आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली होती बुद्धमूर्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर मगर

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या हाॅटेल श्याम येथे आढावा बैठक घेतली होती. तेव्हा समजले की धम्मदीक्षेला बुद्धमूर्तीच नाही. अजब बंगला वस्तुसंग्रहालयात मात्र बुद्धमूर्ती असल्याचे कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले. बाबासाहेबांनीही क्षणाचाही विलंब न लावता मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्लांना फोन करून बुद्धमूर्ती मागितली. त्यांनी होकार देताच रात्री १२ वाजता बुद्धमूर्ती आणली अन् मग सकाळी धर्मांतराचा सोहळा पार पडला.

‘हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही,’ बाबासाहेबांनी केलेल्या या घोषणेला प्रत्यक्षात आणण्याचा योग १८ वर्षांनी आला. बाबासाहेब घोषणेच्या प्रतिपूर्तीसाठी दिल्लीहून नागपुरात आले होते. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब स्वत: धर्मांतर करून मग इतरांना दीक्षा देणार होते. त्यासाठी वामनराव गोडबोलेंच्या अध्यक्षतेत स्वागत समिती गठित केली होती. बाबासाहेब हाॅटेल श्याम येथे मुक्कामी होते. तिथे तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वागत समितीची बैठक बाबासाहेबांनी घेतली. त्या वेळी गोडबोले आणि सदानंद फुलझेलेंनी सांगितले की, धम्मदीक्षेच्या सोहळ्यासाठी तर बुद्धमूर्तीच नाही. ६३ वर्षांपूर्वी बौद्ध धम्माचा प्रसार-प्रचार नव्हता म्हणून बुद्धमूर्तीचा अभावच होता. नागपुरातील ‘अजब’ वस्तुसंग्रहालयात बुद्धमूर्ती आहे. पण वस्तुसंग्रहालय मध्य प्रदेश सरकारचे असून त्यांच्या परवानगीशिवाय मिळणे कठीण असल्याचेही कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी नागपूर ‘सीपी अँड बेरार’ अर्थात आत्ताच्या मध्य प्रदेशात होते. ‘अजब’ वरही ‘सीपी अँड बेरार’ प्रशासन होते. पण बाबासाहेबांना आठवले की, दिल्लीहून मध्य प्रांताचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांच्यासाेबतच आपण आलो आहोत. शुक्ला काँग्रेसचे नेते होते, त्यांना बाबासाहेबांनी फोन करून ‘अजब’मधील मूर्ती एक दिवसासाठी मागितली. शुक्ला यांनीही तातडीने मूर्ती देण्याचे आदेश दिले. त्यानंतर रात्री बारा वाजता अजब बंगला वस्तुसंग्रहालयात जाऊन गोडबोले यांनी मूर्ती आणली. हाॅटेल श्याममध्ये बाबासाहेबांसमोर नेऊन ठेवली. त्यानंतर सकाळी ९ वाजता मोठ्या थाटात हा  धर्मांतर सोहळा होऊ शकला, अशी माहिती समोर आली आहे.

मूर्ती आता चिचोलीच्या वस्तुसंग्रहालयात
वामनराव गोडबोले यांनी काटोल रोडवरील चिचोली येथे बाबासाहेबांच्या स्मृतींचे जतन केले आहे. येथे सुमारे १३ एकरांमध्ये बाबासाहेबांच्या वस्तूंचे भव्य वस्तुसंग्रहालय उभारले आहे. दिल्ली येथील ‘२६, अलिपूर रोड’ या बाबासाहेबांच्या बंगल्यातील एेतिहासिक वस्तूदेखील संग्रहित केलेल्या आहेत. त्याशिवाय धम्मदीक्षेत वापरलेली अष्टधातूची बुद्धमूर्तीदेखील याच संग्रहालयात जतन केली आहे. गोडबोलेंच्या निधनानंतर संजय पाटील आता या वस्तुसंग्रहालयाचे  सर्वकाही काम पाहतात.
 

मूर्ती पाहण्यासाठी देशातून पर्यटक येतात 
सुमारे दोन फुटांची ही मूर्ती आता पर्यटकांचे आकर्षण झाले आहे. नानकचंद रत्तू यांनी गोडबोलेंना दिलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. प्रत्येक वस्तू आम्ही जिवापाड जपली आहे. विशेषत: बुद्धमूर्ती पाहण्यासाठी देशातून आंबेडकर अनुयायी येथे येतात. या ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंचे जतन करण्यासाठी फडणवीस सरकारने निधी मंजूर केला आहे. - संजय पाटील, संचालक, चिचोली वस्तुसंग्रहालय