आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचा आदर्श ‘भारतीय’ समाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. यशवंत मनोहर (ज्येष्ठ विचारवंत)  माणसांमधील बऱ्या-वाईट संबंधांवरून समाज बरा किंवा वाईट ठरतो. स्त्रिया आणि पुरुष, स्त्रिया आणि स्त्रिया किंवा पुरुष आणि पुरुष अशा विविध संबंधांचा गोफ, असे समाजाचे स्वरूप असते. हे संबंध कशावर आधारलेले आहेत? बंधुभावावर की द्वेषभावावर? समतेवर की विषमतेवर? न्यायावर की अन्यायावर? या प्रश्नांच्या उत्तरांवरूनच त्या त्या समाजाच्या चांगलेपणाचा वा वाईटपणाचा पोत ठरवता येतो. विषमताधिष्ठित आणि अविवेकाधिष्ठित समाजाच्या आगीत होरपळून निघालेल्या बाबासाहेबांनी ज्या रचनेत कोणालाही जळावे लागणार नाही, अशी आदर्श समाजरचना संकल्पिली. सर्वांना समान दर्जा, समान न्याय आणि समान सन्मान अशी मानवी संबंधांची अत्यंत नवी रचना त्यांनी केली. माणसांमधील हे सर्व संबंध त्यांनी रिझन आणि मोरॅलिटी या दोन खांबांवर उभे केले. रिझन आणि विज्ञानशीलता या दोन वेगवेगळ्या गोष्टी नव्हेत, तद्वतच मोरॅलिटी आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता याही भिन्न गोष्टी नव्हेत. रिझन आणि मोरॅलिटी यांच्या एकजीव बेरजेलाच सद्सद्विवेक म्हटले जाते. ही इहवादी किंवा सेक्युलर जीवनशैली असते. बाबासाहेबांनी अशाच समाजाची संकल्पना मांडली. या समाज नीतीला आपण “भारतीय’ नैतिकता म्हणू. मी सर्वार्थांनी भारतीय आहे. मी कोणती जात नाही, धर्म नाही, कोणता प्रांत नाही, कोणता पंथ नाही. मी आहे फक्त भारतीय! समाजाचे हे ऐक्यसूत्र आहे. हेच एकजीव आणि एकचित्त समाजाचे विधान आहे. बाबासाहेबांच्या या समाजसंकल्पनेत पेहराव, खाद्यान्न, भाषा, रीतिरिवाजांची विविधता आहे, पण विषमता नाही. या वैविध्यातून “भारतीय’ या ऐक्यमय मूल्यदृष्टीचाच सुंदर आविष्कार होतो. ही वेदपूर्वकाळापासूनची एतद्देशीय भारतीय जीवनधाटी आहे आणि जाती, धर्म, वर्ण, दैववाद, पुनर्जन्म मानीत नाही. ती कुठलीही अंधश्रद्धा मानीत नाही. ती परस्परविरोधी हितसंबंधांना निरोगी समाजाचे लक्षण मानीत नाही. तिच्या हातात सर्वांच्या समान हितसंबंधांचा ध्वज आहे. या ध्वजावर समाजवाद आणि इहवाद या ध्येयाचे नाव लिहिले आहे. यालाच बाबासाहेब इहवादी मानवतावाद म्हणतात. बाबासाहेबांचा हा आदर्श समाज लोकशाहीवादीही आहे आणि व्यवहारवादीही आहे. साध्य महत्त्वाचे. या समाजाच्या केंद्रस्थानी माणूसच आहे आणि त्याचेच पूर्ण प्रकाशन आहे. सर्वांच्या हिताची सतत काळजी घेते ती खरी नीती! माणूस या सुंदर केंद्राचे इतर फसवणुकींकडून अपहरण होणार नाही, याची काळजी घेते ती खरी सम्यक नीती! वाईट काय आणि चांगले काय, हे समाजाला सतत सांगते आणि अन्वर्थक ठेवते ती नीती! बाकी सर्व अनीतीच्या मुजोऱ्या असतात. बाबासाहेबांची समाजसंकल्पना कोणालाही परके मानत नाही. ती पूर्ण बुद्धिप्रामाण्यावर आधारलेली आहे. या समाजात उजेड उजेडाला, सभ्यता सभ्यतेला, स्वातंत्र्य स्वातंत्र्याला भेटते. समता व विषमता, न्याय आणि अन्याय, बंधुता व दुष्टता, ज्ञान आणि अज्ञान, स्वातंत्र्य व पारतंत्र्य, सभ्यता आणि असभ्यता, सत्य व असत्य, विचार आणि अविचार, तत्त्वज्ञान व तत्त्वअज्ञान यांच्यात भांडणे होतात. दोन प्रज्ञानात, दोन सभ्यतात आणि दोन सौहार्दात भांडणे होत नाहीत. बाबासाहेबांच्या आदर्श समाजरचनेचा आराखडा जसा संविधानात आहे, तसा धम्मातही आहे. हा सतत मॉडर्न होत जाण्याचा आणि अधिकाधिक इहकेंद्री मनुष्यमयतेच्याच उन्नयनाचा आराखडा आहे. हे पूर्ण प्रज्ञावंतांच्या समाजाचे प्रज्ञानी संकल्पन आहे. संविधान म्हणजे सर्वांच्याच हक्कांची आणि दर्जाची हमी. देशातील प्रत्येकच व्यक्तीचे नाव संविधानाच्या पानांवर छापले आहे. देश सर्वांचा आहे. देशात लोकशाही आहे. पक्षशाही नाही. व्यक्तीशाही नाही. बाबासाहेबांचा “भारतीय’ समाज संविधानमय, प्रज्ञानमय झालेल्या लोकांचा समाज आहे. या समाजाला कोणा एका धर्माचे राष्ट्र मान्य नाही. लोकशाही म्हणजे संविधानशाही! भारताचे लोकच या देशाचे महानायक आहेत. एक संविधान-एक देश, बहुविधता-एक देश, जाती, धर्मविहीन आणि विषमताविहीन समाज हे एक समीकरण आहे. बाबासाहेबांच्या या समाजात शेतकऱ्यांचे मृत्यू नाहीत. अत्याचारमुक्त स्त्रिया आणि असत्यमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, द्वेषमुक्त समाज हाच त्यांचा आदर्श समाज आहे. सद्सद्विवेक, सभ्यता, परस्परांचा आदर करणारे प्रज्ञान असा हा समाज आहे. रिझन आणि मोरॅलिटी, भौतिक विकास आणि बुद्धिप्रामाण्य, पुनर्रचनाशीलता आणि परस्परसहभाव असा हा समाज प्रत्यक्षात येऊ शकतो. ‘आय हॅव डिसाइड टू चेंज’ असे बाबासाहेब म्हणाले होते. आपण सर्व हे डोक्यात घेऊ. असे झाले तर बाबासाहेबांना अभिप्रेत सुंदर, निरुपाधिक आणि संविधानमनस्क समाज भोवती सहज उगवून येईल.

बातम्या आणखी आहेत...