आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाकी जीवन जगणाऱ्या आजी-आजोबांसाठीही पुण्यात पाळणाघराची सुरुवात, 1 दिवसापासून ते महिनाभरापर्यंत राहण्याची सोय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  : विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घराघरांतील बच्चे कंपनी  पाळणाघरात ठेवण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. पण मुलांप्रमाणे घरातील ज्येष्ठांसाठीही आता पुण्यात पाळणाघर सुरू झाले आहे. अगदी एक दिवसापासून ते महिनाभरापर्यंतही या पाळणाघरात ज्येष्ठ मंडळी राहू शकतात आणि समवयस्कांसह आपला दिवस आनंदात आणि काही तरी काम करण्यात व्यतीत करू शकतात.   


पुण्यातील कोथरूड परिसरात ‘रेनबो’ या नावाने वृद्ध नागरिकांसाठीचे हे डे केअर सेंटर अनुराधा करकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. “रेनबो  ही संस्था  सेंटर फॉर अॅक्शन, रिसर्च अँड  एज्युकेशन’ (केअर) या संस्थेच्या अंतर्गत चालवली जाते.  या संस्थेने वृद्धाश्रम व घर यांचा मध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. या वय वर्षे ६२ पासून ते  ८८ पर्यंतचे आजी-आजोबा या संस्थेत येतात. या वयातील लोकांशी बोलणे - संवाद साधणे ही  प्रमुख गरज असते. तसेच समवयस्कांचा सहवासही त्यांना हवासा असतो, तो त्यांना इथे मिळतो. काही आजी-आजोबा आठवड्यातून एकदा-दाेनदा, तर काही जण रोज येतात,” असे अनुराधाताईंनी सांगितले. ‘बहुतेक घरात तरुण मुले दिवसभर कामात असतात. रात्री उशिरापर्यंत ती घरी येऊ शकत नाहीत. काही वेळा जोडप्यातील एकाचा वियोग दुसऱ्याच्या एकाकीपणाचे कारण ठरतो, तर काहींची मुले विदेशात स्थायिक झालेली असतात. कारणे काहीही असली तरी ज्येष्ठ नागरिक एकटे असतात. त्यामुळे यावर काय काम करता येईल, हा विचार सुरू झाला आणि ‘ज्येष्ठांसाठीही पाळणाघर का असू नये?’ हे सुचले,’ असे अनुराधाताई म्हणाल्या.   

 

तीन मावशी घेतात काळजी

रेनबो संस्थेच्या या पाळणाघरात मुलांप्रमाणेच ज्येष्ठ मंडळींनाही पिकअप आणि ड्राॅपअप दिला जातो. त्यासाठी दोन व्हॅन आणि एक कार आहे. अनुराधाताई स्वत: पिकअप करतात. घरातील मंडळी काही दिवसांसाठी बाहेर जाणार असली तर ज्येष्ठांच्या निवासाची सोयही संस्था करते. एक ते तीस दिवसांपर्यंत सध्या ही सोय उपलब्ध आहे. आजी-आजोबांना वेळेत औषधे देणे, डॉक्टरांशी संपर्क ठेवणे हे संस्था करते. या आजी-आजोबांच्या सेवेसाठी ३ मावशी आणि ३ समाजसेविका आहेत.      

 

ज्येष्ठांना व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न    
संस्थेत येणाऱ्या बुजुर्गांना दिवसभर क्रियाशील ठेवणारे अनेक उपक्रम सातत्याने केले जातात. त्यात वैविध्य ठेवले जाते. संगीत, चित्रपट, लघुपट, छोट्या सहली, टॉक शो, करमणुकीचे कार्यक्रम यांची रेलचेल असते. त्यामुळे इथे येणारे ज्येष्ठ नागरिक आनंदी, समाधानी आहेत, असे चित्र दिसते.   

 

हे सकारात्मक पाऊल  
घराघरातील ज्येष्ठ मंडळी निवृत्त झाली तरी आरोग्यदृष्ट्या सक्षम असतात. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, परिपक्वतेचा नव्या पिढीला उपयोगच असतो. पण गतिमान, स्पर्धात्मक, ताणतणावाच्या सध्याच्या काळात नोकरी- व्यवसायात गुंतलेली पिढी घरातील ज्येष्ठांची काळजी करत राहते. त्यांच्यासाठी अशी ज्येष्ठांची पाळणाघरे हे सकारात्मक पाऊल आहे. दिवसभर मुलेही निश्चिंत मनाने कामावर जाऊ शकतात आणि ज्येष्ठ मंडळीही समवयस्कांसह एकत्रित वेळ घालवू शकतात.   
- डॉ. पल्लवी मोहाडीकर, समुपदेशक   

 

बातम्या आणखी आहेत...