Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | bakari eid 2018 know the information about kurbani

जाणून घ्या, बकरी ईदचे महत्त्व : कुर्बानी कोणी, कशी आणि कधी द्यावी

रिलिजन डेस्क | Update - Aug 22, 2018, 01:05 PM IST

बकरीद कोणासाठी आहे, कुर्बानी कोणी द्यावी, कशी द्यावी, कधी द्यावी, कुर्बानीच्या मागील हेतू काय आहे आदींबाबत माहिती देत इस

 • bakari eid 2018 know the information about kurbani

  बकरीद कोणासाठी आहे, कुर्बानी कोणी द्यावी, कशी द्यावी, कधी द्यावी, कुर्बानीच्या मागील हेतू काय आहे आदींबाबत माहिती देत इस्लाममध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला यासंबंधित संपूर्ण माहिती देत आहोत.


  कुर्बानीचा हेतू
  कुर्बानी देणार्‍या व्यक्तीच्या मनातील हेतू स्वच्छ आहे की नाही हेही अल्लाहला माहीत असते. अल्लाहचा आदेश मानून आणि त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी कुर्बानी दिल्यास नक्कीच तो त्याची कृपा प्राप्त करेल. पण कुर्बानी देताना उगाचच दिखावा केल्यास अल्लाहला तो मंजूर नाही. कुर्बानी प्रतिष्ठेसाठी वा नाव कमवण्यासाठी देण्यात येत नाही तर अल्लाहच्या इबादतसाठी, कृपेसाठी देण्यात येते.


  कुर्बानी कुणी द्यावी
  ज्यांची क्षमता आहे अशा व्यक्तींनी कुर्बानी द्यावी. आपल्या क्षमतेनुसार जनावर घ्यावे. अल्लाहची कृपा प्राप्त करण्यासाठी कुर्बानी द्यावी. दिखाव्यासाठी मोठ मोठे जनावर आणू नये. क्षमता असेल तर चांगल्या भावनेतून आणावे. स्वतंत्र एक बकरा आणण्याची क्षमता नसेल तर मोठ्या जनावरामधील सात हिश्श्यात भाग घेऊ शकतो. ज्याची क्षमता असून सुध्दा जो व्यक्ती कुर्बानी देत नाही, अशा व्यक्तींनी ईदगाह मध्ये येऊ नये, अशी स्पष्ट सूचना इस्लाममध्ये देण्यात आली आहे. ईदच्या नमाजनंतर कुर्बानी द्यावी. कुर्बानी तीन दिवस (उर्दू तारीख १०, ११, १२) देण्यात येते.


  कुर्बानी कुणाची द्यावी
  कुर्बानी देण्यात आलेले जनावर परिपूर्ण तंदुरुस्त हवे. आजारी, अंध, अपंग, कान कापलेला नसावा. कुर्बानीच्या जनावरामध्ये एकही दोष नसावा. कुर्बानीनंतर जनावराची कातडी न विकता गरीब लोकांना द्यावी, अन्यथा मदरसामध्ये द्यावी.


  कुर्बानीचे वाटप
  कुर्बानी नंतरच्या मांसाचे वाटप कसे करावे असे सांगण्यात आले आहे. कुर्बानीनंतरच्या मांसाचे तीन भाग करावेत, असा सल्ला शरीयतमध्ये देण्यात आला आहे. एक हिस्सा गरीब लोकांमध्ये वाटावा. दुसरा आपल्या मित्र आणि नातेवाइकांमध्ये द्यावा आणि तिसरा हिस्सा आपल्या घरात घेऊन यावा. गरिबांमध्ये मात्र हे वाटलेच पाहिजे. चांगले मांस घरात ठेवू नये, मांस वाटताना पक्षपात करू नये, दिखाव्यासाठी न करता चांगल्या भावनेतून मांस वाटप करावे.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, ईदचा दिनक्रम आणि बकरीदची सुरुवात कशी झाली...

 • bakari eid 2018 know the information about kurbani

  ईदचा दिनक्रम
  १. सकाळी लवकर उठणे २. मिस्वाक करणे (दात घासणे) ३. स्नान करणे ४. चांगले कपडे परिधान करावेत. ५. सुगंधी अत्तर लावणे. ६. ईदची नमाज ईदगाहमध्ये जाऊन अदा करणे. ७. ईदगाहला एका रस्त्याने जाऊन दुसर्‍या रस्त्याने परत येणे. ८. ईदगाहला जाताना पायी जाणे. ९. रस्त्यात जाताना तकबीर (विशेष प्रार्थना) म्हणणे. १०. ईदच्या नमाजनंतर गरिबांना दान करावे. ११. ईदगाह येथे महिलांनाही आणावे. (अ. राफे अ. सलाम काझी, शहर काझी जमियते अहले हदीस, सोलापूर)

 • bakari eid 2018 know the information about kurbani

  बकरीदची सुरुवात कशी झाली...
  प्रेषित मुहम्मदयांच्या पूर्वीचे हजरत इब्राहीम अलै सलाम हे एक पैगंबर होते. त्यांना वयाच्या नव्वदाव्या वर्षी मुलगा झाला. त्याचे नाव इस्माईल ठेवण्यात आले. प्रेषित हजरत इब्राहिम यांना खूप आनंद झाला आणि ते पत्नी आणि मुलांच्या प्रेमात व्यस्त झाले. त्यावेळी अल्लाहने त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यावेळी स्वप्नात अल्लाहने त्यांना स्वत:ला जे सर्वात प्रिय आहे त्याची कुर्बानी देण्याचा आदेश दिला. तेव्हा त्यांनी प्रथम बकर्‍याची कुर्बानी दिली. दुसर्‍या दिवशी पुन्हा तेच स्वप्न, दुसर्‍या दिवशी त्यांनी मेंढा कुर्बान केला. तिसर्‍या दिवशी पुन्हा तेच स्वप्न, तिसर्‍या दिवशी उंटाची कुर्बानी दिली. चौथ्या दिवशी पुन्हा तेच स्वप्न. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सर्वात प्रिय तर मुलगा इस्माईलच आहे. हजरत इब्राहिम अलै सलाम यांच्यासाठी ही कसोटीची वेळ होती. एकीकडे मुलावरचे प्रेम आणि दुसरीकडे अल्लाहचा हुकूम. प्राधान्य कुणाला द्यायचे. पण हजरत इब्राहीम अलै सलाम यांनी अल्लाहचा आदेश मानला आणि मुलाची कुर्बानी देण्याची मानसिकता केली. मुलाला घेऊन मक्कापासून मीनाकडे रवाना झाले. तेवढ्यात सैतान आला आणि त्यांनी हजरत इब्राहिम अलै सलाम यांची पत्नी हजरत हाजरा यांना त्या घटनेची माहिती देऊन अल्लाहच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न केला. परंतु हजरत हाजरा यांनी अल्लाहच्या आदेशासमोर एक नाही तर हजारो इस्माईल कुर्बान केले असते, असे सांगून सैतानास सात वेळा कंकर मारून हाकलून दिले.


  दुसरीकडे मीनाच्या मैदानावर हजरत इब्राहिम अलै सलाम पोहोचले आणि मुलाला विचारले, मी तुला अल्लाहच्या नावे कुर्बान करणार आहे, तुझे काय मत आहे, तेव्हा मुलगा हजरत इस्माईल अलै सलाम यांनी बाबा तुम्ही मला बिनधास्तपणे कुर्बान करा, माझे संयमी स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल असे सांगितले. तसेच बलिदानावेळी पुत्रप्रेम आडवे येऊन परमेश्वर कर्तव्यात अडसर येऊ नये, यासाठी पुत्र इस्माईल यांनी वडिलांना डोळ्यावर पट्टी बांधण्यास आणि स्वत:ला उलटे झोपवण्यास सुचवले. असे उत्तर ऐकताच हजरत इब्राहिम अलै सलाम यांनी तसेच काम करीत सुरी घेऊन मुलाची कुर्बानी देऊ लागले. तेवढ्यात देवदूत हजरत जिब्रिल आले आणि त्यांनी इस्माईल अलै सलाम यांना सुरीखालून काढले आणि सुरीखाली बकरीला ठेवले. बकरीवर सुरी फिरली आणि कुर्बानी झाली. त्यानंतर जिब्रिल अमीन यांनी हजरत इब्राहिम अलै सलाम यांना सांगितले की, तुमची कुर्बानी अल्लाने कबूल केली तुमच्या कुर्बानीवर अल्लाह खुश आहे. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वरभक्ती, परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून ‘ईल-उल-अजहा’ साजरी केली जात आहे.
  (हाजी उस्मान जमादार, सोलापूर)

Trending