Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Babasaheb gives guidance to youngsters from wrestling to Kalaram Satyagrah

काळाराम सत्याग्रहासाठी कुस्तीच्या आखाड्यातून केले तरुणांचे प्रबोधन

सई कावळे | Update - Apr 14, 2019, 11:41 AM IST

महिलांचा सहभाग : मोठा राजवाड्यात घेतल्या होत्या बैठका

 • Babasaheb gives guidance to youngsters from wrestling to Kalaram Satyagrah

  नाशिक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारलेले होते. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते. नाशिकचे शंकरराव गायकवाड यांचाही सदस्य म्हणून समावेश होता. आंदोलनापूर्वी राज्यभर जनजागृती करण्यात आली होती. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाडचे होते, पण नाशिकच्या मोठा राजवाडा येथे स्थायिक झाले होते. सखाराम वस्ताद काळे यांनीही शहरातील तरुणांच्या प्रबोधनाची जवाबदारी घेतली होती. समानतेसाठी वस्तादांनी कुस्तीच्या आखाड्यातूनच प्रबोधनाची चळवळ सुरू केली होती.

  सखाराम वस्ताद यांनी सध्याचे जुने नाशिक, वडाळा गाव, काळे नगर म्हणजेच मोठा राजवाडा येथे तालमी उभ्या केल्या. या माध्यमातून त्यांनी तरुणांना एकत्र करून समानतेची शिकवण दिली. त्यांच्या तालमीमध्ये सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम होत, या कार्यक्रमाला स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. एवढेच नाही तर त्यांच्या पत्नींना सोबत घेऊन महिलांसाठीदेखील काम सुरू केले. सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून ते प्रयत्नशील होते. आंबेडकरी विचारांच्या प्रभावामध्ये त्यांनी शहरामध्ये महत्त्वाच्या बदलांची पायाभरणी केली.
  सखाराम वस्ताद काळे यांची पत्नी सती गेली होती : सखाराम वस्ताद यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या तालमीच्या माध्यमातून होणारे लोकप्रबोधन लक्षात घेत बाबासाहेबांनी त्यांच्या समाधीचा दगड ठेवला. नाशिकच्या सध्याच्या मोठ्या राजवाड्यातील काळे चौक किंवा सखाराम वस्ताद पटांगण
  येथे ही आठवण पाहायला मिळते.

  या पटांगणावर एक मोठी विहीर होती, ज्यामध्ये सखाराम वस्ताद यांच्या पत्नी सती गेल्या. पण सखाराम वस्ताद यांच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून ही विहीर तात्काळ बंद केली गेली. सती प्रथेच्या विरोधात हा निर्णय घेतला गेल्याची माहिती त्यांचे नातू बॉबी काळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

  ...अन् रामकुंडात बेलमास्तरांनी घेतली होती उडी
  रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी बेलमास्तर शंकरराव गायकवाड यांच्यावर सोपवली होती. गोदावरीच्या तीरावर जनता सत्याग्रहासाठी सज्ज होती. ब्रिटिश पोलिसही रामकुंडावर पहारा देत होते. शहरात तणावपूर्ण शांतता होती. अंगरखा, धोतर, पुणेरी जोडा, पंचा, कपाळावर गंधाचे तीन आडवे पट्टे व मधोमध लाल रंगाचा गोल कुंकवासारखा टिळा अशा वेशात शंकरराव २ मार्चला रामकुंडावर आले व अंगातील वेश उतरवून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशी जोरदार घोषणा देत पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी त्यांना कुंडाबाहेर काढून बेदम मारहाण केली. अस्पृश्य तरुणाने रामकुंडात उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश जिल्हाधिकारी गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश, दृढ निश्चय पाहून त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.

Trending