीद उभी केली नव्हती? समितीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ पी.एन.मिश्रा यांनी हो असे उत्तर दिले.  मिश्रा यांचा युक्तिवाद अद्याप पूर्ण व्हायचा आहे. तो बुधवारीही सुरू राहील. हिंदू पक्षकार निर्मोही आखाड्याचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मिश्रा यांनी एका नकाशावर जेथे पूजा होत होती ते ठिकाण दाखवले. मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी त्यावर आक्षेप घेत सांगितले की, या नकाशात अनियमितता आहे. न्या. बोबडे यांनी मिश्रा यांना विचारले की त्यांचे प्रकरण काय आहे ? ते म्हणाले, बाबराने मशीद उभी केली नव्हती. मीर बांकी ही व्यक्तीच नव्हती. आमचे प्रकरण हे आहे की, प्राचीन काळापासून आम्ही पूजा करतो आहोत आणि निरंतर ती सुरू आहे. मूर्तीदेखील आदिकाळापासून आहेत. एखाद्या मालमत्तेचे वक्फ होण्यासाठी पहिली अट असते की त्याचा कोणीतरी मालक असावा. दुसरी अट अशी की तेथे अजान व्हायला हवी. मी उच्च न्यायालयात सिद्ध केले होते की शिलालेख बनावट होते. बाबर कधीच अयोध्येला गेलाच नव्हता. युद्ध झाले नाही. १८ व्या शतकांत जेव्हा टिफेंथेलर तेथे गेले होते त्याला दिसले की हिंदू तेथे प्रार्थना करत होते. १८८५ मध्ये न्यायाधीशांनी या ठिकाणचा दौरा केला तेव्हा तेथे शिलालेख आढळला नाही.