आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंजडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांचं मोठ्ठं विश्व नि त्यातले निरनिराळे असंख्य रंग, त्यांचं उत्स्फूर्त जगणं, त्यातल्या खऱ्याखुऱ्या निरागस भावभावनांसहित उलगडणारं हे नवं सदर.

 

मक्तब (अरबी क्लास)ची तयारी झाली. दिदीची वुजू (हातपायतोंडाची स्वच्छता) बघत आमचीही वुजू झाली. टॉवेलने पुसून झाल्यानंतर सवयीने पावडरला हात गेला. दिदी म्हटली, ‘गुंजो, पावडर नै लगाते मक्तबकू जाताना. आप्पा चिल्लाईंगे.’ पण स्वारी कुठलं काय ऐकायला! दिदीलाच ‘आचंदे (राहू दे) गे दिदी, तूssच नै हुता (काही होत नाही). तू चल.’ म्हणत सलवार कुर्ता आणि चेहऱ्यावर मकनी (फक्त चेहरा उघडा, बाकी केस/छाती/खांदे झाकणारे एक वस्त्र) पेहेनण्यात आली. चप्पल घालून दुकानासमोर दिदीमागे गडबडीने येत दिदीची नक्कल करत ‘अब्बू जाती, सलामालेकूम’ झालं. मक्तब सुरू झालं. 

 

मक्तबच्या आपा (शिक्षिका) मुलीमुलांना गोल बसवून एका काठाला एकेकाला बोलावत सबक (कालचं पाठांतर) घेत होत्या. बहुतेक सगळ्यांच्या हातात अम्मा पारा (अरेबिक अंकलिपी). सगळे आपला नंबर येईल आता या धडधडीने कालचं सबक याद करत होते. काही यातूनही बिनधास्त खुसपुसत कुजबुजत गमजागिरी करत होते. अनवधानाने आवाज वाढला की, आपांची तंबी यायची. मग सगळा हॉल एकदम चिडिचूप व्हायचा. पाचसात मिनिटंच शांततेत जायची की पुन्हा गोंधळ चालू. आपा निष्णात गुरूप्रमाणे सराईतपणे मुलामुलींना सांभाळत प्रसंगी दरडावत लहानांना लाडावत आपल्या कामात मग्न होत्या. एकएक मूल समोर येऊन बसले की त्याचं सबक ऐका. चूक सुधारा. नवीन सबक द्या. नेक्स्ट, चालू होतं. 


कोपऱ्यात दिदीला खेटून बसलेले गुंजी डोळे भोवताल टिपत होते. अलिफ बा ता सा (अरेबिक अ ब क ड) चा गजर ऐकत होते. शेजारच्या मुलांची मस्ती पाहात होते. आपांचा दरारा पाहात होते. एकूणच वातावरण समजून घेत आपण इथे सूट होऊ का, हा प्रश्न स्वतःलाच विचारत होते. आज पहिलाच दिवस. आपा आज आपल्यालाही सबक देणार. पण कधी? इतका वेळ घरातसुद्धा कधी आपण शांत बसलेलो नाही. इथेच का ही जबरदस्ती? अम्मीअब्बूचा समजावून समजावून घसा बसतो, पण आपण कुणाला जुमानत नाही. आपल्याच तालात असतो. म्हणून तर दिदीने हा कावा केला नसेल आपल्याला डांबण्यासाठी? असं विचारमंथन छोटुल्या मेंदूत चाललं असावं. 

 

बाकी कुणाला गुंजडीच्या नवेपणाशी काही घेणंदेणं नव्हतं. सवयीप्रमाणे सगळं घडत होतं. आता सगळ्यांचे सबक झाले होते. गुंजडीलाही अलिफ बा ता सा ची एक ओळ पढवण्यात आली. बाईसाहेबांनी आपल्या खानदानी पहाडी आवाजात म्हटलीही. आपांनी हसत पाठ थोपटली. 

 

‘सबजने अपनी जगहपर बैठो. मेरे पिच्चे आबी कलमे (बेसिक अरबी) बोलो, चलो.’ आपांनी फर्मावले. चिडीचूप शांतता पसरली. आपा पाहात होत्या म्हणून साध्या चुळबुळीही थांबल्या होत्या. अपवाद गुंजडीचा. तिला कुठून इथे येऊन फसलो असं झालं असावं बहुदा. वुजू, सलवार कुर्ता, मकनी, सलाम न् सबकची नवलाई संपल्यात जमा होती. 

 

अचानक बाईसाहेब उठून उभ्या राहिल्या. गोलाच्या मधोमध. आणि त्या शांततेला चिरून टाकणाऱ्या सुरात म्हणू लागल्या, 
‘ला तू कमाल है
तू मेरे नाल है
लक्दी है चिलेजिम्मे
आया तू चाल है
हेयsss जीने की तमन्ना है
मरने का इरादा
तू करले मुझसे वादा.
(कोण तो कुठला गुरू रंधावा की गंदावाचं एक पॉपसाँग) आणि सबकने गुंजणारा तो हॉल आपांसहीत सगळ्या मुलामुलींच्या दिलखुलास हसण्याने दुमदुमून गेला.

 

(लेखक एक छोटासा दुकानदार आहे. याहीपेक्षा खूप जास्त वाचनवेडा अाहे. पण कुतूहलमिश्रित नजरेने भोवतालातलं जगणं टिपण्यातली अन् तो वाटण्यातली मजा काही औरच. त्यांतही चिल्लरगँग असेल तर पूछोही मत.)
 

बातम्या आणखी आहेत...