आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाफना ज्वेलर्सचा डाटा हॅक, हॅकरने मागितली 65 लाखांची खंडणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समधील ८० संगणकांचा डाटा परदेशातील हॅकर्सने २५ नोव्हेंबर रोजी हॅक केला. हा डाटा परत मिळवून देण्यासाठी हॅकरने प्रतिसंगणक ९८० डॉलर (सुमारे ६५ लाख) रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी बाफना ज्वेलर्सचे संचालक सिद्धार्थ बाफना यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाफना यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी शोरूममधील ८० संगणक काही वेळासाठी बंद झाले होते. यानंतर बिलिंग साॅफ्टवेअर, कस्टमर डिटेल्स, ट्रान्झॅक्शन डिटेल्स व अकाउंट या विभागातील संगणकांतून डाटा हॅक झाला. तर, याच संगणाकांमध्ये नोटपॅड फाइल अपलोड झाली होती. यावर हॅकरने खंडणीची मागणी केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. हॅकरने मागितलेल्या खंडणीच्या नोटपॅड फाइलची कॉपी देखील बाफणा यांनी पोलिसांकडे दिली आहे. अशा प्रकारे खंडणी मागण्याचा शहरातील हा पहिलाच प्रकार समोर आला आहे. यानंतर बाफणा ज्वेलर्सतर्फे तत्काळ पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

७२ तासांत पैसे दिल्यास ५० टक्के डिस्काऊंट

हॅकरने खंडणी मागत असताना ५० टक्के डिस्काऊंट देण्याचाही निरोप सोडला होता. डाटा हॅक केल्यापासून ७२ तासांच्या आत फोन, ईमेलद्वारे संपर्क करून पैसे भरल्यास त्यात ५० टक्के डिस्काउंट देणार असल्याचे यात म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

बॅकअपमुळे डाटा सुरक्षित

सध्या कामांसाठी वापरत असलेले सर्व सॉफ्टवेअर कायदेशीर आहेत. हॅकरने बाफना ज्वेलर्सचा अल्प प्रमाणात डाटा हॅक केला आहे. इतर सर्व डाटा बॅकअपमध्ये असून पुन्हा एकदा एन्ट्री करून हा डाटा सुरक्षित असणार असल्याची माहिती सिद्धार्थ बाफणा यांनी दिली. दरम्यान, हॅकरच्या धमक्यांना बळी न पडता बाफणा ज्वेलर्सने पोलिसांत तक्रार केली आहे. तसेच, यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी उच्च क्षमतेच्या सुरक्षेची साॅफ्टवेअर वापरणार असल्याचेही बाफना यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...