आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जज म्हणाले, या आरोपात फाशी किंवा जन्मठेप,काही बोलायचे का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - चौघांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी तिघा बापलेकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश(तिसरे) न्यायाधीश व्ही.डी. केदार यांनी विचारले, की या आरोपामध्ये फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेविषयी तुम्हाला काही बोलायचे आहे का? त्यावर आरोपी वडिलांनी हात जोडले तर दोन्ही भावांनी स्व हस्ताक्षरातील एक चिठ्ठी न्यायाधीशांना दिली. दोन्ही पक्षांचा शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर या खटल्याची पुढील तारीख २० नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. याच दिवशी आरोपींना शिक्षा ठोठावल्या जाण्याची शक्यता आहे. 

 

तिघा बाप लेकांनी बाखराबाद येथे एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या केली होती. या खटल्याची अंतिम सुनावणी शनिवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात झाली. या वेळी आरोपी गजानन वासुदेव माळी (वय ६०) यास न्यायाधीशांनी सर्वप्रथम विचारले की, तुमच्यावरील आरोपात फाशी किंवा जन्मठेप अशा दोन प्रकारच्या शिक्षा आहेत. तुम्हाला या विषयी काही बोलायचे आहे का. त्यावर आरोपी गजानन स्तब्ध होता. त्यानंतर त्याला वय विचारले. गजाननने आपले वय ६० सांगितले. घरात कोण कोण आहे. असे विचारले असता आरोपी दोन मुलांशिवाय आणखी एक मुलगा व पत्नी असल्याचे सांगून मुलगा कंपनीत काम करीत असून तो अविवाहित आहे व पत्नी त्या मुलाकडे असल्याचे सांगितले व हात जोडले. त्यानंतर आरोपी नंदेश गजानन माळी यालासुद्धा काही बोलायचे आहे का, विचारले असता त्याने वय २३, शिक्षण १२ वी असल्याचे सांगितले व न्यायाधीशांना एक चिठ्ठी दिली. त्यानंतर तिसरा आरोपी दीपक गजानन माळी यालासुद्धा विचारले असता त्याने वय २२ व शिक्षण सातवी सांगितले. त्यानंतर आरोपी पक्षाचे वकिलांनी व सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅड. आर.आर. देशपांडे यांनी शिक्षेविषयी युक्तिवाद केला. 

 

सरकार पक्षाने ३० मिनिटे केला शिक्षेवर युक्तिवाद 
सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील आर.आर. देशपांडे यांनी ३३ मिनिटे युक्तिवाद केला. त्यांनी १९७३ पासूनचे न्यायालयीन विविध दाखले दिले. आरोपींचे कृत्य हे अत्यंत दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगून, आरोपींनी किती क्रूरपणे चौघांची हत्या केली याचे विवेचन केले. 

 

हत्याकांडातील आरोपी बाप लेक, दोन्ही मुले अविवाहित 
बाखराबाद येथील या हत्याकांडातील आरोपी हे बाप लेक आहेत. नंदेश व दीपक हे गजानन माळी यांचे मुले आहेत. दोघेही अविवाहित आहेत. दोन एकर शेतीच्या वादातून तिघांनी मिळून विश्वनाथ माळी(वय ८०), वनमाला माळी, योगेश माळी व राजेश माळी यांचा कुऱ्हाडीने मारून खून केला होता. योगेश व राजेश हे दोघे भाऊ आहेत. त्यापैकी राजेश यांना एक मुलगा आहे. तर योगेश अविवाहित होता. विश्वनाथ माळी त्यांचे काका तर वनमाला ही चुलत बहीण होती. 

 

न्यायालयाच्या परिसरात गर्दी 
न्यायालय परिसरात बाखराबाद येथील नागरिक तसेच आरोपींचे नातेवाईक निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात आले होते. या वेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्तही ठेवला होता. आता पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

 

दोघींच्या साक्षी महत्त्वाच्या 
सरकार पक्षाच्या वतीने प्रभावती माळी यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यांनी साक्ष दिल्यानंतर काहीच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. तर किरण माळी या हापशीहून पाणी घेऊन जाताना त्यांनी हे हत्याकांड घडल्याचे बघितले असल्याची साक्ष दिली होती 

बातम्या आणखी आहेत...