आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाखराबाद हत्याकांड: जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेवर झाली सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला साडेचार वर्षापूर्वी बाखराबाद येथे दोन एकर शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोषी वडील व दोन मुलांच्या शिक्षेवर पुन्हा मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. केदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद करण्यात आला. तर आरोपी पक्षाच्या वकिलांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे.

 

आरोपी गजानन वासुदेव माळी (वय ६०), मुलगा नंदेश गजानन माळी (वय २३)व दुसरा मुलगा दीपक गजानन माळी (वय २२) या तिघा बापलेकांनी दोन एकर शेतीचा अनधिकृत केलेला ताबा सोडण्याच्या वादातून तिघांनी मिळून विश्वनाथ माळी(वय ८०) त्यांची मुलगी वनमाला माळी भावाची दोन मुले योगेश माळी व राजेश माळी यांचा कुऱ्हाडीने मारून खून केला होता. या खटल्यात शनिवारी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद झाला होता. आरोपी पक्षाने वेळ मागितल्याने आणि आरोपींनी न्यायाधीशांना दिलेल्या चिठ्ठीवरून या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवण्यात आली होती.

 

मंगळवारी दुपारी या खटल्याची सुनावणी सुरु झाली तेव्हा आरोपीचे वकिलांनी कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी न्यायालयाकडे विनंती केली तर पुन्हा आरोपीच्या वतीने एक चिठ्ठी न्यायाधीशांना देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाचे कामकाज स्थगित करण्यात आले. पुन्हा तीन वाजता कामकाज सुरु झाले असता प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅड. आर.आर. देशपांडे यांनी आरोपींचे कृत्य हे अतिशय क्रुर असल्याने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून पुन्हा गुरुवारी या खटल्याची अंतिम सुनावणी ठेवली आहे. याच दिवशी निकाल येण्याची शक्यता आहे.


आरोपीचे वय व आधीची गुन्हेगारी पृष्ठभूमी नसल्याचा युक्तीवाद
दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. एक २२ तर दुसरा २३ वर्षाचा आहे. यापूर्वीची आरोपीची पृष्ठभूमी ही गुन्हेगारी नाही. त्यांच्या घरी त्यांच्याशिवाय कुणीही नाही, त्यामुळे आरोपींना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद पुन्हा मंगळवारी आरोपींच्या वकिलांनी केला. तर आरोपींची क्रुरता ही दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने त्यांना फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचा युक्तीवाद सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील आर.आर. देशपांडे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...