पडघम / बागडेंच्या उमेदवारीने तर्कवितर्कांना पूर्णविराम, इच्छुकांचा हिरमाेड

फुलंब्री मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष, पुन्हा बागडे-काळे लढत रंगणार

पंढरीनाथ काळे

Oct 02,2019 09:53:41 AM IST

फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे भाजपकडून उमेदवारीसाठी सुरू असलेल्या गुऱ्हाळाला अखेर पूर्णविराम मिळाला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची मंगळवारी उमेदवारी निश्चित झाली असल्याने इतर इच्छुकांची मात्र हिरमोड झाल्याची चर्चा रंगली हाेती. मतदारसंघात पुन्हा बागडे विरुद्ध काळे अशी सरळ लढत होणार, असे चित्र सध्यातरी पाहावयास मिळत अाहे.


बागडे यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असा निकष लावत हरिभाऊ बागडे यांचे तिकीट कापणार अशा चर्चांना फुलंब्री मतदारसंघात उधाण आले होते. याच अनुषंगाने पक्षातील अनेक दिग्गज उमेदवारीसाठी मैदानात उतरले होते. सोशल मीडियावर कॅम्पेन देखील अनेकांनी सुरू केले होते. या मध्ये जिप सदस्या अनुराधा चव्हाण व प्रदीप पाटील हे आघाडीवर होते. प्रदीप पाटील हे संघाशी निगडित असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळू शकते तर अनुराधा चव्हाण यांचा मतदारसंघात ग्राउंड लेव्हला असलेले काम म्हणून त्यांना उमेदवारी मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु बागडे यांच्या वाढत्या वयाप्रमाणेच राजकारणातील मोठा अनुभव व विद्यमान आमदार तसेच विधानसभा अध्यक्ष या मोठ्या पदावर असल्याने च त्यांना उमेदवारी मिळाली असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे. फुलंब्री मतदार संघात बागडेंना टिकीट मिळते की नाही हीच चर्चा अनेक दिवसांपासून सुरू हाेती. परंतु उमेदवारी मलाच मिळणार असे बागडेंनी जाहीर करत टिकीट मिळण्याअगाेदरच फार्म भरण्याची तीन तारीख जाहीर केली हाेती. परंतु बागडे हे दबाव तंत्र वापरत असल्याची चर्चा होती यामुळे इच्छुक कामाला लागले हाेते.

पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. या मध्ये जि.प.सदस्या अनुराधा चव्हाण, प्रदीप पाटील, उपमहापौर विजय औताडे, नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे मुलाखती देखील दिल्या होत्या.


हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार
काळेंचे मुद्दे...

काँग्रेसने माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, हमीभाव, वाढती बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग, कपाशी वरील लाल्या रोग, दुष्काळ, संघर्ष यात्रा, यल्गार यात्रेच्या माध्यमातून काळे यांनी गेल्या पाच वर्षात पराभवानंतर ही काम चालूच ठेवत मतदारसंघात भाजप सरकाच्या कामा विरोधात आवाज उठला होता. ते हेच मुद्दे घेऊन मतदारासमोर जाणार आहे.


बागडेंचे मुद्दे...
बागडे मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत. मतदार कोणाला मतदान करून आमदार निवडतात हे येणारा काळच ठरवेल.


असा अाहे मतदारसंघ
१९९९ मध्ये तालुका निर्मिती झाल्यानंतर या तालुक्यात सिल्लोड तालुक्यातील ४२, कन्नड तालुक्यातील ६, खुलताबाद तालुक्यातील ३, अादी समावेश करून फुलंब्री तालुक्याची निर्मिती झाली. फुलंब्री तालुका निर्मितीपूर्वी औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ होता. त्यात विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन वरील गावे व औरंगाबाद पालिकेतील ८ वाॅर्ड समाविष्ट करून नव्याने फुलंब्री विधानसभा हा नवा मतदारसंघ निर्माण झाला. या मतदारसंघाचे पहिले आमदार मा. आमदार कल्याण काळे हे झाले हाेते.

X
COMMENT