आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅड बॉय...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तो न्यूझीलंडमध्ये तेराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या  "माओरी'  जमातीचा...नामशेष होत असलेल्या या जमातीचे सध्या जगात संवर्धन व्हायला लागले आहे. लढवय्ये म्हणून ही जमात प्रसिद्ध... अंगावर टॅटू गोंदवून घेणे ही त्यांची परंपरा... अशा माओरी जमातींमध्ये बेंजामीन अॅन्ड्रयू स्टोक्स जन्मला.

तो न्यूझीलंडमध्ये तेराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या  "माओरी'  जमातीचा...नामशेष होत असलेल्या या जमातीचे सध्या जगात संवर्धन व्हायला लागले आहे. लढवय्ये म्हणून ही जमात प्रसिद्ध... अंगावर टॅटू गोंदवून घेणे ही त्यांची परंपरा... अशा माओरी जमातींमध्ये बेंजामीन अॅन्ड्रयू स्टोक्स जन्मला. न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च शहरात तो बाराव्या वर्षांपर्यंत राहिला. वडिलांनी रग्बी प्रशिक्षक म्हणून इंग्लंडमध्ये नोकरी पत्करली आणि त्याचे नशीब  त्याला क्रिकेटच्या जन्मदात्यांच्या भूमीत घेऊन आले. मात्र ख्राइस्टचर्च सोडण्याची त्याची जराही इच्छा नव्हती. त्याने खूप आरडाओरड केली, मात्र त्याचा प्रतिकार थिटा पटला आणि  इंग्लंडला भावी क्रिकेटपटू मिळाला. या स्टोक्समुळेच क्रिकेटच्या या जन्मदात्या देशाचे नशीब बदलले. विश्वचषक त्यांना गेली चव्वेचाळीस वर्षे हुलकावणी देत होता. स्टोक्सचा परिसस्पर्श इंग्लंडला लाभला आणि वर्ल्डकप क्रिकेटच्या जन्मदात्यांना मिळाला.यंदाच्या अॅशेस सामने जवळजवळ ऑस्ट्रेलियात गेल्या होत्या. त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियाच्या घशातील विजयाचा घास काढून घेतला. शेवटच्या विकेटसाठी ७६ धावांची अभेद्य भागीदारी केली. या भागीदारीत समोरच्या फलंदाज "ली'चा  चा वाटा होता अवघ्या एका धावेचा.
 
 
कोण हा बेन स्टोक्स?  कुठून आला? त्याचे  दिसणे एखाद्या क्रिकेटपटूसारखे नव्हे तर एखाद्या रॉकस्टार किंवा पॉपस्टार सिंगरसारखे... निळसर डोळे, टोकदार नाक, पिंगट केस आणि दाढी, पिळदार शरीरयष्टी आणि शरीरावर अनेक ठिकाणी गोंदवलेले वेगवेगळे टॅटू हे त्याने आपल्या जमातीचे जोपासलेले वेगळेपण... हातात क्रिकेटच्या बॅटपेक्षा गिटार अधिक शोभून दिसेल असं व्यक्तिमत्व...त्याच्या सोनेरी केसांपेक्षा आकर्षण वाटायचे त्याने अंगावर गोंदवून घेतलेल्या टॅटूचे. मात्र तो तेवढ्यावरच थांबला नाही, तो त्यापुढे गेला आणि क्रिकेटमधील कर्तृत्वाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
 
खरं तर बेन स्टोक्सला इतर कोणापेक्षाही राग अधिक येतो. अपयशाचा, अपमानाचा बदला घेण्यासाठी तो अधिक मेहनत करतो. २०१६ सालच्या आयसीसी ट्वेंटी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा कप्तान मॉर्गनने अंतिम षटकात मोठ्या विश्वासाने चेंडू स्टोक्सकडे सोपविला होता. परंतु वेस्ट इंडीजच्या ब्रेथवेटने सलग चार षटकार मारले आणि इंग्लंडचे विजेतेपदाचे स्वप्न अपुरेच राहिले. स्टोक्स त्याक्षणी खचला..मैदानावर गलितगात्र होऊन बसला. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेचे व्यासपीठ निवडले. इंग्लंडचा विश्वचषक स्पर्धेतील पडदा उठला तोच मुळात स्टोक्सच्या एका अविश्वसनीय आणि अप्रतिम झेलमुळे. विश्वचषकाचा समारोपही झाला स्टोक्सच्या विजयी फलंदाजीने. प्रत्येकवेळी मैदानावरच्या अपयशाचा सूड उगवताना त्याने क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले .
 
 
मात्र त्यापूर्वी, बॅड बॉय म्हणून त्याची इमेज होती. केटी पीअर्स यांच्या दिव्यांग मुलाची नक्कल त्यानं केल्याचं उघड झालं. स्टोक्सने ट्विटरच्या माध्यमातून यासाठी माफी मागितली. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. वर्षभर खटला चालला, स्टोक्सचं क्रिकेट मागं पडलं. नाइट क्लबबाहेर दोन गे मुलांची दोन अन्य मुलं चेष्टा करत होते. गे मुलांना उद्देशून त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला. असं करणाऱ्या त्या मुलांच्या हातात बाटल्या होत्या. स्टोक्सने त्यांना असं वागू नका सांगितलं. मात्र त्यांचा उच्छाद कमी झाला नाही. हेल्सने स्टोक्सला यात पडू नकोस असं सांगितलं, परंतु प्रकरण वाढत गेलं. ती मुलं आक्रमक झाल्यानंतर स्टोक्सने स्वसंरक्षणासाठी त्यांना चोप दिला. स्टोक्सच्या माराने त्यातला एकजण बेशुद्ध झाला. कोर्टात स्टोक्स दोषी नसल्याचं सिद्ध झालं. मात्र या प्रकरणाने स्टोक्स आणि इंग्लंड क्रिकेटची नाचक्की झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सला ३0,000 पौंडांचा दंड केला स्टोक्स म्हणतो, इंग्लंडच्या शाळेतला पहिला दिवस अजूनही आठवतोय. जेव्हा सगळ्यांना कळले की मी न्यूझीलंडहून आलोय तेव्हा सगळेजण माझ्या अवतीभोवती घुटमळायला लागले. नोटीस बोर्डवर लिहिलेल्या या खुणांचा अर्थ काय.. असे इतर मुलं मला विचारायचे. ते वाचताना माझे उच्चार त्यांना खूपच मजेशीर वाटायचे. पण अल्पावधीतच ब्रिटीश उच्चार मी आत्मसात केले.
 
अशा अनपेक्षित वातावरणात आणि संकटात उडी घेऊन त्यातून मार्ग काढण्याची सवय त्याला लहानपणापासूनच जडली. तेव्हाही तो फारसा बोलायचा नाही आणि आजही तो तसाच   अबोल आहे. कदाचित आतल्या आत तो धुमसत असावा. त्याची प्रत्युत्तराची क्रिया इतकी प्रखर असते की, 
जाणकार म्हणतात त्याच्याकडे मानवी सामर्थ्यांच्या पलीकडची ताकद आहे. २०१४ च्या विंडीज दौऱ्यात बाद झाल्यावर ड्रेसिंग रुममधल्या लॉकरवर त्याने आपला राग काढला. त्याच्या हाताच्या एका "पंच'मध्ये लॉकरचे कुलूप एका फटक्यात तुटले होते.  या ताकदीचा जेव्हा त्याने लॉर्डसवर वापर केला त्या वेळी काय घडले हे साऱ्या जगाने पाहिले. त्यानंतर आता  हेडिंग्ले येथील लीड्स ग्राउंडवर अखेरच्या खेळाडूला हाताशी धरून कसोटी विजयाचा चमत्कार त्याने घडवला. ७६ चेंडूत अवघ्या दोन धावा काढण्याइतका संयम त्याच्याकडे आहे. ७६ धावांच्या अखेरच्या विकेटसाठीच्या भागिदारीत ७६ पैकी ७५ धावा फटकावण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे. त्याचे ११ चौकार आणि ८ षटकार प्रत्येक ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या हृदयावर आघात करत होते. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी ठोशास ठोसा देण्याची वृत्ती लागते. सद‌्गृहस्थाची प्रतिमा कायम राखणाऱ्या इंग्लिश क्रिकेटला अशा बेदरकार बिनधास्त आणि बेधडक क्रिकेटपटू हवा होता तो तडका स्टोक्सने दिला. इंग्लिश क्रिकेटला सध्या पोलादी कणखरपणा हवा होता. स्टोक्सच्या फलंदाजीने आणि आर्चरच्या गोलंदाजीने त्यांना तो मिळाला आहे. 

लेखकाचा संपर्क - ९८२०२४१९९८

बातम्या आणखी आहेत...