आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअटलबिहारी वाजपेयी हे विसंवादी वातावरणातही सुखेनैव राजकारणाचा संसार करणारे सांब शंकर होते...अटलबिहारी वाजपेयींच्या वक्तृत्वाला प्रतिभा आणि बुद्धीची भरजरी झालर होती....अटलबिहारी वाजपेयींच्या राजकारणशैलीत विनम्रता आणि ऋजुता होती...अशा या आगळ्या नेत्याच्या जागवलेल्या आठवणी...
अगदी खरं सांगू का? अटलबिहारी वाजपेयींबद्दल बोलायला श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा दीनदयाळ उपाध्यायच हवेत. तुम्हा-आम्हा सामान्यांनी त्यांच्या काय आठवणी सांगाव्यात? माझ्या आणि अटलजींच्या पुष्कळ गाठीभेटी झाल्या. त्यांची अनेक भाषणं मी ऐकली. दिल्लीमध्ये कधी गेलो की ते आवर्जून भेट द्यायचे. ‘बाबाजी आये क्या’, असा त्यांचा प्रश्न असे. मराठी त्यांना उत्तम यायचं. म्हणजे, सगळं समजायचं. बोलायचे मात्र ते हिंदी लहेजा घेऊनच. मराठी माणसाशी आवर्जून ते मराठीत बोलायचे.
‘एनडीए’च्या निमित्तानं अटलजींनी अनेक पक्षांना एकत्र आणत सरकार चालवण्याची कसरत केली होती. ते पंतप्रधान असतानाच्या काळात दिल्लीत आमची एकदा भेट झाली. तेव्हा मित्रपक्षांकडून अटलजींच्या होणाऱ्या अडवणुकीबद्दलची चर्चा सतत होत असे. त्या अनुषंगानं भेट झाल्यावर अटलजींना एका संस्कृत श्लेकाचा अर्थ सांगून त्यांची तुलना मी शंकराशी केली होती. त्या श्लोकात असं म्हटलं होतं, “शंकराला दोन पत्नी. पार्वती आणि गंगा. या दोघींचं आपसात पटत नाही. शंकराचं वाहन नंदी, पार्वतीचं वाहन सिंह आणि गंगेचं वाहन मगर. या तिघांचं एकमेकांशी जुळत नाही. शंकराला दोन मुलं गणपती आणि कार्तिकेय. या दोघांमध्येही आपसात बंधुभाव नाही. गणपतीचं वाहन उंदीर आणि शंकराच्या गळ्यात नागराज. या दोघांचं एकमेकांशी जन्माचं वैर. म्हणजे, अवतीभोवती सगळा विसंवाद, मेळ खाणारी एकही गोष्ट नाही, सगळे वादच. तरीही शंकर हसतखेळत सुखानं संसार करतो.” असा अर्थ सांगून मी म्हणालो की, एनडीए सरकारचं नेतृत्व करणाऱ्या अटलजींची अवस्था ही त्या शंकरासारखीच आहे. विसंवादी वातावरणातही तुम्ही हसतमुखानं सगळं निभावून नेता. हे ऐकवल्यावर अटलजींनी दिलखुलास हसत टाळीसाठी हात पुढे केला होता.
मी नुकतीच वयाची ९७ वर्षं पूर्ण केलीत. अटलजीही दीर्घायुषी होते. राजकीय-सामाजिक पटलावर त्यांनी हजारो भाषणं दिली. शिवचरित्राचा ध्यास घेऊन मी अनेक व्याख्यानं दिली आहेत. लहानपणापासून अनेक थोरामोठांची भाषणं मी ऐकली आहेत. त्यांचे पक्ष कोणते, त्यांचा विचार कोणता या राजकारणाशी माझा संबंध नसायचा. पण त्यांच्या भाषणांचा आनंद लुटण्यासाठी मी जात असे. माझ्यावर प्रभाव पडलेल्या वक्त्यांपैकी दोन-तीन नावं चटकन आठवतात. ते म्हणजे, स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर आणि अटलबिहारी वाजपेयी. दोघंही अत्यंत प्रभावी. श्रोत्यांच्या काळजाला हात घालणारी वक्तृत्वशैली त्यांच्याकडे होती. लाखोंची गर्दी खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्याकडे होती. पण तरी मी अटलजींना तात्यारावांच्या पुढे एक पाऊल ठेवेन. अटलजींची संवादशैली नैसर्गिक होती. सावरकरांचं भाषण काहीसं प्रचारकी असायचं. जोर देऊन ते बोलायचे. सरोजिनी नायडू यांचंही वक्तृत्व खूप प्रतिभाशाली होतं. पंडित नेहरूंचं वक्तृत्व मात्र तितकंसं दर्जेदार नव्हतं. किंबहुना वाजपेयी आणि नेहरूंची तुलना करताना वाजपेयींना जर मी दहा गुण दिले, तर नेहरूंना एकच गुण देईन. अर्थात विद्यार्थी या नात्यानं माझं स्वतःचं मत झालं हे. एक गंमत सांगतो. चीनबरोबरच्या युद्धानंतरचा प्रसंग आहे. पंडित नेहरूंवर संसदेत अत्यंत कडवट टीका झाली होती. त्याला उत्तर देण्यास नेहरू उभे होते. बोलताना त्यांनी देशाला उद्देशून शब्द दिला की, यापुढे भारताची एक इंचही जमीन चीनच्या ताब्यात जाणार नाही. त्यावर अटलजींनी शांतपणे प्रश्न विचारला, “प्रधानमंत्रीजी के एक इंच में कितने किलोमीटर आते है?” नर्मविनोदी शैलीत पण मार्मिकतेनं प्रहार करण्याची ताकद अटलजींच्या वक्तृत्वात होती. समोरच्याला न दुखावता मुद्दा त्याच तीव्रतेनं पोहोचवणं ही सोपी गोष्ट नाही. उत्कृष्ट वक्त्याजवळ प्रतिभा आणि बुद्धीचा संगम असतो. या दोन्ही गोष्टी अत्यंत उत्तुंग स्वरूपात अटलजींना लाभल्या होत्या.
माझ्या एकसष्ठीला की पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला नेमकं आठवत नाही, पण अटलजी आले होते. माझ्याबद्दल अर्थातच ते चांगलं बोलले. ते मी स्वतःच सांगणं योग्य नाही. माझा असा कयास आहे की, ‘राजा शिवछत्रपती’ त्यांनी वाचलं असणार. शिवचरित्रातून त्यांना बौद्धिक आनंद मिळायचा. आपल्याला असं उगाचच वाटतं की उत्तरेकडच्या लोकांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल एक प्रकारचा आकस आहे. वास्तविक तसं नाही. छत्रपती शिवाजींबद्दल उत्तर भारतीयांना आकस असल्याचा गैरसमज आपण करून घेतलाय. खरं तर आपण महाराष्ट्रीय मंडळीच अनेकदा शिवाजी राजांच्या नावावर घमेंड मिरवतो; म्हणजे कर्तृत्व गाजवलं, इतिहास निर्माण केला तो शिवाजी राजांनी आणि आपण फक्त त्याची शेखी मिरवण्यात धन्यता मानतो. शिवाजी राजांच्या समग्र कर्तृत्वाचंही आकलन करून घेण्याचे कष्ट आपण घेत नाही. अटलजींना छत्रपती शिवरायांचं राजकारण समजून घेण्यात रस असायचा. शिवरायांनी प्रतिकूलतेतून स्वराज्य कसं निर्माण केलं, यामागचं त्यांचं नियोजन, मुत्सद्देगिरी जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
अटलजींच्या काळात झालेलं कारगिल युद्ध हे म्हटलं तर त्या वेळच्या गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं. पण मोठ्या धीरानं त्यांनी या संकटाचा सामना करून पाकिस्तानविरोधातलं युद्ध जिंकलं होतं. रणभूमीवरची अत्यंत विषम, व्यस्त लढाई आपल्या जवानांनी जिंकलीच, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानला एकटं पाडण्यात अटलजींनी यश मिळवलं. शाहिरी अतिशयोक्ती करायची म्हटलं तर ते मोगल की तुरुक कोण होते माहिती नाही, पण शिवाजी आणि संताजी-धनाजी यांच्यानंतर पाकिस्तानचा एवढा मोठा पराभव अटलजींनीच केला. खरं तर अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र होतो. कित्येक भेटी झाल्या. पण या सगळ्यातला आमचा संवाद एक तर अगदीच औपचारिक किंवा आठवणी इतक्या खासगी की शक्यतो त्या सार्वजनिक करूच नयेत या स्वरूपाच्या. अथांग लोकप्रियता, उच्चपदं लाभल्यानंतरही त्यांच्या मूळच्या ऋजुता, विनम्रता, सुसंस्कृतपणाला जराही ओहोटी लागली नव्हती. भारतानं एक महान नेता, प्रतिभावंत आणि बुद्धिमान वक्ता, प्रभावशाली नेतृत्व गमावलं. असा नेता पुन्हा होणे नाही!
शब्दांकन : सुकृत करंदीकर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.