आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्डे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेला जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवर आयेशाची नजर पडली.  त्या झोपडीत चाललेली जगण्यासाठीची रोजची धडपड तिच्या नजरेस पडली. तिच्याएवढीच एक मुलगी बाहेर भांडी घासत बसली होती. तिच्या अंगावर नीट कपडेही नव्हते. आत जोरजोरात ओरडण्याचा आणि मारल्याचा आवाज येत होता. तिने नीट पाहिलं तेव्हा ती मुलगी भांडी घासता घासता रडत आहे असं तिला वाटलं

"अ ब्बू तुम्ना सुनने आते क्या नै ?'...मन लावून पेपर वाचत असलेल्या अब्बूची तंद्री मोडण्यासाठी ही चिऊगर्जना पुरेशी होती. 
"बोल रे मेरा बच्चा', म्हणत अब्बूने पेपर बाजूला ठेवत आयेशाला मांडीवर घेतले. 

"मेरा आबी दो दिन्शे बड्डे हय. तो जल्दीशे तयारीकू लगो. एत्तेबडे चॉकलेटा न् एत्ताबडा केक अन् एत्ते बडेक्बडे फुग्गे लानेकेय. मइ सब सैल्यान्कू न् दोस्तान्कू बुलानवालीय देको हां ! एत्तेबडे पैशे लग्नालेय. फिर्शे मजे कुच बुलू नको हां !'
अब्बू मनापासून हसले. म्हणाले, "हो गे. हो. सब लानेका बड्डेकू आपन. हां क्या ?' 

"चलो आबी, छोडो मजे. जांदेल खेलनेकू', म्हणत आयेशा उडी मारून बाहेर पळालीही. 
दुसऱ्या दिवशी मम्मीबरोबर चालत शाळेला जाताना रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीवर आयेशाची नजर पडली. नेमके तिथेच मम्मीला तिची मैत्रीण भेटल्याने ती तिच्याबरोबर बोलत थांबली. तेवढ्यात त्या झोपडीत चाललेली जगण्यासाठीची रोजची धडपड तिच्या नजरेस पडली. तिच्याएवढीच एक मुलगी बाहेर भांडी घासत बसली होती. तिच्या अंगावर नीट कपडेही नव्हते. आत जोरजोरात ओरडण्याचा आणि मारल्याचा आवाज येत होता. तिने नीट पाहिलं तेव्हा ती मुलगी भांडी घासता घासता रडत आहे असं तिला वाटलं. 
दुपारी शाळेतून परतताना तिने पुन्हा एकदा त्या झोपडीकडे नजर टाकली. ती तिच्याएवढी मुलगी तेव्हा दोरीवर धुणे वाळत घालत होती. आयेशा तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, "तू कोंचे इस्कूलमें हय दिदी ?'
या प्रश्नावर त्या मुलीकडे कोणतंच समाधानकारक उत्तर नव्हतं. तिने मान खाली घातली. 

बड्डेचा दिवस उजाडला. सकाळपासूनच आयेशाला प्रत्येकजण विश करू लागलं. अब्बूनेही संध्याकाळी कामावरून लवकर यायचं कबूल केलं. ते म्हणाले, "मेरे बच्चेका आज बड्डे हय. मइ जल्दी आता. आपन सबजन जाइंगे फिर गावमें. केकबी लाइंगे, फुगेबी लाइंगे न् चॉकलेटाबी लाइंगे एत्तेबडे हां !'

आयेशा गप्पगप्पच होती. मग ती म्हणाली, "अब्बू तुमारेपास दस मिनिट टैम हय ?...जरा मेरे साथ चलो तो.'
अब्बूला आश्चर्य वाटलं. आयेशा अब्बूला त्या झोपडीपाशी घेऊन गेली. तिथे ती तिच्याएवढी मुलगी आता झोपडीबाहेर झाडू मारत होती. आयेशा म्हणाली, "अब्बू, मइ आबी बडी हुइया के नै ?... तो आबी मेरा बड्डे नै कर्नेका. तुमें मेरे बड्डेकू जो एत्तेबडे पैशे खरचनाले हाते, वू पैशे मजे यो दिदीकू देनेके हय. यो दिदी मेरेएत्तीच हय पन इस्कूलकू नै जाती, इस्कू आच्चे कपडे पहनने नै मिल्ते. दिन्भर नुस्ता काम काम अन् कामंच कर्ती आस्ती इने. तो प्लीज, मेरा बड्डे कॕन्सल करो अन् वू पैशे यो दिदीके मम्मीकू देव. उन्कू बोल्ना, दिदीकू इस्कूलमें भेजो.'

अब्बूने अत्यानंदाने आयेशाला कुशीत घेऊन तिची पापी घेतली. आपले खिसे चापसले आणि ते दोघे झोपडीच्या दिशेने चालू लागले.
(सदर समाप्त)

इर्शाद बागवान 

bagwan.irshad13.ib89@gmail.com

लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

बातम्या आणखी आहेत...