आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- टीव्ही सेंटर चौकात १०० कोटींतून होणाऱ्या रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यासाठी युतीचे स्थानिक नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एकत्र आले. फडणवीस यांनी युतीतील राजकारणावर भाष्य केले नसले तरी स्थानिक नेत्यांनी मात्र एकमेकांना स्थानिक विषयावर टोमणे लगावले. त्यातही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांची जुगलबंदी चांगलीच रंगली.
विधानसभा अध्यक्ष बागडे आपल्या भाषणा
त म्हणाले आमचे महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती हे चांगले काम करतात पण खासदार खैरे हे त्यांना फ्री हँड देत नाहीत. खैरेंना विचारण्यातच त्यांचा वेळ जातो. त्यावर खैरे म्हणाले मी तर मॅच्युअर नेता आहे. उत्तरेतील अनेक राज्यांचा मी प्रमुख आहे. त्यामुळे हस्तक्षेप करत नाही, असे उत्तर दिले.
बागडे पुढे म्हणाले स्थानिक पातळीवर तुमच्या पक्षात तुम्ही तर माझ्या पक्षात मी ज्येष्ठ आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर त्याचे श्रेय आपसूकच आपल्याला मिळेल पण चुका केल्या तर त्याचा दोष दोघांवरही येईल. तर मी मनपात जातच नाही, सर्वांना फ्री हँड दिला आहे. पण पाणी आले नाही, कचरा पडलाय हे सांगण्यासाठी फोन येतात त्यामुळे मला त्यांना फोन करावा लागतो असा खुलासा केला. त्याचबरोबर खैरे यांनी पुन्हा शहराच्या नामकरणाच्या मुद्द्याला हात घातलाच
खैरेंचे चांगले चालले, चालू द्या
व्यासपीठावर बसलेल्या खासदार आमदार, माजी आमदार हे आधी नगरसेवक होते. याच मार्गे ते गेले आहेत. तसे मी माझ्या बाबतीत बोलणार नाही, असा उल्लेख महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रस्ताविकात केला होता. याचा धागा पकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, घोडेले, मला तुमचा रोख लक्षात आला. सर्वांचा नंबर लागला तेव्हा माझा नंबर कधी लागणार याची घाई तुम्हाला झाली आहे. पण घाई करू नका, खैरेंचे चांगले चालले आहे ते चालू द्या असा सल्ला दिला.
काम सुरू करण्यास विलंब का हेही बघितले पाहिजे...
मुख्यमंत्र्यांचे औरंगाबाद शहरावर लक्ष आहे, ही चांगली गोष्ट पण त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरही लक्ष घातले पाहिजे. कोणतेही काम सुरू करण्यास त्यांना का विलंब होतो, हेही बघितले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार सुभाष झांबड यांनी व्यक्त केली. आमदार इम्तियाज यांना मराठी भाषेतून बोलण्याचा आग्रह आमदार इम्तियाज यांनी भाषणाची सुरुवात हिंदीतून केली होती. त्याला उपस्थितांनी आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी लगेच मराठीतून भाषण सुरू केले. ते म्हणाले रस्त्यासाठी १०० कोटी आम्ही आणले असा दावा शिवसेना व भाजपही करतेय. तेव्हा शहरात कचरा दोघांपैकी कोणी आणला हेही स्पष्ट करावे अशी मागणी केली.
'कार डस्टबिन' देऊन आयुक्तांनी केले स्वागत
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सर्व जण कासावीस झाले होते. प्रत्येकाने भले मोठे पुष्पगुच्छ सोबत आणले होते. परंतु आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मात्र एक बॉक्स मुख्यमंत्र्यांना दिला. त्यात कार मध्ये ठेवण्याची कचराकुंडी अर्थात 'कार डस्टबिन' असल्याचे त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.