आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला स्थानिक प्रशासनामुळे ब्रेक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन (ग्रेट ब्रिटन) येथील महाराष्ट्र सरकार निर्मिती करत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला मोठा ब्रेक लागला आहे. लंडन येथील स्थानिक प्रशासनाने निवासी जागेचे वस्तुसंग्रहालयात परिवर्तन करण्यास आक्षेप घेतल्याने स्मारकाचा प्रश्न आता न्यायालयात गेला असून सररकाने याबाबत समिती नेमली आहे. डाॅ. आंबेडकर हे वर्ष १९२१-२२ मध्ये लंडन येथे शिक्षण घेत होते. त्या काळात ते १० किंग हेन्री रोड, लंडन येथे वास्तव्यास होते. ती चार मजली इमारत राज्य सरकारने खरेदी केली होती व तिचे स्मारकात रूपांतर होणार होते. मात्र, तेथील क्विन कौन्सिल या स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यास आक्षेप घेतला आहे. निवासी जागेचे वस्तुसंग्रहालयात रूपांतर करता येणार नाही, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. हा वाद आता स्थानिक न्यायालयात गेला आहे. याची सुनावणी २४ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासमवेत शुक्रवारी मंत्रालयात एक बैठक घेतली. लंडन येथील न्यायालयातील सुनावणीस राज्य सरकारचा प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये ब्रिटन दौऱ्यात या स्थळास भेट दिली होती.

स्थानिक प्रशासन मंजुरी देईल : मंत्री महातेकर
लंडन येथील स्थानिक स्वराज्य संस्थेने वस्तुसंग्रहालयास संमती दिल्यानंतरच या घराचे स्मारकात रूपांतर करण्यात येईल. लंडनचे स्थानिक प्रशासन या स्मारकाला संमती देईल, असा विश्वास सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी व्यक्त केला.

बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अँड को. सॉलिसिटर्स
क्वीन कौन्सिल यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनुसार त्यांच्यासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अँड को. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात क्वीन कौन्सिलपुढे महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये तज्ञ स्टीव्हन आणि चार्ल्स या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार असून त्यास महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...